कै. अरविंदराव देशपांडे एक सदा प्रसन्न व्यक्तिमत्व
महा एमटीबी   01-Dec-2018 
 
 
दि. २७ नोव्हेंबरला सकाळी अरविंदराव देशपांडे गेल्याचा फोन आला आणि जवळजवळ ५० ते ५२ वर्षांतील त्यांच्या सहवासातील आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. त्यांच्या माझ्या वयात जरी १२ ते १३ वर्षांचे अंतर असले तरी, आमची मैत्रीच होती. त्यांचा स्वभाव व वागणे इतके मोकळे व प्रामाणिक होते की, ते कोणाचेही मित्र होऊ शकत असत. त्यात मग वय, शिक्षण अशा बाबींचा कधीच अडथळा उत्पन्न होत नसे. अत्यंत प्रसन्न असे व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते. मला वाटते ही प्रसन्नता जी होती ती त्यांना संघनिष्ठेतून आणि संघाविषयी मनात असलेल्या समर्पण भावनेतून स्वाभाविकपणे आलेली होती.
 
 
वास्तविक लौकिक दृष्टीने ते एलआयसीमधील एक कर्मचारी होते. साधीच नोकरी होती. खूप मोठा पगार मिळत होता, असे नाही. हल्ली ज्याला ‘उच्च मध्यमवर्गीय’ म्हटले जाते, अशीही आर्थिक स्थिती नव्हती. तरी परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता जी मी ५० ते ५२ वर्षांपूर्वी अनुभवली होती, ती तशीच १५ दिवसांपूर्वी त्यांना दवाखान्यातून घरी आणले तेव्हाही मी अनुभवली. तीच प्रसन्नता काही वर्षांपूर्वी एचपीटी महाविद्यालयासमोरील डॉ. शिंदेंच्या दवाखान्यात मोठे ऑपरेशन झाल्यावरही होती. तीच प्रसन्नता त्याच्या घरी चोरी होऊन चोरांनी सगळे घर धुवून नेल्यानंतरही होती. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी या प्रसन्नतेचे वर्णन करताना म्हटले आहे, ’प्रसादे सर्व दु:खानां हानिरस्योप जायते । प्रसन्न चेतसोह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते.’ प्रसन्नता हा स्थितप्रज्ञाचा गुण म्हणून सांगितला आहे. अशी दैवी प्रसन्नता लाभलेले अरविंदराव एक स्थितप्रज्ञच होते, असे म्हणता येईल. या मुळेच ते कधीच उद्विग्न निराश हतबल झालेले कोणाला दिसले नाहीत. त्यांची भेट झाली आणि खळखळून हसलो नाही असे कधीच झाले नाही. १९६९ साली त्यांच्या बरोबर संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेण्याचे भाग्यही मला लाभले. ते जुन्या नाशिकमध्ये बुधवार पेठेच्या कोपऱ्यावर त्यांच्या मामांच्या वाड्यात राहत असताना भवानी मंडलाचे काम पाहत. त्याच भागातील भवानी सायं शाखेचे काम माझ्याकडे होते. त्या वेळी त्यांच्या उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण संपर्कातून अनेक नवीन नवीन कार्यकर्ते जोडले गेले होते. शंकरराव शिंदेंसारख्या जुन्या कर्मठ कार्यकर्त्यांपासून ते ज्ञानेश्वर औसरकरसारख्या नवीन तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची त्यांची शैली विशेष होती. ए.पी हा सर्वांना जोडून ठेवणारा एक बळकट दुवा होता. आमच्या १५ दिवसांपूर्वीच्या झालेल्या भेटीतही त्यावेळच्या काही आठवणी निघाल्या होत्या.
 

