कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा हिंसाचार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |


 

मार्च 2017 मध्ये उत्तरप्रदेशात भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. भाजपाला मुख्यमंत्री कोण, हे ठरवायला नऊ दिवस लागले. या नऊ दिवसांत उत्तरप्रदेशात कुठेही मारामारी झाली नाही. जाळपोळ झाली नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या नाहीत. राग-लोभ झालेत, पण ते चार भिंतीच्या आत. एका मर्यादेत. या पृष्ठभूमीवर, कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या जी जाळपोळ, मारहाण, आपापसात चकमकी होत आहेत, त्याचा प्रत्येक सुबुद्ध नागरिकाने विचार केला पाहिजे.
 

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर या तीनही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. परंतु, कोणता नेता मुख्यमंत्री होणार, हे ठरवायला कॉंग्रेस पक्षाला वेळ लागत होता. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नेते आपापली उमेदवारी पूर्ण ताकदीने पुढे दामटत होते. परंतु, आमच्याच नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली पाहिजे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांना जाळपोळ, मारामारी करण्याची गरज काय? कॉंग्रेसवाले भाजपाला प्रतिस्पर्धी मानतात ना, मग त्यांचा हा गुण का घेत नाहीत? तेवढे तर सौजन्य दाखवायला हवे! महान लोकशाहीवादी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्थापित केलेली कॉंग्रेस पक्षाची हीच लोकशाही मूल्ये आहेत काय, हे जरा दिल्लीतील दरबारी पत्रकारांनी एकदा समजावून सांगितले पाहिजे. राजस्थानात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी खूप मेहनत घेतली आहे, असे म्हणतात.

 

असेलही. तिकडे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या रणनीतीमुळे राजस्थानात भाजपाचा पराभव झाला, असेही म्हणणारे आहेत. तसेही असेल. यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्री करायचे, हे निर्वाचित आमदारांनी न ठरविता, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरवायचे आहे. असे असताना, आमचाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून हिंसाचार करण्यात काय अर्थ आहे? कॉंग्रेसची काय संस्कृती आहे, हे सार्या देशाला माहीत आहे. त्याची पुन:पुन्हा उजळणी कशापायी करायची? या तीन राज्यांत कॉंग्रेसला सत्तासीन केल्याची चूक मतदारांना कालांतराने कळणारच आहे; परंतु ती दुसर्याच दिवशीपासून का म्हणून जाणवून देत आहेत हे कार्यकर्ते, काही कळत नाही. शेवटी काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे! इकडे जाहीरपणे सांगायचे की, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. सर्वकाही एकोप्याने, शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे आणि तिकडे असा हिंसाचार करायचा! हा दुटप्पीपणा आहे, हे लक्षात ठेवा.

 
सचिन पायलट म्हणतात की, कॉंग्रेस हायकमांड जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. मग शांत बसायचे ना! कॉंग्रेसच्या हायकमांडच्या मनात काय आहे, याची पूर्ण कल्पना सचिन पायलट यांना आहे आणि त्यांना हायकमांडचे ऐकायचेही आहे. मग सचिन पायलट यांनी स्वत:हून मुख्यमंत्र्याच्या शर्यतीतून बाहेर पडायला हवे होते. आता ते उपमुख्यमंत्री होणार आहेत म्हणे. सततहायकमांडचा निर्णय मला मान्य राहील,’ असे पुटपुटत राहिले. छत्तीसगडमध्येही हेच सुरू आहे. तिथे तर चार चार जण मुख्यमंत्रिपदावर डोळे ठेवून आहेत! 11 डिसेंबरला निकाल लागून चार दिवस झालेत, तरीही यांचा अजून नेता ठरत नाही आहे. एवढे काय त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला सोने डिकले आहे, कळत नाही. आपला पक्ष सत्तेत आला यातच सर्वांनी खरेतर आनंद मानायला हवा. पण तसे घडताना दिसून येत नाही. मध्यप्रदेशची नेतानिवड तुलनेने स्वस्तात निपटली. नाहीतर तिथेही अशाच जाळपोळीची शक्यता होती. सध्याचा कॉंग्रेस पक्ष महात्मा गांधींचा नसून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. असे म्हणतात की, पंडित नेहरू अत्यंत लोकशाहीवादी होते. लोकशाही राज्यव्यवस्थेची आपण आज जी फळे खात आहोत, त्याचे सर्व श्रेय जवाहरलाल नेहरूंना आहे, असे म्हणतात.
 

