अभिमानाची लढाई
महा एमटीबी   10-Dec-2018
 

आपण दुसर्‍याला समजून घेत स्वत:च्या मनाची मांडणी केली, तर सगळ्या गोष्टी आपोआप नैसर्गिकरीत्याच नियोजित व्हायला लागतात. त्यासाठी खूप कष्ट करायची गरज नाहीच. पण प्रत्येक वेळी तिला/त्याला इतकी साधी गोष्ट समजावून घेता येत नाही. इतकी अक्कल नाही. आपण स्वतःच आपले डोळे व कान बंद करतो. दुसरीच माणसे कशी वाईट आहेत या आभासात राहतो. मग आपल्यातील सहिष्णुता, माणुसकी लोपत जाते.

 

कित्येक वेळा अनेक गोष्टी आपल्या मनाला एखाद्या भोवर्‍यात अडकवितात. तो भोवरा असतो, मनातल्या गोंधळाचा, अतृप्त भावनांचा. चुकीच्या समजुतीचा, असमाधानाचा व कधी कधी कित्येक शोकांतिकांचा... एकदा यात माणूस अडकला की, कितीही हात-पाय मारा पण, बाहेर येणे कठीण होऊन जाते. जितका जास्त बाहेर यायचा प्रयत्न आपण करतो, तितके अधिक आत खेचले जातो. कारण, भोवर्‍याचा वेग जबरदस्त असतो व आपली स्वत:ला वाचवायची ताकद मात्र कमी पडते. यासाठी आपल्या पचनी पडेल अशी गोष्ट म्हणजे, आपण आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती व माणसांना नीट समजून घ्यायला हवे, तर आपलं लक्ष भरकटत जाणार नाही. आपण एक छोटीशी गोष्ट जी केवळ आपल्याच हातात असते ती करतो. म्हणजे इतरांना समजून घेतो. इतरांनी आपल्याला समजून घ्यायला हवे, यासाठी आकांडतांडव मुळीच करीत नाही. बघा, कित्येक वेळा नवरा-बायकोत भांडणे होताना आपण त्यांची भांडणातील वाक्ये पाहिली, तर अगदी साध्या गोष्टीपासून गंभीर गोष्टीवरसुद्धा त्यांचे एकमेकांबद्दल गैरसमज असतात. उदा. तिच्याच मनात अढी आहे वा त्याला काही कळत नाही. इतकेच काय बर्‍याचवेळा संशयकल्लोळ पण यामुळेच होतो. यासाठी साधी, सरळ, सोपी गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाला समजून घ्या. मग आपल्या मनातला अग्नी भडकणार नाही. यामुळे आपला एक सुसंवाद निर्माण होईल. एखादे मूल वा एखादी मोठी व्यक्ती ही अशी का वागते? तिची पार्श्वभूमी काय? ती स्वत: असुरक्षित वातावरणातून आली आहे का? त्यांना नक्की काय म्हणायचे आहे? काय व्यक्त करायचे आहे? अगदी परवाच आम्ही आमच्या गाडीने बाहेरगावी चाललो होतो. आमचा वाहनचालक योग्य वेगाने रमत-गमत गाडी चालवत होता. अचानक हॉर्न वाजवत एक दुसरी मोठी गाडी आमच्या गाडीसमोर आली. पुढचा अर्धा तास ती गाडी आमच्या गाडीसमोरच आम्हाला जणू खिळवून ठेवल्यागत राहिली. आमचा ड्रायव्हर एव्हाना चिडायला लागला होता.

 

रस्त्यात ड्रायव्हर्स एकमेकांच्या चुका काढू लागले व स्वतःच्या डोक्यात राख घालून घेतली की, इतरांची पुरती वाट लागते. प्रसंग मारामारीवर येऊ शकतो. तेवढ्यात माझी छोटी भाची म्हणाली, “अगं तो खूप आधीपासून हॉर्न वाजवत होता. त्याला आपल्यापुढे जायचे होते. पण आपण काही त्याला भीक घातली नाही. म्हणून तो आता असा बदला घेतो आहे.” असेच पुढे एका हॉटेलसमोर त्याची गाडी थांबली. गाडीतली माणसे चहा प्यायला उतरली होती. आम्हीसुद्धा उतरलो. तेवढ्यात आमचा ड्रायव्हर म्हणाला, “मी त्याला जरा बरोबर करतो.” मी म्हटले, “ ‘बरोबर’ वगैरे नको.” मीच त्या ड्रायव्हरला शांतपणे विचारले, “काय झाले भाऊ?” तो मराठीच होता. तो म्हणाला, “तो काय स्वतःला अति शहाणा समजतो. रस्ता काय त्याच्या बापाचा आहे? मी चालवून घेणार नाही.” कुठेतरी हा ड्रायव्हर माणूस अकारण दुखावला होता व गरम डोक्याचा होता. मी एवढेच त्याला म्हटले, “बाबा, असे काही नाही. तू पुढे हो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही.”

