‘देव’ माशांची तडफड
महा एमटीबी   02-Dec-2018न्यूझीलंडच्या बेटावर शनिवारी रात्री सुमारे १४५ हून अधिक व्हेल मासे किनाऱ्यावर मृत्युमुखी आढळले. त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी लिझ कार्ल्सन हिने तिच्या इन्स्टाग्राम ब्लॉगमध्ये लिहिलेला अनुभव मन विषण्ण करणारा आहे.


शनिवारची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती. आठवडाअखेर म्हणून मी आणि माझे मित्र न्यूझीलंडच्या स्टिवर्ल्ड बेटावर फिरायला गेलो होतो. सायंकाळी आम्ही रात्रीच्या वस्तीसाठी तंबू ठोकण्याची तयारीही केली. निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने आम्ही सारे जण आनंदात वेळ घालवत होतो. इतक्यात समुद्रकिनाऱ्यावरून कसला तरी आक्रोश ऐकू येऊ लागला आणि आम्ही सर्वजण तिकडे धावत गेलो...पाहतो, तर काय मृत्यू आमच्या पुढ्यात थैमान घालत होता. त्या बेटावर भरतीच्या वेळेत आलेले शकडो व्हेल मासे पाण्याअभावी समुद्रात परतून जाऊ शकत नव्हते.” न्यूझीलंडच्या बेटावर शनिवारी रात्री सुमारे १४५ हून अधिक व्हेल मासे किनाऱ्यावर मृत्युमुखी आढळले. त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी लिझ कार्ल्सन हिने तिच्या इन्स्टाग्राम ब्लॉगमध्ये लिहिलेला अनुभव मन विषण्ण करणारा आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर एखादा मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला तर त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांपासून सर्वसामान्यांचीही गर्दी जमते. घटनेची दखल घेत त्यावर चर्चा आणि मग प्रदूषण आदी मुद्द्यांना हात घातला जातो. मात्र, न्यूझीलंडसारख्या देशातल्या मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या बेटावर मृत झालेल्या तब्बल १४५ देवमाशांच्या मृत्यूची घटना हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी आहे. अशा मृत माशांचा किनाऱ्यावर खच दिसणे या घटना जगाला नव्या नाहीत. मात्र, त्यातला हा प्रकार प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांना समोर मृत्यूचे थैमान पाहून किंबहुना बचावासाठी काहीही करता आले नाही, ही भावना अधिक वेदनादायक असेल.

 

आपल्या ब्लॉगमध्ये लिझ म्हणते, “मला स्वतःचाच राग येतोय. शेकडो व्हेल्स आमच्यासमोर मृत्यूच्या दारात लोटल्या जात होत्या. चार-पाच जणांनी मिळून व्हेलला धक्का देत समुद्रात लोटण्याचा प्रयत्नही केला. मात्र, इतका महाकाय प्राणी दोघा-चौघांना लोटणे शक्यच नव्हते. भरतीबरोबर आलेले हे मासे आता पुन्हा भरती आल्याशिवाय आत जाणे शक्यच नव्हते. व्हेलची तडफड आम्हाला बघवतही नव्हती. आम्ही रात्रही तिथेच काढली. आमच्यातला एक जण किनाऱ्यापासून १५ किलोमीटर दूरवर मदत मागण्यासाठी गेला होता. अखेर त्याने घटनेची माहिती दिल्यानंतर बचावपथक घटनास्थळी दाखल झाले मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. भरती सुरू झाल्यावर काही व्हेल समुद्रात परतले. मात्र, शेकडो माशांनी आपले प्राण आदल्या रात्रीच सोडले होते. मला ही गोष्ट सतत खायला उठतेय, डोळे बंद केल्यावरही माशांची तडफड समोर दिसतेय,” अशा भावना तिने ब्लॉगमधून व्यक्त केल्या. गेल्या काही काळात समुद्रकिनाऱ्यांवर मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढत आहेत, मात्र, त्याची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

 

न्यूझीलंडच्या छातम बेटावर १९१८ साली असा प्रकार घडला होता. हजारो देवमासे या बेटावर मृत्युमुखी पडले होते. गेल्या आठवड्यात गुरुवारीही १२ मृत देवमासे स्टिवर्ल्ड या बेटावर आढळले होते. रविवारीही याच ठिकाणी आणखी १० वेगळ्या प्रजातीतील मृत देवमासे आढळले. दोनशेहून अधिक स्वयंसेवकांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले होते. भौगोलिक कारणे, समुद्रातील जैवविविधेतील बदल, समुद्रातील खोलीपासून माशांचे भटकणे आदी बाबी याला कारणीभूत असल्याचा अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बचाव पथकाने प्रसिद्ध केलेल्या एका छायाचित्रात लांबच लांबपर्यंत मृत देवमाशांचा खच पडल्याचे दिसते. सध्या मृत देवमाशांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. प्रश्न असा की, पर्यावरणाच्या या र्‍हासावर नेमके उपाय काय? याला जबाबदार कोण? न्यूझीलंडच्या या दोन्ही बेटांवर मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार होत असल्याने जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणप्रेमीही याविरोधात सरकारकडून ठोस उपाययोजनांच्या अपेक्षेत आहेत. जागतिक तापमानवाढही याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. समुद्रातील जैवविविधतेचा भाग म्हणून ओळखला जाणारा देवमाशांचा असा मृत्यू होणे, ही घटना समुद्राच्या पोटात सुरू असलेल्या बदलांची आणि मनुष्यासाठी धोक्याची घंटा तर नसेल ना याचाही विचार व्हायला हवा.

 

-तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/