‘महाजन पुरस्कार’ विजेत्या अश्विनी मयेकर
महा एमटीबी   01-Dec-2018गेल्या रविवारीच ‘सा. विवेक’च्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांना ‘मधुकरराव महाजन स्मृति पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने काही वर्षांपूर्वी अश्विनी मयेकर ‘मुंबई तरुण भारतमध्ये कार्यरत असताना त्यांचे संपादक राहिलेल्या सुधीर पाठक यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या या कौतुकास्पद भावना...


सजनाचे, नवसाहित्य रचनेचे मनमोर जिच्या मनात सदैव नर्तन करीत असतात, त्यातून साहित्य तर निर्माण होतेच, पण काही कारणास्तव त्याचा प्रवास पुस्तक निर्मिती पावेतो मात्र होत नाही. अशा अश्विनी मयेकरला यंदाचा ‘मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार’ मिळाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अश्विनी आज ‘सा.विवेक’सारख्या वैचारिक विचारपत्राची कार्यकारी संपादक आहे. अशा संपादिकेला म्हणजेच संपादकांच्या नवीन पिढीला हा पुरस्कार मिळतो, ही बाब मला स्वत:ला पहिली पिढी दुसऱ्या तरुण पिढीच्या हातात शर्यतीचे बॅटन देते आहे, याचे प्रतीक वाटते. अश्विनी मयेकरांचा माझा संबंध आला तो २००२ साली, ज्यावेळी मी ‘मुंबई तरुण भारत’चा संपादक म्हणून रुजू झालो. तेव्हा १४ जानेवारी, २००२ रोजी ‘नागपूर तरुण भारत’ने विशेष जबाबदारी म्हणून मुंबईला संपादक म्हणून पाठविले. त्यावेळी ‘मुंबई तरुण भारत’च्या सहकाऱ्यांपैकी कुणाचाही माझा परिचय नव्हता. मी मुंबईला रुजू होतो आहे, ही बातमी ‘मुंबई तरुण भारत’मध्ये आली आणि डोंबिवलीतील माझ्या सासुरवाडीच्या नातेवाईक लताताई वैशंपायन यांनी फोन करून सांगितले की, “आमची अश्विनी ‘मुंबई तरुण भारत’मध्ये आहे.” तेवढाच काय तो ओळखीचा धागा. पुढे रुजू झाल्यावर सर्वांशी ओळख झाली व जाणवलं की, राजकीय बातमीदारीची अश्विनीला आवड नसली तरी, तिच्यातील साहित्यिक रुची आपल्या मदतीला येऊ शकतेकुणी एक सहकारी अन्यत्र गेला अन् ‘आसमंत’ या ‘मुंबई तरुण भारत’च्या साहित्य पुरवणीची जबाबदारी अश्विनी मयेकरवर मी दिली. मध्यंतरीच्या काळात खूप पाणी गंगेतून वाहून गेले. हा पुरस्कार घेतल्यावर जेव्हा अश्विनीची व माझी भेट झाली, त्यावेळी तिने सांगितले की, “या कार्यक्रमाला राज्यपाल डॉ. पद्मनाभ आचार्य प्रमुख अतिथी होते. त्यांनी पूर्वांचलबाबत खूप माहिती दिली.” त्यांची मुलाखत घेऊन ती ही माहिती ‘सा. विवेक’ला देत आहे. तेव्हा खात्री पटली की, सृजनाचे मनमोर जिच्या मनात सदैव नर्तन करीत असत, ती आता राजकीय बातमीदारीतही चांगली तयार झाली आहे आणि सहजतेने मनाची खात्री पटली, ही अश्विनी संपादकपदासाठी चांगली पात्रता ठेवून आहे व पुरस्काराचीही खरी मानकरी आहे.

