युवराज सिंहवर अखेर बोली लागली! मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल
महा एमटीबी   18-Dec-2018

 


 
 
मुंबई : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडला. कोणता खेळाडू कोणत्या संघ खरेदी करणार? याकडे सगळ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. आयपीएलसाठीच्या या खेळाडूंच्या लिलावात क्रिकेटपटू युवराज सिंह चर्चेचा विषय ठरला होता. त्याला कारणही तसेच आहे.
 

गेली अनेक वर्षे क्रिकेटपटू युवराज सिंह भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या सत्रात कोणत्याही संघाने युवराज सिंहवर बोली लावली नाही. त्यामुळे युवीचे चाहते नाराज झाले होते. युवीचे चाहते आपली ही नाराजी सोशल मीडियावर दिवसभर व्यक्त करत होते. अखेर युवराज सिंहने आपली किंमत २ कोटी रुपयांवरून १ कोटींवर आणल्यानंतर मुंबई इंडियन्स या संघाने त्याला खरेदी केले. गेल्या वर्षी युवी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. परंतु त्याला फारशी काही कामगिरी करता आली नव्हती. यंदाच्या आयपीएलमध्ये आपला हरवलेला फॉर्म कायम ठेवत त्याला कमाल करून दाखवावी लागणार आहे. आयपीएलचा यंदा हा १२ वा सीझन आहे.

 
 
 

गेल्यावर्षी सर्वात महागडा ठरलेला खेळाडू क्रिकेटपटू जयदेव उनाडकट याला यावर्षीदेखील राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्सला ८ कोटी ४० लाख रुपये मोजावे लागले आहेत. क्रिकेटपटू मोहम्मद शम्मीला किंग्ज इलेव्हन पंजाबने ४ कोटी ८० लाख रुपये देऊन खरेदी केले आहे. लसिथ मलिंगा यंदा मुंबई इंडियन्स संघातून आपले पुनरागमन करत आहे. वरुण अरोनला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्सला २ कोटी ४० लाख रुपये मोजावे लागले. रोहित शर्मा यंदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असून त्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला ५ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. विशेष म्हणजे तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीवर ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली लागली होती.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/