जयद्रथाचा अडसर...
महा एमटीबी   12-Dec-2018
 

अभिमन्यूने द्रोणांवर मात करून चक्रव्यूहाचा भेद केला आणि आत प्रवेश केला. कौरवांच्या सैन्यात त्वरित भयाची लहर पसरली. त्यांना तर अभिमन्यू म्हणजे जणू यमच भासत होता. तो बाणांचा अक्षरश: पाऊस पाडत होता. कौरव सैन्यातील मृतांची संख्या क्षणोक्षणी वाढत होती, मदतीसाठी कौरव इकडेतिकडे पाहत होते. या अर्जुनपुत्राला थोपविणे त्यांना अशक्य भासत होते.

 
अभिमन्यूवर पहिला घाव दुर्योधनाने घातला. द्रोण त्याच्या मदतीस आले. त्यांच्या बरोबर मदतीला अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा, राधेय आणि शकुनि हे वीरही आले. सर्व वीर अभिमन्यूवर तुटून पडले तरी, अभिमन्यू शौर्याने आणि निर्भयतेने लढत होता. कुणालाच त्याची प्रगती थांबविणे शक्य नव्हते. भूरिश्रवा, दु:शासन आणि दुर्योधनाचे इतर बंधू अभिमन्यूला सामोरे आले. परंतु, अभिमन्यूच्या बाणाच्या वर्षावापुढे ते टिकूच शकले नाही. राधेय तर खूप जखमी झाला होता तरी, शल्य आणि राधेय लढत होते. कौरवांचे अनेक योद्धे माघार घेत होते. एका क्षणी तर बाण लागून राधेय धरणीवर पडला पण, तो लगेच उठून पुन्हा लढू लागला. अभिमन्यूच्या शौर्याची तुलना फक्त श्रीकृष्ण आणि अर्जुनाशीच होऊ शकत होती. शत्रूचे हजारो सैनिक त्याने यमसदनास धाडले. विविध अस्त्रांचा तो वापर करत होता. त्याच्या धनुष्यातून लाखो बाण सुटत होते आणि शत्रूचा अचूक वेध घेत होते. अभिमन्यूची प्रगती द्रोण कौतुकाने बघत राहिले. ते कृपाचार्यांना म्हणाले, “अभिमन्यू उच्च प्रतीचा धनुर्धर आहे. आज तो आपले चुलते युधिष्ठीर, भीम, नकुल आणि सहदेव यांचे सहजी रक्षण करतो आहे आणि निश्चितच कौतुकास पात्र आहे. मनात आले तर तो आपल्या पूर्ण सैन्याचा नाश करू शकतो, पण त्याने संयम बाळगला आहे, याचे आश्चर्यच म्हणावे लागेल! कदाचित आपल्या पित्यासाठी, अर्जुनासाठी हे कार्य राहू द्यावे असे त्यास वाटत असावे.
 

त्यांचे हे कौतुकाचे बोलणे दुर्योधनाला मात्र झोंबले. अशी शत्रूची प्रशंसा द्रोणांनी करावी हे त्याला आवडले नाही. तो राधेयाला म्हणाला, “आपले गुरुवर्य द्रोण एक महान योद्धे आहेत. त्यांना इंद्र किंवा यम पण युद्धात पराभूत करू शकत नाही. मनात आणले, तर ते या अभिमन्यूला सहज पराभूत करू शकतात. पण राधेया, हा अभिमन्यू त्यांच्या आवडत्या शिष्याचा, अर्जुनाचा पुत्र आहे ना, म्हणून ते त्याला दुखापत करू इच्छित नाहीत, असे दिसते. त्यांच्या या वागण्याचा हा पोर फायदा घेतो आहे. तो आपल्या सैन्याचा नाश करतो आहे. त्याच्या या आत्मविश्वासाचे मूळ द्रोणांच्या नरम वागण्यातच आहे.” दुर्योधनाचे हे भाष्य ऐकून दु:शासन पुढे आला आणि म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. आचार्य द्रोण याचा वध करतील अशी आशा करणे व्यर्थच आहे. आता मीच त्याला ठार मारतो,” असे म्हणून दु:शासनाने अभिमन्यूला युद्धाचे आवाहन दिले. दोघांची धुमश्चक्री सुरू होती. पण, काही वेळातच अभिमन्यूपुढे दु:शासन निष्प्रभ ठरला. त्याला रणांगणातून अक्षरश: पळ काढावा लागला. आता राधेय सामोरा आला, पण, त्याचीसुद्धा तशीच भंबेरी उडाली.

व्यूहाच्या आत शिरेपर्यंत पांडवांचे सारे योद्धे अभिमन्यूच्या मागोमाग आणि बरोबर होते. पण, जयद्रथ व्यूहाच्या तोंडाशी उभा राहिला आणि त्याने त्या सर्वांची वाट अडवली. इकडे अभिमन्यू मात्र व्यूहाच्या आत आत पुढे एकटाच जात राहिला! जयद्रथ इतर पांडव योद्ध्यांना एक तसूभर पण पुढे जाऊ देत नव्हता. शंकराने प्रसन्न होऊन जयद्रथाला एक वर दिला होता की, अर्जुन आणि कृष्ण जेव्हा युद्धभूमीवर नसतील तेव्हा जयद्रथाचाच विजय होईल. त्यामुळे तो पांडवांना रोखून धरण्यात यशस्वी झाला. युधिष्ठीराला आठवले की, अभिमन्यू म्हणाला होता त्याला फक्त व्यूहात आत शिरता येते आणि युधिष्ठीराने तर अभिमन्यूला सांगितले होते, “तू फक्त व्यूहात प्रवेश कर, आम्ही तुझ्या मागोमाग येऊन तो व्यूह मोडून काढू.” परंतु, आता युधिष्ठीर असाहाय्य नजरेने भीमाकडे बघत होता. तो काहीच करू शकत नव्हता. भीमानेही अत्यंत करूण नजरेने युधिष्ठीराकडे पाहिले, दोन्ही वीरबंधू हताश नजरेने एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांची ती नजरानजर पाहून स्वर्गातले देव पण हेलावून गेले असणार!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/