सुबोध भावे यांचा नवा सिनेमा
महा एमटीबी   12-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता सुबोध भावे यांचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. झी मराठी वाहिनीवरील सुबोध भावे यांच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेलाही सध्या खूप लोकप्रियता मिळत आहे. सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. सुबोध भावे यांचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 

‘एक निर्णय’ असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, आणि निर्माते अशी तिहेरी भूमिका श्रीरंग देशमुख यांनी साकारली आहे. तो एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो. असे कॅप्शन लिहून सुबोध भावे यांनी आपल्या या नवीन सिनेमाची माहिती ट्विटरवरून चाहत्यांना दिली. सुबोध भावे नेमके कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहेत. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या सिनेमात सुबोध भावे यांचे सहकलाकार कोण असतील? या बदद्ल अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

 
 
 

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. सुबोध भावे यांचा आणखी एक उत्तम सिनेमा पाहायला मिळणार असा विश्वास दाखवत चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. ‘एक निर्णय’ या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता श्रीरंग देशमुख प्रथमच दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा कौटुंबिक कथेवर आधारित आहे. पुढील वर्षी १८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/