‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ book my show वर नं.१
महा एमटीबी   01-Dec-2018 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी रंगमंचावर आलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक बुक माय शोवर नंबर.१ ठरले आहे. बुक माय शो ही ही एक तिकीट बुकींग साइट आणि अॅप आहे. यावरून सिनेमे, नाटक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी तिकीट बुकींग करता येते. बुक माय शोवर पहिल्यांदाच एका मराठी नाटकाला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे नाटक बुक माय शोवरील आपले प्रथम स्थान टिकवून आहे.
 
 
 

नाट्यरसिकांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या नाटकाचे सर्वच शो सध्या हाऊसफुल्ल ठरत आहेत. त्यात बुक माय शोवर पहिले स्थान मिळाल्यामुळे या नाटकाचे कलाकार आणि सर्व टीमच्या आनंदात भर पडली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वत: आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाला मिळत असलेल्या यशाबद्दल प्रशांत दामले यांनी नाट्यरसिकांचे आभार मानले.

 
 वाचा संबंधित बातमी :  एका लग्नाची 'हाऊसफुल्ल' गोष्ट
 
 
१९९८ साली ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर गाजले होते. अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मढेकर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. तसेच ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?’ आणि ‘ही परी अस्मानीची’ ही या नाटकातील गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या रुपाने प्रेक्षकांचे लाडक्या व्यक्तिरेखा मन्या आणि मनी पुन्हा एकदा रंगमंचावर उतरल्या. त्यांच्या संसाराची पुढची गोष्ट पाहण्यासाठी नाट्यगृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी होत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/