दासबोध - स्तवन दशक
महा एमटीबी   20-Dec-2018
 


‘स्तवन’नाम दशक हे दासबोधातील पहिले दशक आहे. या दशकात दहा समास असून त्यापैकी पहिला समास हा प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. त्यात समर्थांनी सांगितले आहे की, या ग्रंथाचे नाव ‘दासबोध.’ हा गुरू-शिष्यांचा संवाद असून त्यात भक्तिमार्ग स्पष्ट करून दाखवला आहे. त्यात नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्याचे लक्षण व अध्यात्म निरूपण बहुत करून केले आहे. या ग्रंथातील महत्त्वाचा सिद्धांत समर्थांनी पुढील ओवीत सांगितला आहे.

 
 

भक्तीचेन योगे देव । निश्चय पावती मानव ।ऐसा आहे अभिप्राय । ईये ग्रंथीं ॥

भक्ती, मोक्ष, विदेह अवस्था, देव, जीव- शीव,ब्रह्म यांचे विवरण या ग्रंथात आलेले आहे. मुख्यत: उपासना म्हणजे काय? कवित्त्वलक्षण, माया, कर्ता कोण? इत्यादी मुद्द्यांचे विवरण या ग्रंथात सविस्तरपणे करायचे, असे समर्थांनी ठरवले असावे. त्यासाठी ते शिवथरघळीत आपल्या निवडक शिष्यांसह जाऊन राहिले. या ग्रंथनिर्मितीसाठी उपनिषदे, वेदान्त, श्रुती असे नाना ग्रंथ आणि मुख्य म्हणजे स्वानुभव (आत्मप्रचिती) यावर समर्थांचा भर होता. समर्थ कधीही कोणताही ग्रंथ समोर ठेवून लेखन करीत नाहीत. पण, या ग्रंथांच्या संमतीने त्यातील सार घेऊन समर्थ हा ग्रंथ लिहिणार आहेत. ते पुढे सांगतात, उपनिषदादी या ग्रंथांना काही टीकाकार ‘मिथ्या’ म्हणतात. कारण, या लोकांच्या मनात मत्सर भरलेला आहे. हे सर्व खोटे आहे, असे सांगून ते या शास्त्रग्रंथांना उडवून लावण्याचा प्रयत्न करतात. तथापि समर्थांना हे मान्य नाही. ते म्हणतात,

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण ।

उगाच ठेवी जो दूषण ।

तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी ॥

जे टीकाकार या ग्रंथांना खोटे म्हणतात, ते गर्वाने धुंद झाले आहेत. त्यांच्या मनात गर्वामुळे मत्सर व मत्सरामुळे क्रोध निर्माण होतो. असा कामक्रोधाने अंत:करण नासलेल्या माणसाला ‘भला’ कसे म्हणता येईल? त्यासाठी श्रोत्यांनी गर्व टाकून देणे हेच उत्तम होय. तसेच गर्वामुळे ज्यांचे अंत:करण बिघडले आहे, अशा दुरात्म्यांना थारा देऊ नये. या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने जे निंदक होते, ते भक्तिमार्गाला वंदू लागले. या ग्रंथाच्या श्रवणाने कार्य-अकार्य यांच्यासंबंधी शंका दूर होतात. अज्ञान, भ्रांती नाहीसी होईन ज्ञानप्राप्ती होते. जी माणसे अवगुणी, अवलक्षणी असतील ती सुलक्षणी, धूर्त, तार्किक, विचक्षण होतात आणि त्यांना काळाचे भान येते. (समयो जाणती), आळशी लोक प्रयत्नशील होतात. दासबोध ग्रंथाची ही जी फलश्रुती समर्थांनी सांगितली आहे, त्यावरून त्यांना अपेक्षित अशा भक्तिमार्गाने व्यापकता केवळ पारमार्थिक न राहता ती ऐहिकता व पारलौकिकता या दोघांनाही स्पर्श करते, असे म्हणायला हरकत नाही.

