दासबोध दर्शन (उत्तरार्ध)
महा एमटीबी   12-Dec-2018
 

 
 
 

आजची तरुण पिढी समर्थ वाङ्मयाकडे आणि विशेषत: दासबोध अभ्यासाकडे वळली आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आजकाल बर्‍याच ठिकाणी दासबोध मंडळे स्थापन झाल्याचे आपण ऐकतो. त्यातून रामदासांच्या मनाच्या श्लोकांचे पठण व दासबोध ग्रंथाची पारायणे केली जातात. तथापि आजची तरुण पिढी चिकित्सक, अभ्यासू व संशोधनात्मक दृष्टीने दासबोधाचा अभ्यास करीत आहे, हे स्वागतार्ह आहे. मला वाटते की, या युवकांनी संशोधक दासबोध अभ्यासमंडळे स्थापन करून दासबोधाचा विविधांगी अभ्यास करावा.

 
या नंतरची पुढील पिढी संगणक वापरणारी, विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी असणार आहे. त्यांचे क्षेत्र जगभर असणार आहे. त्यांच्याद्वारा समर्थविचार ‘ब्रह्मांड भेदून पैलाड’ जाऊ शकतील! रामदास बुद्धिवादी संत होते. आजची पिढी दासबोधाचा चिकित्सक अभ्यास करीत आहे. त्याचा त्यांना जीवनघडणीस फायदा होईल. फक्त एकच पथ्य त्यांना पाळावे लागेल, ते म्हणजे रामदासांविषयी पूर्ण आदराची भावना ठेवून हा अभ्यास करावा. त्या अभ्यासाने आदराची भावना वृद्धिंगत होत गेली पाहिजे. विचार स्वातंत्र्याच्या नावावर अकारण द्वेष, मत्सरातून रामदासांची अकारण निंदा-नालस्ती करतात, त्याला थारा देऊ नये. कारण, रामदासांनी म्हटले आहे की,
 

जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।मत्सर धरी जो पुसा । तयास तेचि प्राप्त ॥ (दा. १.२.३८)

 

समर्थांच्या वाङ्मयात दासबोधाला ग्रंथराजाचे स्थान आहे. दासबोध ग्रंथाची रचना कशी झाली? त्यातील समासांच्या रचनेचा नेमका कालखंड कोणता असावा? त्या रचना रामदासांनी कुठे केल्या? त्यासाठी काय कारण घडले असावे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फारशी साधन-सामुग्री आजतरी उपलब्ध नाही. तथापि अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे काही अनुमान करून त्याचा शोध घेता येईल.

 

. स. १६४४ मध्ये कृष्णातीरी आल्यानंतर समर्थांचा शिष्यसमुदाय तयार होऊ लागला. तेव्हा शिष्यांच्या बोधासाठी इ.स. १६४७-४८ मध्ये समर्थांनी एकवीस समासी दासबोध सांगितला असावा. याला ‘जुना दासबोध’ असे संबोधले जाते. आळतेकरांनी त्याच्या ‘समर्थ चरित्र’ ग्रंथात लिहिले आहे की, ‘एकवीस समासी जुना दासबोध हा छोटा ग्रंथ समर्थांनी शके १५६६ (इ.स. १६४४) मध्ये कृष्णातीरी आल्यावर पुढील चार-पाच वर्षांमध्ये लिहिला असावा.’ शिष्यसंप्रदाय वाढत चालला तशा त्यांच्या वैचारिक अडचणी समोर येऊ लागल्या. तेव्हा ‘एकवीस समासी दासबोध’ हा त्रोटक आहे, हे समर्थांच्या लक्षात आले. त्यांनी इ.स. १६५८-५९ मध्ये सात दशकी दासबोध तयार केला. तसेच पूर्वी केव्हातरी लिहिलेला ‘ज्ञानदशक’ जोडून आठ दशकांचा दासबोध तयार झाला. ही दासबोधाची दुसरी आवृत्ती होय. त्यानंतर समर्थांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उपदेश केलेले अनेक स्फुट एकत्रित करून सध्या उपलब्ध असलेला २० दशकी २०० समासांचा दासबोध संकलित केला. त्या दासबोधाचे अखेरचे स्वरूप समर्थांच्या प्रयाणापूर्वी शके १६०० (इ.स. १६७८) च्या सुमारास तयार झाले असावे असे, पांगारकरांचे मत आहे. समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक ल. रा. पांगारकर त्यांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या ग्रंथात ते लिहितात, ‘एकवीस समासी’ शके १५७० (इ.स. १६४८) मध्ये लिहिला. ‘आठ दशकी’ शके १५८१ (इ.स. १६५९) मध्ये रचला आणि ‘वीस दशकी’ म्हणजे संपूर्ण दासबोध शके १६०० (इ.स. १६७८) मध्ये संकलित केला. दासबोध ग्रंथ याप्रमाणे तीन टप्प्यांनी झाला असावा, असे माझे अनुमान आहे.’ (संदर्भ पृ. २६१) अभ्यासकांच्या मते, जुन्या दासबोधातील ४, ५, ६ व ८ हे समास नव्या दासबोधात गुरूलक्षण (५.२), शिष्यलक्षण (५.३), वैराग्य निरूपण (३.१०), आत्मनिवेदन (१२.५) या क्रमाने आलेले आहेत. तसेच जुन्या दासबोधातील २१व्या समासातील ३२ पासून पुढील ओव्या नव्या दासबोधातील दशक ६.१० मध्ये जशाच्या तशा घेतल्या असून, या समासाचे नाव दोन्हीकडे ‘अनिर्वाच्य ब्रह्म’ असेच दिले आहे.

