माहितीतले ‘चोर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
मंगळवारी सिनेटसमोर पिचाई यांना अतिविचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. गुगलच्या डाटा संकलनाच्या पद्धतीबाबत पिचाई यांनी दिलेली साक्ष मात्र काही महत्त्वाच्या काही मुद्द्यांवर भाष्य करणारी ठरली. 
 
आजवर आपण बऱ्याच लहानमोठ्या गोष्टींची चोरी झाली, असं ऐकत वा वाचत आलो आहोत, पण सध्या फॅड आलं आहे ते माहितीच्या चोरीचे. एखादा माणूस आपली माहिती कोणाला तरी विकून करोडो रुपये कमवत आहे, यावर चार-पाच वर्षांपूर्वी कदाचित आपला विश्वासही बसला नसता. पण, फेसबुक आणि गुगलचा आपल्या आयुष्यातला वाढता वावर पाहता, या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. मुळात असं कोणी का करेल, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे कारण, आपण रोजच्याच जीवनात याची माहिती त्याला आणि त्याची माहिती याला चालता बोलता देत असतो. पण, हीसुद्धा एक प्रकारची चोरीच आहे. फरक इतकाच की आपण ती माहिती ‘विकत’ नाही. पण, फेसबुक आणि गुगलबाबतीतच ही चोरी का व्हावी असा विचार केला तर, ‘वेब सिक्युरिटी’चा अभाव आढळतो. त्यामुळेच गुगलच्या ‘गुगल प्लस’ या सेवेला यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा डेटाचोरीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही सेवा येत्या एप्रिलमध्ये म्हणजेच नियोजित वेळापत्रकाच्या चार महिने आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधित एक घोषणा गुगलने ऑक्टोबरमध्ये केली होती. त्यामुळे या डेटाचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा अमेरिकेत गदारोळ झाला आहे. काही महिन्यांपूर्वी केम्ब्रिज डेटा अॅनालेटिक्स या कंपनीवर फेसबुकच्या ग्राहकांची माहिती चोरून त्याचा निवडणुकीत वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळी फेसबुकच्या संचालक मार्क झुकेरबर्गला काँग्रेस सभागृहाच्या न्यायालयीन समितीच्या बैठकीला तोंड द्यावे लागले होते. आता अशीच काहीशी परिस्थिती गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यावरही ओढवली आणि मंगळवारी सिनेटसमोर पिचाई यांना अतिविचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. गुगलच्या डाटा संकलनाच्या पद्धतीबाबत पिचाई यांनी दिलेली साक्ष मात्र काही महत्त्वाच्या काही मुद्द्यांवर भाष्य करणारी ठरली.
 

२००७ साली गुगल सुरू झाल्यापासून असे पहिल्यांदाच घडले आहे की, गुगलने जारी केलेल्या माहितीत त्यांनी असे स्पष्ट केले की, ‘गुगल प्लस’ सेवेच्या भागीदार अॅप्सनी वापरकर्त्यांचा डेटा पळविला. या डेटाचोरीत वापरकर्त्याचे नाव, ई-मेल, लिंग आणि वय ही माहिती फुटली आणि त्याचा फटका ५२.५ दशलक्ष ‘गुगल प्लस’ खात्यांना बसला. मुख्यत: ‘गुगल प्लस’चा वापर हा व्यावसायिकांकडून केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांच्या बऱ्याच गोष्टी या डेटालिकमध्ये उघडकीस आल्याची शक्यता आहे. हे गुगलने आपल्या परिपत्रकात जाहीर केले असले तरी, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुगलला या डेटाचोरीबाबत आधीच माहीत होते, मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली आणि त्यानंतर ‘गुगल प्लस’ बंद करत असल्याची घोषणा केल्याचा आरोप गुगलवर केला, तर गुगलने ही सेवाच सध्या लोकप्रिय नसल्यामुळे तिची देखभाल करणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच, गुगलमध्ये हा ‘बग’ गेल्या दोन वर्षांपासून असताना, ५२ दशलक्ष लोकांची माहिती चोरी होण्याची वाट गुगल पाहत होता का, असा प्रश्न पिचाई यांना संसदेत विचारण्यात आला. त्याचबरोबर ही बैठक गाजली ते एका अनोख्या प्रश्नावरून, जेव्हा पिचाई यांना या संसदेत गुगलवर ‘इडियट’ असे टाकल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच का दिसतात? यावर पिचाई यांनी गुगल कोणताही पक्षपात करत नसल्याचे स्पष्ट करत, ”जगातील सर्वात जास्त या नावाने जे सर्च करतात, तेच निकष गुगल दाखवतो,” असे सांगितले. पिचाई अगदी चपळपणे या बैठकीला सामोरे गेले असले तरी, फेसबुकपाठोपाठ गुगलही डेटाचोरीच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या रडारवर आहे. त्यामुळेच आता यापुढे गुगल, फेसबुक व अन्य मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक सायबर नियम असावेत, अशी मागणी अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांच्या खासदारांनी केली. त्यामुळे येत्या काळात या माहितीच्या चोरांपासून सावध राहण्यासाठी, वेब सेक्युरिटीसाठी सगळेच देश एकत्र येऊन एक परिपूर्ण असा कायदा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरी, आपल्या परीने आपण या माहितीतल्या चोरांपासून सावधान राहावे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@