समाज ‘सेवक’ अमोल
महा एमटीबी   11-Dec-2018

 


 
 
आपल्या ‘मानव’ या आडनावाप्रमाणे आज अमोल तळागाळातील, वंचित लोकांसाठी आपल्या ‘सेवक फाऊंडेशन’ द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
 

अमोल मानव नाव ऐकताना जरा वेगळं वाटत असेल. ‘मानव’ असं कुठे आडनाव असतं का, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऐन विशीतील हा तरुण अमोल राठोड म्हणजेच, सेवक ‘अमोल मानव.’ महाराष्ट्रभर तो ‘अमोल राठोड’ नाही, तर ‘अमोल मानव’ नावाने ओळखला जातो. तुम्ही म्हणाल की, त्याला आडनावाची चीड वगैरे असेल. मात्र, आपल्या नावापुढे त्याने ‘मानव’ लावण्याचं एकमेव कारण म्हणजे, आपल्यातील माणूस कायम जागा राहावा आणि आपलं नाव घेतल्यानंतर माणूसपणाची जाणीव व्हावी. अमोलच्या याच विचाराने तुम्ही अंदाज बंधू शकता की, हा तरुण नेमकं काय काम करत असेल. आपल्या आडनावाप्रमाणे तो तळागाळातील, वंचित लोकांसाठी आपल्या ‘सेवक फाऊंडेशन’ द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. अमोलचा जन्म एका गरीब कुटुंबातला... अगदी उमलत्या वयात आई-वडिलांचे मायेचे छत्र हरवलेल्या अमोलने कधीही कुठल्याही प्रसंगांत हार पत्करली नाही. आयुष्याने पदरात भटकेपण टाकलं असलं तरी, न रडता, न थकता आयुष्य जगायचं आणि आपल्या वाटेला आलेलं दुःख इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून काम करायचं ठरवून अमोल मोठ्या जिद्दीने भटकतो आहे.

 

अमोलने लहानपणापासून घरातील अठराविश्व दारिद्य्राच्या झळा अगदी जवळून अनुभवल्या. त्यामुळे गरिबी, गरिबांचे प्रश्न, त्यांचे जीवन, त्यांच्या गरजा याची त्याला पूर्ण कल्पना होतीच. म्हणूनच मग आपण आपल्या माणसांसाठी लढलं पाहिजे, हे अमोलने मनोमनी ठरवून टाकलं. कारण, आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतात. इतर कोणी येऊन ते सोडवणार नसल्याचे त्याला माहीत होतं. ज्या वयात मुलं महाविद्यालयीन आयुष्याचा आनंद लुटतात, त्याच वयात अमोल पाड्यावर व तांड्यावर जाऊन आपल्या बांधवांच्या गरजा शोधून त्या सोडविण्यासाठी झटतो आहे. बाबा आमटेंच्या कामाचा आदर्श समोर ठेवून अमोल महाराष्ट्रभर सेवकांची बांधणी करत हिंडतोय. १० ऑक्टोबर, २०१३ रोजी त्याने ‘सेवक फाऊंडेशन’ची स्थापना करत आपल्या कामाला एक रचनात्मक वाट करून दिली. आपल्या कामाविषयी अमोल सांगतो की, “२००३ साली माझे वडील गेल्यानंतर २०१२ रोजी आईचंदेखील निधन झालं. आपल्या संघर्षाबद्दल, ध्येयाबद्दल अमोल म्हणतो, “लहानपणापासूनच अठराविश्व दारिद्र्य नशिबी आल्याने व २००३ साली वडील गेल्याने नऊ वर्षे माझ्या आईने प्रचंड संघर्ष केला. तिची सर्व हयात आमच्या घरातील भुकेचे प्रश्न सोडवण्यातच गेली. कुटुंबात आईनंतर मीच मोठा असल्याने अनेक जबाबदाऱ्या नकळतपणे माझ्यावर पडल्या. बालपणापासूनच मलादेखील अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. आईचं निधन झालं, त्यावेळी मी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला होतो. त्यानंतर आर्थिक, मानसिक, भावनिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आपल्यासारख्या निराधार बालकांसाठी आपण काहीतरी करावं, हा मानस बाळगून मी १० ऑक्टोबर, २०१३ पासून अनाथ, निराधार बालकांसाठी सातत्याने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आलो आहे. कारण, आपल्या सारखं जीणं आपल्या इतर कोणाच्या नशिबी येऊ नये.” अमोल मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने त्याची जन्मभूमी असलेल्या पाथर्डी तालुक्यात अनाथ व निराधारांसाठी काम करत आहे.

 

ग्रामीण भागातील अनाथ, निराधार बालकांचा शिक्षण, आरोग्य, संस्कार, संरक्षण आणि काळजी या घटकांचा विकास साधण्यासाठी २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत अमोल आपल्या ‘सेवक परिवारा’च्यावतीने कार्यरत आहे. निराधार बालकांसोबतच विधवा माता, वृद्ध आजी-आजोबा, मनोरुग्ण आणि एकूणच निराधार, निराश्रित लोकांसाठीदेखील तो काम करतो आहे. सामाजिक आणि शैक्षणिक विकासासोबत ग्रामविकासावर देखील त्याने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाक्षर, दिवाळी भेट, एक ओंजळ धान्य, समाज मानव शिबीर, बालसंस्कार शिबीर, सेवक करंडक, सेवक व्याख्यानमाला, वेदनेची टाळी अन् पाळी यांच्यासह अनेक सामाजिक उपक्रम अमोलने आतापर्यंत राबविले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांचा बौद्धिक विकास व्हावा व त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी तो शक्य असेल त्या गावात वाचनालय सुरू करतो आणि तो ते यशस्वी चालवतो. ‘सेवक परिवार’ हा फक्त अहमदनगर आणि अमोलपुरता मर्यादित राहिला नसून नगर, पुणे, सोलापूर जळगावसह विविध जिल्ह्यांमध्ये ‘सेवक’चा कार्यविस्तार झाला आहे‘सेवक फाऊंडेशन’तर्फे युवकांच्या सशक्त संघटनाची साखळी एका-एका कडीने जोडली जात असून आजमितीला १५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत ४०० पेक्षा अधिक महाविद्यालयीन युवक ‘सेवक’ म्हणून अमोलच्या परिवारासाठी अनमोल योगदान देत आहेत. अमोलच्या या सेवाकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/