 

आपण दुसर्‍याला समजून घेत स्वत:च्या मनाची मांडणी केली, तर सगळ्या गोष्टी आपोआप नैसर्गिकरीत्याच नियोजित व्हायला लागतात. त्यासाठी खूप कष्ट करायची गरज नाहीच. पण प्रत्येक वेळी तिला/त्याला इतकी साधी गोष्ट समजावून घेता येत नाही. इतकी अक्कल नाही. आपण स्वतःच आपले डोळे व कान बंद करतो. दुसरीच माणसे कशी वाईट आहेत या आभासात राहतो. मग आपल्यातील सहिष्णुता, माणुसकी लोपत जाते. पण दुसर्‍याला समजून घ्यायची सहिष्णुता जर आपल्यात असेल, तर आपण अगदी सहजपणे स्वत:ला वाईट विचारांपासून किंवा कृतींपासून आवरू शकतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या प्रगल्भ मनाची अनुभूती पोहोचतेही. दोन व्यक्तींमधील सुसंवाद यामुळे टिकू शकतो. माणसा-माणसांना समजून घ्यायची प्रक्रिया मुळातच माणुसकीच्या भूमीवर टिकून राहते. अभिमान, द्वेष व बदला या भावना कुठे उडून जातात, हे आपल्या लक्षातही येत नाही. एक आई आपल्या मुलीला शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा ओळखीच्या नातेवाईकांशिवाय कुठे जाऊच देत नव्हती. त्यामुळे त्या मुलीला आपल्यावर खूप अन्याय होतो आहे व बंधन पडते आहे, असे वाटे. त्या दोघींची सततची भांडणे शेवटी पराकोटीला पोहोचली होती. अगदी आत्महत्येपर्यंत वेळ आली होती. यावेळी आईशी बोलताना जाणवले की त्या आईची लहान बहीण तिला मिळालेल्या मोकळ्या स्वातंत्र्यामुळे वाहत गेली होती.

 

अगदीच कामधंदा नसलेल्या, वाया गेलेल्या दारुड्या मुलाशी तिने लग्न केले होते. आज ती रस्त्यावर आली आहे. आपल्या लहान बहिणीच्या आठवणीचे आईच्या मनावर प्रचंड दडपण होते व त्यामुळे ती आपल्या मुलीवर बंधने आणत होती. अशावेळी तिच्या आईची भूमिका मुलीला समजावली व मुलीनेही मग आईला विश्वास दिला की, ती अशी वाहवत जाणार नाही. तेव्हा कुठे दोघींमधील कलह मिटला. त्या दोघी एकमेकींशी खूप आपुलकीने वागू लागल्या. म्हणजे आपलीच बाजू आक्रमकतेने सिद्ध करण्यापेक्षा गरज होती, ती एकमेकांना समजून घेण्याची. प्रत्येकीला वाटायला हवे होते की, माझी समस्या दुसरीला कळते. यातूनच परानुभूतीचे उत्तुंग नाते सुरू होते व अभिमानाची लढाई संपते. मग एकमेकांवरचा फुकाचा संताप राग संपतो व एकमेकांबद्दल एक शुद्ध भावनिक नाते निर्माण होते. गैरसमज उरत नाही. यामुळे संवाद साधणे सोपे होते. लोकांना मग आपले मत समजले आहे, हे कळते व सर्व नात्यांत मग ते रक्ताचे असो, जवळचे असो, लांबचे असो किंवा नुसते परिचयाचे असो, त्यात गोडी निर्माण होते. आपल्याला फक्त आपल्या डोळ्यात एक नजर हवी असते. ती म्हणजे आपलेपणाची, दुसर्‍याला समजून घेण्याची.

 
-  शुभांगी पारकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/