दासबोध ग्रंथासंबंधी हे प्रास्ताविक समर्थांनी दशक एक, समास एकमध्ये विस्तारपूर्वक सांगितले आहे. त्यावरून समर्थांच्या मनात २० दशकी, २०० समासांची योजना सुरुवातीस मूळ धरून होती. सातव्या दशकानंतर त्यांना थांबायचे नव्हते किंवा याबाबत अशीही शक्यता आहे की, विसावा दशक लिहून झाल्यावर हा प्रास्ताविक भाग समर्थांनी लिहिला व तो सुरुवातीस जोडला. तथापि, या दोन्ही अनुमानांपैकी पहिले जास्त संयुक्तिक वाटते. या नंतरच्या दुसर्‍या समासापासून समर्थांनी सर्वसिद्धी फलदायक श्री गणेश, वेदमाता श्री शारदा आणि सद्गुरू यांना वंदन केले आहे. त्यांची वर्णने बहारीची असून ती मूळ दासबोधातून वाचावीत अशी आहेत. यापैकी श्रीगणेशाच्या वर्णनावर एक सविस्तर लेख यापूर्वी गणेश चतुर्थीला प्रसिद्ध झालेला आहे. त्यातून समर्थांच्या प्रतिभेचा व कवित्त्वशक्तीचा प्रत्यय येतो. यापुढे समर्थांनी परमार्थाला जे आधारभूत आहेत, त्या संतसज्जनांना वंदन केले आहे. वेदांनी सर्व विश्व प्रकाशून टाकले आहे. तथापि, हे वेदही ‘परमात्म वस्तू’ दाखवू शकत नाहीत. त्यांनाही या ‘वस्तू’ बाबत ‘नेती नेती...’ म्हणजे ‘माहीत नाही’ असे म्हणावे लागते. इतकी ही ‘वस्तू’ दुष्प्राप्य आहे. ती मायेच्या पलीकडे आहे. तेथे विवेकाची बोबडी वळते. सहस्र जिभांचा शेषही त्याचे वर्णन करू शकत नाही. तेथे तर्कही पांगुळतो. अशी ही ‘परमात्म वस्तू’ संतसज्जनांच्या संगतीने स्वानुभवास येते. या संतांचा महिमा अगाध आहे.

संत आनंदाचे स्थळ । संत सुखाचे केवळ ।

नाना असंतोषाचे मूळ । ते हे संत ॥

जे त्रैलोकी नाही दान ।

तें करिती संतसज्जन ।

तयां संताचे महिमान ।

काय म्हणौनि वर्णावे ॥

संतांनंतर समर्थांनी श्रोत्यांना वंदन केले आहे. समर्थांचे हे श्रोते भक्त, ज्ञानी, संतसज्जन, वैराग्यातील गुणसंपन्न योगी आणि नेहमी सत्याने वागणारे आहेत. समर्थांना तर हे श्रोते निश्चयी पुरुष असून देव किंवा ईश्वराचे अवतार आहेत असे वाटते. हे श्रोते त्रिकालज्ञ, निरभिमानी व अखंड समाधानी आहेत, असे समर्थांनी त्यांचे वर्णन केले आहे. अखेरच्या ओव्यांतून समर्थ नम्रपणे सांगतात की, “माझ्या सांगण्यात अनेक त्रुटी आहेत. परंतु, तुम्ही श्रोतेजन जगदिशाची प्रत्यक्ष मूर्ती असल्याने मी अल्पमती असूनही तुमच्याशी सलगी करीत आहे. तुम्ही संतसज्जन या विश्वाचे मायबाप आहात. हे जाणून तुम्ही माझे बोलणे ऐकावे.” ज्ञानी समर्थांच्या अंगची ही नम्रता अपूर्व म्हणावी लागेल. या समासाच्या शेवटी समर्थ स्वत:ला ‘दासानुदास’ म्हणजे ‘दासांचाही दास’ असे म्हणवून घेत आहेत. त्यांची ही अपूर्वता पाहिली की आपले मस्तक समर्थांपुढे आदराने झुकते.

