भविष्यवेधी पालकत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
तरुण मुलांशी योग्यप्रकारे संवाद साधू शकणारे पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवायला खूप मदत करतात. इतकेच नाही, तर त्यातून ते स्वतःही जास्त कल्पक, भविष्यवेधी आणि सकारात्मक राहतात. 
 
 
"You know what ma’am; I am १८ years old with a nine O' clock curfew. I have to reach home before 9 pm. Can you imagine?'' डोळे मोठे करत, नाटकीपणे मुद्दाम आईकडे बघत, हे वाक्य लाराने (नाव बदलले आहे) चौथ्यांदा म्हटल्यावर मात्र मी त्यावर प्रतिक्रिया द्यायचे ठरवले. माझे लक्ष वेधून घेण्यासाठी, सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने लाराने हे वाक्य एकाच सत्रात आत्तापर्यंत तीन वेळा म्हटले होते. प्रत्येक वेळी तितक्याच नाटकीपणे व आईकडे जाणीवपूर्वक बघत! चौथ्यांदा तेच आल्यावर मी तिला शांतपणे उत्तर दिले, "yes Lara, I can not only imagine but also understand. १८ is just a number of your chronological age. That does not mean your mental-emotional age has to be १८. It can be different.'' माझी ही प्रतिक्रिया लाराला आजिबात अपेक्षित नव्हती. ती ताबडतोब पाय आपटत त्या खोलीतून बाहेर निघून गेली. तिचे भावनिक वय अजूनतरी १८ नसल्याची पुन्हा एकदा खात्री पटून तिच्या आईने माझ्याकडे पाहत अर्थपूर्ण स्मित केले. अर्थात, या नाट्यानंतरही आम्ही शांत होतो. कारण, लाराचा राग दहा मिनिटांत वितळणार याची आम्हाला अनुभवाने खात्री होती. त्यानंतर ती माझ्या म्हणण्याचा जास्त तर्काधिष्ठित विचार करू शकेल याबद्दल पूर्ण विश्वासदेखील होता. लाराची आणि माझी ओळख होऊन आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. मी तिला नैराश्यामध्ये खोलवर रुतलेले पाहिले आहे, मी तिला पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येचे विचार करताना पाहिले आहे आणि अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करून समस्या निराकरणाच्या मार्गावर आत्मविश्वासाने पावले टाकतानादेखील मी तिला पाहिले आहे.
 

लाराच्या आईबरोबर असणाऱ्या तिच्या नात्यात होत गेलेले सकारात्मक बदलही मी अनुभवले आहेत. लाराच्या ‘क्लिनिकल डिप्रेशन’च्या अवस्थेत अक्षरश: लहान मुलाची घ्यावी तशी काळजी तिच्या आईने घेतली आहे. आज लाराला उच्चशिक्षणासाठी परप्रांतात एकटीला पाठवायला तयार झालेली तिची आई पाहताना मला दोघींचा खूप अभिमान वाटतो आहे. वयाच्या १५ ते १८ या काळात लाराच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या गोष्टी होत गेल्या. आई, बाबा आणि मुलगी अशा या तिघांच्या कुटुंबात प्रत्येकालाच ‘स्व’ची नव्याने जाणीव होत गेली. परस्परांचा जास्त प्रामाणिक स्वीकार करण्याचे फायदे त्यांना मिळत गेले. परस्पर विसंवादाच्या, एकमेकांबद्दल अस्वीकाराच्या, वादाच्या भीतीने जाणून-बुजून दुर्लक्षित केलेल्या तीव्र मतभेदांच्या, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या आकसाच्या अशा अनेक समस्या मुळातच होत्या. त्या पृष्ठभागावर येण्यासाठी कारणीभूत ठरली ती लाराची संवेदनशीलता आणि समस्यांच्या निराकरणासाठी केल्या गेलेल्या बदलांचे मूळदेखील लाराच्या संवेदनशीलतेतच आहे. त्या मुलीच्या टोकाच्या मानसिक अस्वस्थतेने त्यांचे घर मुळापासून हादरवले होते. सुदैवाने मानसतज्ज्ञाची मदत घेण्याबाबतचा मोकळा दृष्टिकोन, उपाय व उपचाराचे महत्त्व समजून त्याबाबत राखलेले सातत्य आणि समस्येपेक्षा निराकरणाच्या मार्गांवर केंद्रित केलेली ऊर्जा या सर्वांचा परिणाम म्हणून या कुटुंबाने आपल्यासाठी सुसंवादाचा एक भक्कम पाया शोधला. त्यातून केवळ लारालाच नाही, तर तिच्या पालकांनाही आयुष्याची एक विधायक दिशा मिळाली.

 

तरुण मुलांशी योग्यप्रकारे संवाद साधू शकणारे पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवायला खूप मदत करतात. इतकेच नाही, तर त्यातून ते स्वतःही जास्त कल्पक, भविष्यवेधी आणि सकारात्मक राहतात. ‘आमच्या वेळी असं नव्हतं हो...’ असली पुष्टी न जोडता संवाद साधणारे पालक युवक-युवतींना आपलेसे वाटतात. कारण ते बोलण्यासोबत, ऐकण्यावरही भर देतात, तरुणांचे म्हणणे समजून घेऊ इच्छितात. मुले जसजशी मोठी होत जातात तसे, आपले स्वतंत्र व्यक्तित्त्व पालकांनी मोकळेपणाने स्वीकारावे, आपल्या विचारांचा आदर करावा, अशी त्यांची अपेक्षा असते. आपल्या आयुष्याची कथा मुलांना सांगताना त्यातील खाचखळगे, चुकलेले निर्णय, अपयश यासकट प्रामाणिकपणे सांगितली, तर पालकांचे यशापयश युवा पिढीला जास्त प्रेरणादायक ठरते.

 
 
 - गुंजन कुलकर्णी
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@