 

सध्या उपलब्ध असलेला २० दशकी २०० समासी दासबोध सलगपणे लिहिला गेला नाही हे जाणवते. बर्‍याच समासात पुढच्या समासाशी ताळमेळ नसतो. प्रत्येक समासाच्या शेवटी ‘इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे’ असा उल्लेख आहे. त्यावरून असे वाटते की, शिष्यसंवादात ऐनवेळी वेगवेगळे विषय निघत गेले व स्वामी त्यावर आपली मते मांडत गेले. त्यामुळे दासबोधात एकसंधपणा राहिला नाही. त्यातून समर्थांचे तत्त्वज्ञान सलगपणे शोधून काढणे फार अवघड होऊन बसते. कालमानाच्या त्रुटी जाणवतात. काही अभ्यासकांच्या मते, समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये २०वे दशक लिहून संपवला आणि लगेचच २२ जानेवारी, १६८२ला इहलोकाची यात्रा संपवली. याच काळात राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती तंजावरहून सज्जनगडावर येणार होत्या. या अखेरच्या गडबडीत दशक ७, समास १० मधील ‘सरली शब्दांची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।’ ही ४२वी दासबोध समाप्तीची घोषणा करणारी ओवी तेथून हटविण्याचे भानही राहिले नाही. तेवढा वेळ मिळाला नाही.

 

समर्थशिष्य दिवाकर भट्ट यांनी शके १५७६ (इ. स. १६५४) मध्ये शिवथर घळीहून बहिराम भट यांस लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, ‘श्री समर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथांस आरंभ केला.’ समर्थ शिवथर घळीला ‘सुंदरमठ’ म्हणत. या सुंदरमठात इ. स. १६५४ पासून दहा वर्षे राहून भक्ती, ज्ञान, कर्म, अध्यात्म, वैराग्य, प्रपंच या विषयांवर शिष्यांसाठी उपदेशपर ग्रंथ लिहावा असा समर्थांचा मानस होता. पण, मधूनमधून समर्थांना सुंदरमठ सोडून बाहेर जावे लागे. तथापि ‘सात दशकी दासबोध’ या ठिकाणी सलगपणे लिहिला गेला असावा. सातव्या दशकातील दहाव्या समासातील ४२वी ओवी ग्रंथ समाप्त होत असल्याचे सांगते.

 

‘सरली शब्दाची खटपट ।

आला ग्रंथाचा शेवट ।

येथ सांगितले पष्ट । सद्गुरूभजन ॥

 

यापुढील ओव्या उपसंहारात्मक आहेत. शिवथर घळीत दासबोधाचे ७ दशक सलग लिहिले गेले असावे, असे अनुमान काढायला जागा आहे. दासबोधातील ६.४ या समासात लेखनकालाचा अप्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे. ‘चारी सहस्र सातशे साठी । इतुकी कलयुगाची रहाटी।’ असा तो आहे. याचा अर्थ कलियुगाची ४७६० वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे अभ्यासकांच्या मते, ते वर्ष शके १५८१ होते. या वर्षी दासबोधातील ६.४ हा समास लिहिला गेला. हे मत आपणही पडताळून पाहू शकतो. हेच बघा ना, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या पहिल्या पानावर आजचा ‘युगाब्ध ५१२०’ असा उल्लेख आहे. तीच कलिची उलटून गेलेली वर्षे म्हणजेच कलियुगाब्ध आहे. समर्थांनी ६.४ हा समास लिहिला तेव्हा तो काळ ४७६० होता. याचा अर्थ तो काळ ५१२० - ४७६० = ३६० वर्षांपूर्वीचा होता. म्हणून आजच्या शकेतून ३६० वर्षे मागे गेल्यास तो काळ शके १५८१ होता, हे उघड होते. या कालमानाच्या उल्लेखाव्यतिरिक्त इतर ठिकाणी दासबोधात कुठेही कालमानाचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. तथापि काही प्रासंगिक उल्लेख दासबोधातून येतात, त्याच्या ऐतिहासिक संदर्भांवरून कालमानाचा अंदाज बांधता येतो. उदा. १८व्या दशकातील सहावा समास, या समासात पहिल्या १२ ओव्यांतून रामदासांनी अफझलखानाच्या भेटीवेळी शिवाजीस जो उपदेश केला त्याचा संदर्भ येतो.

 

‘ऐसे लौंद बेइमानी ।

कदापि सत्य नाही वचनी ।

पापी अपस्मार जनीं ।

राक्षस जाणावे ॥’ (दा. १८.६.५)

 

हे रामदासांचे अफझलखानाविषयीचे मत आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, शके १५८१ मार्गशीर्ष शु. ६ या दिवशी गुरुवारी दुपारी २ वाजता अफझलखान ठार झाला. यावरून दासबोधातील १८.६ हा समास शके १५८१ला लिहिला गेला असावा. नंतर जोडणीत तो १८व्या दशकात घेतला गेला, असे अनुमान काढता येते.

 
- सुरेश जाखडी  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/