‘द क्वीन ऑफ फ्युनरल’
महा एमटीबी   14-Dec-2018
 
 

महिला आणि तीही स्मशानात काम करणारी... हे जरा पचवायला अवघड असेल, पण नाशिकच्या सुनीताताई गेली कित्येक वर्षे पंचवटी स्मशानभूमीत कार्यरत आहेत. त्यांची ही संघर्षकहाणी...

 

मृत्यूम्हणजे जीवनाचे एक अटळ सत्य. आयुष्यभर ज्याला आपण तळहातावरील फोडाप्रमाणे जपतो, तो माणूस मृत्युशय्येवर चिरनिद्राधीन झाल्यावर अगदी २४ तासानंतरदेखील आपल्या घरात ठेवणेही जिकिरीचे होते. जिथे माणसाचे कार्यक्षेत्र संपते, अंत्यविधीला जमलेल्या गर्दीवरुन जिथे व्यक्तीच्या कर्तृत्वाचे मोजमाप केले जाते, अशास्मशाननावाच्या कार्यक्षेत्रात कार्य करणार्‍या सुनीताताई. महिला आणि तीही स्मशानात काम करणारी... हे जरा पचवायला अवघड असेल, पण सुनीताताई गेली कित्येक वर्ष नाशिकच्या पंचवटी स्मशानभूमीत कार्यरत आहेत.

 

सुनीताताईंना त्यांच्या या कार्याप्रती विचारले असता त्या अगदी सहजपणे सांगतात की, ”या सेवेतून मला मिळणारा आनंद हा इतर कोणत्याही कार्यातून मिळणार्‍या आनंदापेक्षा मोठा आहे. आयुष्यभर आपल्या माणसाला सगळेच सोबत करतात, पण मृत्यूपश्चात प्रत्येक अनोळखी माणसाला मी माझ्या सेवेच्या माध्यमातून सोबत करते. त्याच्या शेवटच्या प्रवासाला घरच्या शिदोरीबरोबर असते ती माझ्या सेवेचीशिदोरी.’ याचे समाधान लाखमोलाचे आहे.” सुनीताताईंचा अंत्यविधीच्या साहित्यविक्रीचा पिढीजात व्यवसाय असला तरी एका महिलेने प्रत्यक्ष चिता रचण्यापासून सर्व अंत्यसंस्कार पार पाडण्याची वाट मात्र सर्वार्थाने वेगळी आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुनीताताईंचे पती राजेंद्र पाटील, दोन मुले आणि वडिलांसह अमरधाम परिसरात वास्तव्यास आहे. स्मशानात चिता रचणे, लाकूड आणि अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य विक्री करणे हा सुनीताताईंच्या आई-वडिलांचा पारंपरिक व्यवसाय.

 

स्मशानभूमीतच सुनीता लहानाची मोठी झाली. त्र्यंबकेश्वर येथील राजेंद्र पाटील यांच्याबरोबर दोनाचे चार हात झाले. इकडे वार्धक्यामुळे सुनीताताईंच्या वडिलांना कार्य करणे अशक्य झाले. थरथरणार्‍या हातांना चिता रचता येत नसे. त्यामुळे काही वेळा पार्थिवाचे दहन अपूर्णच राही, त्यातून वेगळ्या समस्याही निर्माण होत. अशा बिकट वेळी वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा धाडसी निर्णय सुनीताताईंनी घेतला आणि मुलाबाळांसह स्मशानात मुक्काम हलवला. अर्थात, सुनीताताईंचा निर्णय अजिबात सोपा नव्हता. स्मशानात महिलांचा प्रवेश निषिद्ध मानणार्‍या लोकांची संख्याही काही कमी नाही. याबाबत आपला अनुभव कथन करताना सुनीताताई सांगतात की, ”एकदा एका महिलेचे पार्थिव अंत्यविधीसाठी आले. मी नेहमीप्रमाणे चिता रचली आणि मृतदेहाला चितेवर ठेवले. त्यावर काही नातेवाईकांनी मात्र आक्षेप घेतला. शवाला एका महिलेने हात लावलाच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे मला रडू कोसळले. त्यावेळी माझ्या पतीने, आई-वडिलांनी समजूत काढली की, समाजात काही चांगले आणि वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस. आपले काम प्रामाणिकपणे कर. त्यांचे बोलणे ऐकून मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. त्या दिवसापासून मी कोणाचीही पर्वा करता हे काम करत आहे.” हा एकच नव्हे, असे अनेक जिव्हारी लागणारे अनुभव सुनीताताईंच्या वाट्याला आले. त्यांच्या मुलासाठी ज्या शिक्षिकेकडे शिकवणी लावली होती, तिच्या पतीने सुनीताताईंना स्मशानात काम करताना बघितले होते. अशीच एकदा सुनीताताई शिकवणीसाठी विचारपूस करायला गेल्या असता, त्या शिक्षिकेच्या पतीने तिच्या कानात काही सांगितले आणि क्षणार्धात त्या शिक्षिकेनेमराठी माध्यमाची मी शिकवणी घेतच नाही,” असे सांगत सुनीताताईंना बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, सुनीताताईंच्या मुलाच्या वर्गातील काही मुले याच शिक्षिकेकडे शिकवणीला होती. असे एक ना अनेक बरे-वाईट अनुभव पदरी बांधून गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सुनीताताई खंबीरपणे आपल्या कुटुंबीयांसाठी झटत आहेत. आजमितीस त्यांच्या दोन्ही मुलांचे अनुक्रमे बारावी आणि दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

 

सुनीताताईंच्या आगळ्यावेगळ्या कामाची दखल घेत अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी त्यांचा सत्कारही केला आहे. त्यातून त्यांची एक वेगळी ओळखही निर्माण झाली. मात्र, त्यांच्या जीवनातील संकटे काही थांबण्याचे नाव घेत नाही. कारण, साधारणतः दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात या कुटुंबाला मोठा फटका बसला. कुसुमाग्रजांच्याकणाकवितेतील ओळींप्रमाणे त्यांच्या घरात गोदामाई पाहुणी म्हणून आली आणि होते नव्हते तेवढे सगळे घेऊन गेली. यात त्यांचे पुरस्कार, मुलांचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले. हे कमी की काय म्हणून आजही समाजात वावरताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांचे पती चहाची टपरी चालवून कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकत आहेत. पण, तरीही आपले,स्वतःचे हक्काचे एक घरकुल असावे, ही एक अपेक्षा त्या बाळगून आहेत. इतक्या बिकट प्रसंगांना तोंड दिल्यानंतरही सुनीताताईंनी मात्र हार पत्करलेली नाही. भविष्यातही हीच सेवा मरेपर्यंत करण्याचा निर्धार त्या व्यक्त करतात. सेवेपेक्षा अर्थार्जनाला महत्त्व देणार्‍या नागरिकांना आपल्या कृतीतून सुनीताताईंनी दिलेला हा एक मोलाचा संदेश.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/