 

‘मुंबई तरुण भारत’मध्ये असताना गोध्रा येथे रामसेवकांना जीवंत जाळण्याचा व त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळण्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे त्यावर्षीचा दिवाळी अंक हा फाळणीवर बेतला होता. त्यावर विश्वास चक्रदेव यांनी अत्यंत प्रभावी मुखपृष्ठ तयार केले होते. फाळणीनंतर बंदी आलेल्या कथांवरील या अंकाच्या निमित्ताने अश्विनीची सृजनशीलता उफाळून आली होती. संपादक म्हणून माझे नाव त्या अंकावर असले तरी, संपादनाचे श्रेय अश्विनीचे होते. त्या अंकाचे विमोचन ख्यातनाम साहित्यिका प्रा. प्रभा गणोरकर यांनी केले होते. त्यांनीही आपल्या भाषणातून अश्विनीच्या निर्मिती क्षमतेला व साहित्य रुचीला कौतुकाची पावती दिली होती. त्या अंकाच्या वेळी एक मोठी गंमत झाली. सामान्यत: दिवाळी अंक पहिले फॉर्म सोडून बांधला जातो. फक्त पहिला फॉर्म राहिला होता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अंकाचे विमोचन होते. हा शेवटचा म्हणजे पहिला फॉर्म (जो सामान्यत: जाहिरातींचा असतो) सकाळी ७ वाजता सोडायचा होता. रात्री ११ वाजता मी कार्यालय सोडले व घरी गेलो. रात्री १ वाजता फोन खणाणला व अंकातील माझा सहकारी अनंत पाठक याने सांगितले, “सर, चार जाहिराती रद्द झाल्या आहेत. तिथे काय टाकू? अंकाची अनुक्रमणिकाही छापून तयार आहे.” हाच फोन अश्विनीलाही गेला होता. तिलाही काय करावे कळत नव्हते. मी झोपण्याचा सल्ला दिला व स्वत:ही झोपी गेलो. तासभरातच झोपेतून उठलो आणि ‘कम्युनिस्टांचे फाळणीतील योगदान’ या विषयावर लेख लिहायला लागलो. पहाटे ५ वाजता टॅक्सीने वडाळा कार्यालयात गेलो. अनंत पाठकला उठविले. लेख कंपोज करून दिला.

 

जाहिरातींऐवजी हा लेख छापून अंक ७ वाजता छपाईला दिला. अनंत व मी आम्ही दोघेही घरी गेलो. अनुक्रमणिकेत नसलेला लेख अंकात पहिल्या क्रमांकावर होता. २ वाजता अंकाचे विमोचन होते. दीड वाजता दोघेही कार्यालयात आलो. पाठोपाठ अंकही आला. जाहिरातींऐवजी लेख बघून अश्विनी आश्चर्यचकीत झाली. हा लेख आला केव्हा? कंपोज केव्हा झाला? फॉर्म किती वाजता गेला? हे प्रश्न तिच्या नजरेतून जाणवत होते. त्याचे उत्तर अंक विमोचनानंतर अनंतने कार्यालयात दिले. ही सर्व माहिती अनंतने तिला का दिली नाही, म्हणून तिने नंतर त्याला सज्जड दमही नंतर दिला असावा. याच काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याच्या वृत्तसंकलनासाठी ‘मुंबई तरुण भारत’ने अश्विनीलाच पाठविले होते. तिनेही अत्यंत वेगळ्या शैलीत वृत्तसंकलन करून सर्वांची दाद मिळविली होती. त्या वेळी जाणवलं की, शं. ना. नवरे, प्रकाश संत, त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित वगैरे साहित्यिक मंडळींशी अश्विनीचे चांगले गुळपीठ आहे. नवसृजनाचा मनमोर त्यामुळे थुईथुई तिच्या मनात नाचत असतो. यालाच पुरावाच तिची पत्र या साहित्यिकांना मिळत असे. अश्विनीने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ‘मास कम्युनिकेशन’ या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली. त्यावेळी लघु शोधप्रबंध सादर करावा लागत असे. तिने ‘सुमित्रा भावे यांची सर्जनशीलता’ हा बऱ्यापैकी कठीण विषय घेतला होता. त्या विषयाला विभाग प्रमुखांपासून सर्वांनी विरोध केला होता. पण, अश्विनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि पुढे तिचाच शोधप्रबंध सर्वोत्तम ठरला. परीक्षकांनी तर तसे मत व्यक्त केलेच, पण, सुमित्रा भावेही प्रसन्न झाल्या. खरंतर हाच विषय घेऊन तिनेे पीएच.डीदेखील केली असती, तर ‘डॉ. अश्विनी मयेकर’ अशी नोंद करता आली असती. काही दिवसांतच अश्विनीने ‘मुंबई तरुण भारत’ सोडले आणि मीही नागूपरला परत गेलो. पण तोवर कृष्णकांत, सदया, पार्थ, अश्विनीचे वडील अरविंद मराठे, तिची आई, भाऊ, यांच्याशी चांगली गट्टी जमली होती. नवसृजनाच्या या प्रेरणेची अनुभूती पुन्हा जाणवली ती, ‘सावित्रीच्या लेकी’ या सामाजिक परिचयाने! त्या मालिकेत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या शुभदा देशमुख व डॉ. सतीश गांगुलवार यांच्यावरही तिनं लिहिले होते. लहानग्या पार्थला बरोबर घेऊन त्यासाठी कोरची येथील डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचे ‘सर्च’मधील काम तिने बघितले होते. त्यातून स्फूर्ती घेत तिच्यातील नवसृजनाचा पुन्हा परिचय झाला. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. खूप छान लेखही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. ‘सा. विवेक’पूर्वी काही वर्षे ती दूरदर्शनवर होती. त्यावेळी सामाजिक माध्यमांवर तिने ‘भिज पाऊस’ या शीर्षकाखाली फार सुरेख ललितबंध सादर केले होते. खरं म्हणजे त्याचंही एक छानसं पुस्तक मराठी सारस्वतातील उत्तम ललितबंध ठरले असते.

