कबड्डीचा 'बादशाह' अनुप कुमार निवृत्त
महा एमटीबी   20-Dec-2018मुंबई : भारतीय कब्बडी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमार याने कबड्डीमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. कबड्डीच्या मैदानात त्याची ओळख 'कॅप्टन कूल' अशीच होती. विशेष म्हणजे, स्वत: अनुप कुमारने पिंक पँथरच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. सध्या चालू असलेल्या प्रो-कबड्डी लीगमध्ये अनुप हा जयपूर पिंक पँथरचा कर्णधार म्हणून काम पाहत होता. बोनस पॉईंटचा 'बादशाह' असा मान मिळवलेल्या अनुपला जयपूरने ३० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.

 

अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली या मोसमात जयपूर पिंक पँथरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचा संघ या मोसमात प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. याशिवाय, अनुप गेल्या काही सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. या प्रो-कबड्डी लीग मोसमात अनुपच्या नावावर १२ सामन्यात ५० गुण जमा आहेत. आतापर्यंत अनुप कुमारने प्रो-कबड्डीत ९१ सामने खेळले असून ५९६ गुण आपल्या नावावर केले आहेत.

 

अनुप कुमारने २००६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये पदार्पण केले होते. याच स्पर्धेत भारताने सुवर्णपदकही जिंकले होते. २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचाही तो भाग होता. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ चा कबड्डी वर्ल्डकपही भारताने आपल्या नावावर केला होता. २०१२ मध्ये अनुपला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. कबड्डी या खेळात अनुप हा अनेक तरुण खेळाडूंसाठी एक आदर्श आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/