यानंतर शब्दसृष्टीचे ईश्वर जे कवी, त्यांना समर्थांनी वंदन केले आहे. कवींचे वर्णन करताना समर्थ सांगतात, “कवी वैराग्याचे संरक्षण करणारे आहेत, स्वधर्माचे रक्षण करणारे आहेत. ते भक्तांचे भूषण आहेत. कवी नसते, तर जगाचा उद्धार झाला नसता. मागे व्यास, वाल्मिकी हे कवी होऊन गेले. त्यांच्यामुळे लोकांना विवेक समजला.”

ऐसे हे पूर्वी थोर थोर ।

जाले कविश्वर अपार ।

आता आहेत पुढे होणार । नमन त्यांसी ॥

अशा रितीने समस्त आजी, माजी व भावी कविजनांना समर्थांनी वंदन केले आहे. समर्थ सांगतात, हे कवी नसते, तर जगदोद्धार कसा झाला असता? या कारणाने कवी हे सकळ सृष्टीचे आधार आहेत. कवींसाठी वापरलेली अनेक विशेषणे, कवींची कर्तृत्वे या समासात वाचत असताना समर्थांचे शब्दभांडार, त्यांच्या प्रतिभेचा फुलोरा व त्यांचा कल्पनाविलास यांची प्रचिती येते. या कविश्वरांचा जगाला आधार आहे म्हणून मी त्यांना साष्टांग भावे नमस्कार करतो,’ असे समर्थ रामदास म्हणतात. यापुढे समर्थांनी सर्व सभेला वंदन केले आहे. या कलियुगात कीर्तन श्रेष्ठ आहे, कीर्तनाच्या श्रवणातून अनेक संशय दूर होतात. जेथे कीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ म्हटली पाहिजे. उद्धृत त्यासाठी या समासात समर्थांनी एक संस्कृत श्लोक केला आहे.

‘नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।

मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।

अर्थात, ‘जिथे माझे भक्त गात असतील तेथे मी उभा असतो,’ असे भगवंत नारदाला सांगतात. म्हणून ही सभा श्रेष्ठ. आता निवडणुका जवळ आल्याने सभांचे पेव फुटेल. पण, समर्थ याठिकाणी सांगतात, ती सुसंस्कृत माणसांची आध्यात्मिक सभा आहे. त्या समुदायात कीर्तन, प्रवचन व भगवंताचे गुणगान असल्याने ती सभा श्रेष्ठ. त्या सभेला समर्थ वंदन करतात. कारण, येथील वक्ते व श्रोते शुद्ध मनाचे असल्याने तेथील वातावरण अत्यंत पवित्र असते. कलियुगात अशा कीर्तनाला व

सभेला श्रेष्ठ स्थान आहे.

कलौ कीर्तन वशिष्ठ ।

जेथे होय ती सभा श्रेष्ठ ।

कथा श्रवणे नाना नष्ट ।

संदेह मावळती ॥ (१.८.२९)

या दशकात समर्थांनी परमार्थाचे व नरदेहाचे म्हणजेच मानवी देहाचे स्तवन केले आहे. ‘जेणे परमार्थ ओळखिला । तेणे जन्म सार्थक केला।’ असे समर्थांचे मत आहे. मानवी देह मिळून देहाचेच लाड करण्यात आयुष्य घालवले, तर त्यांना मूर्खच म्हटले पाहिजे. या प्रापंचिक मूर्खांना परमार्थ सुखाची गोडी काय समजणार, अशा शब्दांत समर्थांनी ‘स्तवन’नाम दशक संपवले आहे.

[email protected]

- सुरेश जाखडी