पृथ्वीवरील विविध रचना
महा एमटीबी   02-Dec-2018

 


 
 
मागील तीन लेखांमध्ये आपण समुद्रांबद्दल माहिती घेतली. आता आपण पृथ्वीवर असलेल्या निरनिराळ्या रचनांची माहिती घेऊया.
 

पृथ्वीवर ज्या भौगोलिक रचना आहेत, त्यांचा अभ्यास ‘रचनात्मक भूशास्त्र’ (Structural Geology) या शाखेंतर्गत केला जातो. या शाखेमध्ये ज्या रचना आहेत, त्यांमध्ये वली (Fold), स्तर भ्रंश (Fault), संधि (Joint) व अभिविसंगती (Unconformity) इत्यादींचा समावेश होतो. या रचना भूगर्भात किंवा वातावरणात होणाऱ्या विविध क्रियांमुळे तयार होतात. यांची माहिती घेण्याआधी आपण या शाखेच्या संदर्भात काही तांत्रिक माहिती घेऊ.

 

. खडक दृश्यांश (Rock outcrop) - आपणाला माहीतच आहे की, पृथ्वीचे कवच हे खडकांपासून बनले आहे. पृष्ठभागावर या खडकांची धूप होऊन माती तयार होते. परंतु, काही ठिकाणी या मातीची धूप होऊन ती निघून जाते व तिच्याखाली दबलेले खडक पृष्ठभागावर येतात. म्हणजेच खडकांचा तेवढा भाग अनाच्छादित (Expose) होतो. या अनाच्छादित झालेल्या खडकाच्या भागाला ‘दृश्यांश’ असे म्हणतात.

 

. स्तरण (Stratification) - जे गाळाचे खडक असतात, ते तयार होताना एकत्र तयार होत नाहीत. जसाजसा गाळ त्या भागात येतो व कडक होतो, तसातसा खडक तयार होतो. तसेच गाळ जेव्हा वाहत येतो, तेव्हा तो प्रत्येक वेळेला सारख्याच रासायनिक घटकांपासून बनला असेल असे नाही. त्यामुळे खडक तयार होताना त्यांचे विविध स्तर (Layers) तयार होतात. या क्रियेला ‘स्तरण’ असे म्हणतात. यालाच ‘बेडिंग’ (Bedding) असेही म्हणतात.

 

. नति व नतिलंब (Dip and Strike) - या संज्ञा दृश्यांशाशी संलग्न आहेत. दृश्यांश ज्या प्रकारे भौगोलिकरीत्या स्थापन झालेला आहे, त्याची ‘नति’ व ‘नतिलंब’ ही गणितीय मापने आहेत. ‘नतिलंब’ (Strike) म्हणजे दृश्यांशाच्या स्तराची भौगोलिक दिशा. हे मापन दृश्यांशाच्या क्षैतिजिक प्रतलावर (Horizontal Plane) घेतले जाते. हे मापन कंपासवर बघितले जाते. हे मापन पूर्व-पश्चिम किंवा तत्सम लिहिले जाते, तर त्याच्या कोनाचा आकडा लिहायचा असल्यास उत्तरेला 0 असे मानून मग कोन मोजून तो आकडा लिहिला जातो. ‘नति’ (Dip) म्हणजे याच दृश्यांशाच्या उताराचा क्षितिजापासून खाली मोजलेला कोन. हा कोन 0० ते 90० यांच्यामध्ये मोजला जातो. याचा अर्थ म्हणजे 0० नति असताना खडकाचा दृश्यांश हा पूर्णपणे आडवा असतो, तर नति 90० असताना हाच दृश्यांश पूर्णपणे उभा असतो. या नतिचेही दोन प्रकार आहेत. जी नति नतिलंबाशी काटकोनात असते तिला ‘सत्य नति’ (True Dip) असे म्हणतात. जी नति नतिलंबाशी इतर कोणत्याही कोनात असते तिला ‘भासमान नति’ (Apparent Dip) म्हणतात.

 

आता आपण पृथ्वीच्या विविध रचनांबद्दल माहिती घेऊ. यात अभिविसंगती हा भाग थोडासा लहान व बाकीच्यांपासून स्वतंत्र आहे, त्यामुळे या भागात बसवू शकतो. म्हणूनच सर्वात आधी आपण अभिविसंगतीबद्दलच जाणून घेऊ. ‘अभिविसंगती’ (Unconformity) म्हणजे एखाद्या खडकाच्या क्रमामधील (Sequence) मध्येच धूप झालेला किंवा स्थापनाच न झालेला पृष्ठभाग होय. पृथ्वीच्या इतिहासात कोणत्या वेळी एखाद्या भागामध्ये गाळ साठण्याची क्रिया खंडित झाली आहे, हे आपल्याला अभिविसंगतीचा अभ्यास केल्यावर समजते.

