विजयाचा ‘महाजन पॅटर्न’
महा एमटीबी   14-Dec-2018पालघर, नाशिक, जळगाव आणि आता धुळे या सर्व निवडणुकांमधील विजयाच्या शिल्पकारांमध्ये एक नाव प्रामुख्याने समोर आलं ते म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं. महाजन यांनी राबवलेली कार्यपद्धती आता ‘महाजन पॅटर्न’ नावाने ओळखली जाऊ लागली आहे. या सर्व विजयांच्या निमित्ताने त्यांचं पक्षातील वजन येत्या काळात आणखी वाढणार, हे नक्की.


निवडणुकांची जबाबदारी सोपवल्यानंतर ती लिलया पेलणं ही काही सोपी बाब नाही. निवडणुका जिंकलो तर श्रेय आणि हरल्यास त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडून घेण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. यातच गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातलं एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं. मुख्यमंत्र्यांचे एक विश्वासू सहकारी म्हणूनदेखील महाजन ओळखले जातात. नुकत्याच अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. नाशिक, धुळे महानगरपालिकेमध्ये महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयश्री आपल्या पदरात खेचून आणली. त्यातच मुख्य बाब म्हणजे, गेल्या वेळच्या निवडणुकांच्या तुलनेत भाजप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांचं गणित हे इतर निवडणुकांपेक्षा वेगळेच असते. अनेकदा स्थानिक नेते, स्थानिक मुद्दे यांचाच या निवडणुकांवर जास्त प्रभाव दिसून येतो. तशा म्हटल्या तर तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी धुळे आणि अहमदनगर पालिकेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्याच होत्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने गेल्या निवडणुकांच्या तुलनेत आपली कामगिरी सुधारली. नाशिक, जळगाव आणि धुळे या महानगरपालिकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशात एक कॉमन नाव होतं, ते म्हणजे गिरीश महाजन यांचंच. खऱ्या अर्थाने धुळे महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती म्हणजे भाजप आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या वादामुळे. भाजपमध्ये गुंडांना स्थान देण्यात येत असून आपल्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे आरोप या निवडणुकीपूर्वी गोटे यांनी केले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानही गोटे यांनी विधानभवनात पत्रकं वाटून आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु, निकालानंतर धुळेकरांनीही या सर्वांकडे दुर्लक्ष करत विकासाभिमुख दृष्टिकोन असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वालाच पसंती दिली. गेल्या निवडणुकांमध्ये अवघ्या तीन जागा जिंकणाऱ्या भाजपने महाजन यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात ७४ पैकी ५० जागांवर मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला. स्वपक्षीय विरोधक असलेल्या गोटे यांच्या आव्हानातील हवादेखील यानिमित्ताने निघून गेली. त्यातच सरकारमध्ये राहून कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आणि आघाडी करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना या विजयाने त्यांच्या मर्यादा लक्षात आणून दिल्या.

 

नाशिक आणि जळगाव महानगरपालिका आपल्याकडे खेचून आणणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना या निवडणुकांमध्ये साथ लाभली ती म्हणजे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून ‘महाजन पॅटर्न’ यशस्वी झाल्याचे दिसून आले. धुळे निवडणुकीपूर्वी आ. गोटे यांनी भाजपविरोधातच बंड पुकारल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं होतं. त्यातच त्यांची बाजू घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही भाजपला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. राष्ट्रवादीच्या हाती पालिकेची सत्ता असल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन आपले सर्वस्व पणाला लावले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक आदी दिग्गजांनी पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, ‘महाजन पॅटर्न’समोर त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. निवडणुकीपूर्वी धुळ्यात विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गोटे यांना आमंत्रण नसले तरी त्यांनी या मेळाव्यात जाऊन भाजपच्याच कार्यपद्धतीवर टीका केली होती. “स्थानिक नेत्यांनाच अशा निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात यावी, यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. महाजन यांचे नेतृत्व धुळेकर सहन करणार नाहीत,” असा टाहोदेखील गोटेंनी फोडला होता. परंतु, निवडणुकीत धुळेकरांनी गोटेंना पार तोंडावर पाडले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांच्या एकमेव विजयाने लोकसंग्राम पक्षाची लाज राखली, असे म्हणण्याची वेळ आली. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादीचीही अवस्था अगदी दयनीय आणि केविलवाणी झाली.

 

महाजन यांनी या निवडणुकीदरम्यान धुळ्यातील प्रश्न सोडविण्याचे आणि शहर भयमुक्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता हे आश्वासन पार पाडण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर असेल. त्यातच निकालानंतर महाजन यांनी प्रतिक्रिया देत आपल्यासमोर गोटे यांचे नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आव्हान असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. गोटे यांनी कमरेखालची भाषा वापरत, चुकीचे आरोप करत प्रचाराचा स्तर घसरविल्याचा आरोपही महाजन यांनी केला. धुळेकरांनीही विकासालाच मत देत सर्वांना जागा दाखवल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतिआत्मविश्वासात फिरत असले तरी या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांना खरंच आत्मचिंतन करण्याची आणि जमिनीवरील वास्तवाची जाण होण्याची गरज आहे. यातच एमआयएमसारख्या पक्षाचा होत असलेला विस्तार हादेखील येत्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळ्यात चार जागांवर विजय मिळवत एमआयएमनेही महानगरपालिकेत चंचुप्रवेश केला आहे.

 

गिरीश महाजन यांच्या या विजयी खेळीमुळे खानदेशात आणि राज्याच्या निवडणुकीत ‘महाजन पॅटर्न’ तयार झाल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जळगाव महानगरपालिका निवडणुकांदरम्यान शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तो शब्द पाळत मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली आणि विकासकामांची सुरुवातही झाली. अगदी हिच बाब धुळेकरांनाही पटवून देण्यात महाजन यशस्वी झाले. एकेकाळी विरोधी पक्ष म्हणूनही भाजपला जागा मिळाल्या नसल्या तरी महाजन यांनी ‘फिफ्टी प्लस’च्या दिलेल्या नाऱ्याची या ठिकाणी खिल्ली उडवण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करत महाजन यांनी कामाकडे आणि निवडणुकांकडे लक्ष देणे पसंत केले. त्याचेच फळ त्यांना ५० जागा जिंकून मिळाले. भाजप आणि गोटेंच्या भांडणाचा आपल्याला लाभ होईल, या भ्रमात राहिलेल्या राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षांची आपली सत्ता गमावली. ‘तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं’ असं म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. पालघर, नाशिक, जळगाव आणि आता धुळे या सर्व निवडणुकांमध्ये महाजन यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणत स्वत:ला सिद्ध केले. त्यातच आता त्यांचे पक्षातील वजनही नक्कीच वाढणार, यात काही शंका नाही. धुळ्यातील विजयाने मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे आणि या विजयाच्या निमित्ताने ‘महाजन पॅटर्न’ नावाचा नवा पॅटर्न आता उदयास आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/