 

अश्विनीने नंतर ‘सा.विवेक’मध्ये काम स्वीकारले व काही काळातच ती कार्यकारी संपादिका झाली. तिचे वडील अरविंदराव हे आर्थिक क्षेत्रातील ‘दादा’ माणूस होते. त्यांना नेहमीच वाटत असे की, नवसृजन वगैरे हा भाग छंद म्हणून ठीक आहे, पण पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा असला पाहिजे व पैसा देणारा असला पाहिजे. त्यातूनच जाहिरात एजन्सी निर्माण झाली व त्या एजन्सीने उद्योगाचा विक्रम केला. तशी अवस्था ‘सा. विवेक’मध्येही झाली. साहित्यनिर्मिती ऐवजी व्यवसाय व आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारीही तिने ओढून घेतली. त्यामुळेच दिवाळी अंक कसा होता, याचे उत्तर “मलाही धंदा उत्तम कळतो,” असे द्यावे लागते व ती सांगू लागली, “मागच्या वर्षीपेक्षा जाहिराती कमी आहेत. दोन-तीन लाख रुपये तरी अजून हवे होते.” अंकाच्या गुणवत्तेबद्दल एकही शब्द न बोलता आमची चर्चा संपली. जाणवून गेले की ‘स्वप्नातल्या धुंद कळ्यांचे’ पर्व आता संपून एक प्रभावी कार्यकारी संपादिका आता घडत आहे. घडलेल्या कार्यकारी संपादिकेचे स्वागत करताना व ‘महाजन पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत असताना असे वाटून जाते की, अश्विनीने बाप-लेकीच्या प्रेमाचा एक सुरेख बंध उभयंतांनी आपापल्या जीवनात साकारला असताना, तिने आपल्या वडिलांबद्दल म्हणजेच अरविंदरावांबद्दल भरभरून लिहायला हवे होते. पण, ते अजून राहून गेले आहे. त्या प्रेमाचे जगावेगळे बंध मराठी साहित्यात अनोखे समूह करून गेले असते. अजूनही वेळ गेलेली नाही.

 

-सुधीर पाठक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/