 

 
 
 

आता ही अभिविसंगती कशी तयार होते हे बघू. आपण असे गृहित धरू की, एका क्रमामध्ये गाळाची स्थापना कुठेही खंडित झाली नाही. अशा क्रमामध्ये सर्वात जुने खडक हे तळाला असतील, तर सर्वात नवीन खडक सर्वांत वर असतील. अशा क्रमाला ‘संगत (Comfortable) क्रम’ म्हणतात. जर अशा क्रमामध्ये गाळाची स्थापना खंडित झाली किंवा या क्रमामधील वरच्या स्तराची धूप झाली व काही काळानंतर पुन्हा गाळाची स्थापना सुरू झाली, तर या पूर्ण क्रमामध्ये तो मधील स्तरच गायब झालेला दिसेल. अशा क्रमाला ‘विसंगत (Unconformable) क्रम’ म्हणतात. हा जो विसंगत क्रम असतो, यालाच ‘अभिविसंगती’ (Unconformity) म्हणतात. आता अभिविसंगतीचे प्रकार बघू.

 

. कोनीय अभिविसंगती (Angular Unconformity) - या प्रकारात अभिविसंगतीच्या पृष्ठभागाच्या वरील आणि खालील भागात लक्षणीय फरक असतो. दोन्ही भागांमधील रचनात्मक वैशिष्ट्ये, कोन यामध्ये फरक असू शकतो. बऱ्याचदा या पृष्ठभागाच्या खालील भाग हा प्रचंड प्रमाणात कोनित, वलीय किंवा भ्रंशित झालेला असू शकतो. कारण, तो जुना असतो व या भागातील भूगर्भीय हालचालींमुळे पूर्वीच त्यात रचनात्मक फरक पडलेला असू शकतो. वरील भाग हा तुलनेने सरळ असतो. कारण, तो नवीन खडकांचा असतो.

 

. विसंगतता (Disconformity)- या प्रकारामध्ये अभिविसंगतीच्या दोन्ही बाजूंकडील स्तर हे जवळजवळ समांतर असतात. ही विसंगतता ओळखायला फारच कठीण असते. कारण, हिच्या दोन्ही बाजूंना जवळजवळ सारख्या प्रकारचे खडक असतात. ही विसंगतता शोधून काढण्यासाठी आजूबाजूच्या अनेक जागांचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास अनेक ठिकाणी बोअर होल खोदून केला जातो.

 

. असंगती (Non-Conformity) - हा प्रकार अग्निजन्य खडकांमध्ये आढळतो. या प्रकारात असंगतीच्या खालील भागात ‘प्लुटॉनिक खडक’ असतात, तर वरील भागात ‘व्होलकॅनिक’ वा ‘गाळाचे खडक’ असतात. याचाच अर्थ असा की, असंगतीच्या पृष्ठभागाच्या खाली कोणतेही स्तर नसतात. पण, वर स्तर असू शकतात, किंबहुना असतातच.

 

. स्थानिक अभिविसंगती (Local Unconformity) - ही अभिविसंगती एका ठराविक भागापुरतीच मर्यादित असते. ही अभिविसंगती एका ठराविक भागात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे तयार होते.

 

. क्षेत्रीय अभिविसंगती (Regional Unconformity) - जेव्हा एखादी अभिविसंगती ही शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेली असते, तेव्हा त्या अभिविसंगतीला ‘क्षेत्रीय अभिविसंगती’ असे म्हणतात. पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करताना क्षेत्रीय अभिविसंगतीचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. कारण, ही अभिविसंगती फार मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेली असते व त्यामुळे यात दिसणारा कोणताही फरक पृथ्वीच्या इतिहासाबद्दल बरेच काही सांगून जातो.

 

आता आपण भारतातील काही काही प्रमुख अभिविसंगतींची माहिती घेऊया. भारतात तीन मोठ्या क्षेत्रीय अभिविसंगती आहेत. त्यातली पहिली म्हणजे ‘एपार्चियन अभिविसंगती’ (Eparchean Unconformity). ही अभिविसंगती भारतीय द्वीपकल्पात असून ‘आर्चियन गट’ (Archean) व ‘पुराण (Purana) गट’ यांना वेगळे करते. दुसरी अभिविसंगती म्हणजे ‘पोस्ट-विंध्यन अभिविसंगती’ (Post-Vindhyan Unconformity). ही अभिविसंगती द्वीपकल्पीय (Peninsular) व अतिरिक्त द्वीपकल्पीय भारतात (Extra Peninsular India) आढळते. तिसरी व शेवटची क्षेत्रीय अभिविसंगती ही म्हणजे ‘पॅलेओझोईक अभिविसंगती’ (Paleozoic Unconformity). ही अभिविसंगती द्रविडी गटाला (Dravidian) आर्यन गटापासून (Aryan) वेगळे करत असून अतिरिक्त द्वीपकल्पीय भारतात आढळते. उपरोक्त उल्लेखित सर्व गटांचा तूर्त केवळ नाव व उदाहरणापुरताच विचार करावा. यांची सखोल माहिती आपण नंतर घेणारच आहोत. तर अशा प्रकारे आपण रचनात्मक भूशास्त्रातील काही महत्त्वाच्या संज्ञा जाणून घेतल्या व विविध अभिविसंगतींची माहिती घेतली. आधी म्हटल्याप्रमाणे ‘रचनात्मक भूशास्त्र’ हे प्रकरण पुढील लेखातही चालू ठेऊ. पुढील लेखात आपण वलींचा अभ्यास करू.

 

- संदर्भ

Textbook of Engineering and General Geology- Parbin Singh- Katson Publishing House

 

(लेखक हे एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून अमेरिकेतील एका नामांकितविद्यापीठातून भूशास्त्रीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/