नव्या रंगाचा, नव्या जोशाचा ‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महा एमटीबी   18-Dec-2018 
 
मुंबई : सोशल मीडिया आणि आजची तरुणाई यावर आधारित नव्या रंगाचा, नव्या जोशाचा ‘युथट्यूब’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिरॅकल्स फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रमोद प्रभुलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
 
 

 
 

यापूर्वी ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझ घर’ या सिनेमांचे दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केले आहे. ‘युथट्यूब’ या सिनेमात प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ तील एकूण ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकणार आहेत. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असावी. मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे. अभिनेत्री शिवानी बावकर या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. सध्या शिवानी झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेत शीतलीची प्रमुख भूमिका साकारत आहे. तसेच ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील सोनियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्णिमा देमन्ना ही देखील ‘युथट्यूब’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. संगीतकार पंकज पडघम यांनी हा सिनेमा संगातबद्ध केला आहे. मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमीच्या मधुराणी प्रभुलकर यांनी ‘युथट्यूब’ या सिनेमातील ‘रंगी है संगी है’ हे गाणे लिहिले आहे.

 

 
 

नुकताच या सिनेमाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. आमदार मेधाताई कुलकर्णी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमीचे संचालक प्रमोद प्रभुलकरांनी आजवर आपल्या चारही सिनेमांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनय कौशल्य दाखविण्याची संधी दिली आहे. तरुणाईची दंगा-मस्ती धमाल, या तरुणांमधील सच्चे मित्र आणि जबाबदार नागरिक अशी व्यक्तिमत्त्व समोर आणणारा ‘युथट्यूब’ हा सिनेमा आहे. आपापल्या कामात व्यस्त असणारे पालक आणि त्यामुळे मुलांवर होणारे एकटेपणाचे संस्कार, या आजच्या घराघरांतील परिस्थितीवर भाष्य करणारा ‘युथट्यूब’ हा सिनेमा पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/