पांढरा शुभ्र पायजमा त्यावर पांढराच कोपरापर्यंत बाह्या वळवलेला असा झब्बा, कपाळावर मध्यभागी पांढरा टिळा हाच त्यांचा वेश कायम असे. त्यांच्या अंगावर रंगीत कपडे क्वचितच कोणी पाहिले असतील. जसे कपडे स्वच्छ शुभ्र तसेच मनही. ‘संघ’ या विषयात ते आग्रही असत. भारीतय मजदूर संघाचे काम करीत असतानाही संघ शाखेतही अर्ध विजारी कधी चुकली नाही. मजदूर संघाचे कामही ते संघाचेच काम म्हणून अत्यंत तळमळीने नेटकेपणाने निरपेक्ष बुद्धीने व समर्पित वृत्तीने करीत. कोणत्याही पदाची वा मानसन्मानाची अपेक्षा त्यांनी केली नाही. जे पडेल ते काम ते करीत असत. १९६९ साली गंगेला जो मोठा पूर आला होता, त्यावेळी दहीपूल कापडपेठ सोमवार पेठ या भागात प्रचंड नुकसान झाले होते. कापड पेठेत तर सर्व वाड्यांचे तळमजले ज्यात बहुतेक कापडाची व भांड्यांची दुकाने होती ती पाण्याखाली गेली होती. सर्वत्र चिखल झाला होता. त्यावेळी संघ स्वयंसेवकांनी स्वतः मदत कार्य केले होते. चिखल उपसून स्वच्छता करण्यास साहाय्य केले होते. या काळातही अरविंदराव आमच्या बरोबर होते व न थकता काम करताना आम्ही पाहिले आहे. त्यांना गाण्याचेही अंग होते. उत्तम आवाज होता. संघाच्या कार्यक्रमात अनेक वर्षे ते गीते म्हणत आले होते. ‘वंदे मातरम्’ तर अतिशय भावपूर्ण स्वरात म्हणत असत.

 

१९६०च्या दशकात काही स्वयंसेवकांनी मिळून एक ज्ञानोपासक मंडळ सुरू केले होते. या मंडळाचा एक वार्षिक कार्यक्रम म्हणजे वाचस्पति विष्णुजी क्षीरसागर यांच्या पाच ते सहा दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करणे. हा कार्यक्रम सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायामशाळेच्या मैदानात होत असे. रोजच्या व्याख्यानाच्या शेवटी अरविंदरावांचे ‘वंदे मातरम्’ होत असे. त्या वेळची त्यांची हात जोडून ‘वंदे मातरम्’ म्हणणारी मूर्ती आजही माझ्या डोळ्यात समोर आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मीसुद्धा आजपर्यंत ‘वंदे मातरम्’ला हात जोडून उभा राहत आलेलो आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी त्यांच्या घरी विश्रांतीसाठी काही दिवस राहिले होते. त्यांची उत्तम व्यवस्था केली होती. रमणभाई शाहसुद्धा राहिले होते. परंतु, या श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात राहिल्याचे वा त्यांची सेवा केलाचा जरासुद्धा अभिमान तर सोडाच, परंतु त्याचा उल्लेखसुद्धा ते करीत नसत. या कामात वहिनींची त्यांना मनापासून साथ मिळाली. मुलगा चिन्मय व सूनबाई आणि कन्येचेही त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यात सहकार्याच्या रुपाने मोठे योगदान आहे. स्वयंसेवक कसा असावा, याच्या संघाच्या ज्या अपेक्षा आहेत म्हणजे प्रामाणिक, सेवेसाठी तत्पर, देशभक्त, आपल्या परिसरात नेतृत्व करणारा, समाजाविषयी प्रेमभाव बाळगणारा व कोणत्याही अपेक्षेविना कर्तव्य भावनेने काम करणारा अशा काही गोष्टी आहेत, त्या प्रमाणे जीवन जगलेला एक खराखुरा स्वयंसेवक आपल्यातून निघून गेला आहे.त्यांची तळमळ, उत्साह सातत्य, प्रसन्नता घेऊन कार्य करत राहणे हीच त्यांना श्रद्धांजली होईल.

अरविंद देशपांडे उर्फ ए. पी. देशपांडे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

 

- गोविंद यार्दी

(लेखक जनकल्याण समिती, प्रांत संस्कार प्रमुख आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/