‘झुंड’च्या सेटवर दोन विजय समोरासमोर
महा एमटीबी   11-Dec-2018

 


 
 
नागपूर : अभिनेते अमिताभ बच्चन हे सध्या नागपूरमध्ये ‘झुंड’ सिनेमाची शुटींग करत आहेत. स्लम सॉकर अर्थात झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा सुरु करणाऱ्या प्रा. विजय बारसे यांच्या कार्यावर ‘झुंड’ या सिनेमाची कथा आधारित आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात विजय बारसे यांची भूमिका साकारणार आहेत. नुकतीच ‘झुंड’च्या सेटवर या रील आणि रिअल अशा दोन्ही विजयची एकमेकांशी भेट झाली.
 

नागपूरच्या मोहननगरमधील सेंट जॉन शाळेत ‘झुंड’ सिनेमाचा सेट उभारण्यात आला आहे. झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाद्वारे सुधारणा घडवून आणण्याचे कार्य प्रा. विजय बारसे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन हे शुटींगनिमित्त नागपुरमध्ये राहत आहेत. परंतु काही दिवसांसाठी प्रा.विजय बारसे हे नागपूर शहराबाहेर होते. त्यामुळे त्यांची आणि महानायकाची भेट होऊ शकत नव्हती. परंतु सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या दोघांची भेट घडवून दिली. या भेटी दरम्यान अमिताभ यांनी प्रा. विजय बारसे यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

बारसे यांच्या कार्याबद्दल ऐकून मी खूपच प्रभावित झालो. त्यामुळेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मला ‘झुंड’ या सिनेमाची कथा ऐकवल्यावर मी नकार देऊ शकलो नाही. तुमचे कार्य खूप मोठे आहे. ‘झुंड’ या सिनेमाद्वारे या कार्याबद्दल सर्वांना कळावे. म्हणून मी ही भूमिका साकारत आहे.अशा शब्दांत अमिताभ यांनी विजय यांच्या कार्याचा गौरव केला. अमिताभ यांच्याशी झालेल्या या भेटीबद्दल प्रा.विजय बारसे यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. महानायकाच्या भेटीमुळे खूप आनंद झाला. असे बारसे यांनी म्हटले. ही भेट जरी अवघी पाच मिनिटांपुरती होती. तरीदेखील माझ्यासाठी ती अविस्मरणीय होती. असे विजय म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/