कोहलीचे शतक पण भारत पिछाडीवरच
महा एमटीबी   16-Dec-2018पर्थ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ विकेट घेतले.

 

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २८३ धावा केल्या. विराटने कसोटी कारकिर्दीतील २५ वे शतक झळकावले. अजिंक्य रहाणेने ५१ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली, पण मार्कस हॅरिस वैयक्तिक २० धावांवर खेळत असताना बुमराहने त्याला बाद केले. ऑस्ट्रेलियाला हा पहिला मोठा झटका होता. शॉन मार्शही अवघ्या ५ धावा करून तंबूत परतला. त्याला शमीने बाद केले. पीटर हँड्सकॉम्बला इशांत शर्माने बाद केले. त्याने १४ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेड १९ धावांवर बाद झाला. त्याला शमीने बाद केले.

 

कोहलीने मोडला सचिनचा विक्रम

 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने झुंजार खेळी दाखवत आपले २५ वे शतक पूर्ण केले. उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह आणि त्यानंतर नवोदित हनुमा विहारीबरोबर भागीदारी करत कोहलीने हा इतिहास रचला. या शतकी खेळीत त्याने ११ चौकार लगावले. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने आपली २५ शतके पूर्ण करण्यासाठी १२७ डाव खेळले. हा मैलाचा दगड गाठण्यासाठी सचिनला मात्र १३० डाव खेळावे लागले होते.

 

नॅथन लॉयनने भारताविरुद्ध केले दोन नवे विक्रम

 

नॅथन लॉयनने भारताविरुद्ध कसोटीत सातव्यांदा ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर त्याने भारताविरुद्ध ७७ विकेटही घेतले आहे. भारताविरुद्ध जेम्स अंडरसन ११०, मुथैय्या मुरलीधरन १०५ इमरान खान ९४ गडी बाद केले आहे. या यादीत नॅथन लॉयन ७७ गडी बाद करत चौथ्या स्थानी पोहचला आहे. ८२ कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लॉयन ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ३३१ गडी बाद केले आहेत. पहिल्या स्थानावर शेन वॉर्न (७०८), दुसऱ्या स्थानावर ग्लेन मैक्ग्रा (५६३ ), तिसऱ्या क्रमांकावर डेनिस लिली (३५५) आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/