‘रात्रीस खेळ चाले’ मालिका पुन्हा येणार?
महा एमटीबी   10-Dec-2018

 


 
 
मुंबई : झी मराठी वहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरु आहे. कोकणात या मालिकेचे शूटिंग करण्यात आले होते. कोकणातील प्रथा, अंधश्रद्धांवर आधारित या मालिकेचे कथानक होते. कोणताही सुप्रसिद्ध मोठा कलाकार या मालिकेत नसूनही ही मालिका घराघरांत पाहिली जात होती.
 

अंधश्रद्धेकडे झुकणाऱ्या मालिकेला विरोध करण्यात आला होता. या मालिकेत दाखविण्यात आलेल्या कथेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होईल. लोकांचे कोकणाबद्दलचे गैरसमज वाढतील. अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यासंदर्भात चिपळून येथील पोलीस स्टेशनमध्ये मालिकेविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली होती. असे असताना देखील या मालिकेने २०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला होता.

 
 
 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला खरा, परंतु मालिकेत नाईकाच्या वाड्यात घडणाऱ्या काही घटनांमागचे रहस्य हे प्रेक्षकांसाठी एक कोडेच राहिले. त्यामुळे आता मालिकेचा पुढील भाग आला तरी त्यातील रहस्य उलगडणार का हे पाहण्याजोगे असेल. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे.

 

या प्रोमोमधील व्हिडिओला रात्रीस खेळ चाले या मालिकेचे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी ही मालिका पुन्हा आणत आहे. असा अंदाज बांधण्यात येत आहे. मालिकेतील अभिराम, दत्ता, नेने वकील, सुशल्या, आर्चीस, पांडू, विश्वासराव या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/