पं. नेहरूंमुळेच या देशात लोकशाही टिकली आणि रुजली. अशा या महान लोकशाहीवादी नेत्याच्या वंशातीलच व्यक्तींनी हा कॉंग्रेस पक्ष चालविला आहे. नेहरूंनी लोकशाही संस्थांना जोपासले, वाढवले, असे कॉंग्रेसचे कार्यकर्ते सतत सांगत असतात. अगदी, नरेंद्र मोदी, चहावाले असतानाही पंतप्रधान होऊ शकले, ते पंडित नेहरूंनी भारतातील लोकशाही संस्था मजबूत केल्यामुळेच, असेही सांगायला ही मंडळी मागेपुढे बघत नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदींसह सर्व देशवासीयांनी पं. नेहरूंचे हे ऋण आजन्म मानले पाहिजे, असाही त्यांचा आग्रह असतो. असे होते तर मग हे लोकशाहीवादी संस्कार या कार्यकर्त्यांवर झाले होते की नाही? या कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्याबद्दलच्या तीव्र भावना आपण समजू शकतो. खूपच तीव्र भावना होत्या, तर आपल्या पक्षाच्या मुख्यालयात जाऊन तिथे आपला राग व्यक्त करा. कुणी अडवले आहे? ते करायचे सोडून, राजस्थानात ही मंडळी जाळपोळ करीत सुटली आहे. या जाळपोळीमुळे ज्यांचे नुकसान झाले, ज्यांना मनस्ताप झाला, त्यात कॉंग्रेसचे समर्थकही असू शकतात. या लोकांचे कॉंग्रेसबद्दल काय मत झाले असेल? तसे पाहिले तर, आता म्हणजे अगदी निकाल लागून एक-दोन दिवसच झाले असताना, मतदारांची एवढी चिंता करण्याची परंपरा कॉंग्रेसची नाहीच आहे म्हणा!

 

दिवसरात्र लोकशाहीचा जप करणार्या कॉंग्रेसनेच खरेतर या देशातील लोकशाही धोक्यात आणली होती आणि आजही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीत स्वत:ला फायदा व्हावा म्हणून ज्या काही लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्यावरही धावून जायला, कॉंग्रेसने मागेपुढे पाहिले नाही. निवडणुकीत पराभव झाला की, त्याचे खापर ईव्हीएम मशीनवर आणि निवडणूक आयोगावर फोडायचे. निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांच्या इशार्यावर काम करतो, असे बेछूट आरोप करायचे. रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुनावणी लांबवत नाही, म्हणून सरन्यायाधीशांवर याच कॉंग्रेसने महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला होता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ठाम नकारामुळे हा प्रयत्न उधळला गेला, ही गोष्ट वेगळी.

 

भारतीय लष्करावर तर या कॉंग्रेसने कितीतरी वेळा अत्यंत हीन असा हल्ला केला आहे. आपले लष्कर सहसा या अशा वादात तोंड घालत नाही म्हणून बरे. नाहीतर कॉंग्रेसवाल्यांना पळता भुई थोडी झाली असती. राज्यपालांवर आरोप, कॅगवर आरोप, ज्याच्या त्याच्यावर आरोप... जो कुणी कॉंग्रेसच्या तालावर नाचणार नाही, त्याच्यावर लगेच आरोपांच्या फैरी सुरू होतात. निवडणुकीत भ्रष्टाचार केला म्हणून कॉंग्रेसच्याच एका महान नेत्याची निवडणूक न्यायालयाने रद्द करताच, या नेत्याने भारतात आणिबाणी लावून सर्व विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबले होते. हे विसरून चालणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@