बालासन बेड
महा एमटीबी   09-Nov-2018


’बालासन’ किंवा ‘बलसान’ हे एका नदीचं नाव. हिमालयाच्या खोर्‍यात वसलेल्या दार्जिलिंग जवळ उगम पावणारी ही नदी दक्षिण-पूर्वेच्या समुद्राला जाऊन मिळते. उंचाहून उताराकडे वेडीवाकडी वळणे घेत ही नदी समुद्राला बिलगायला जाते. उताराकडे येत असल्यामुळे म्हणजेच वाहत येत असल्यामुळे तिच्या पाण्याला गती आहे. पाणी वाहण्याचा आवाजही येतो. जणू एखाद्या नृत्यांगनेच्या पदलालित्याप्रमाणे...! म्हणून या नदीला ‘डान्सिंग गर्ल’ असेही म्हणतात. अनेक दर्‍या-खोर्‍या, जंगल, खेडीपाडी यांच्या जवळून खट्याळपणे जशी ती आवाज करीत जाते, तशीच ती ‘सिलिगुडी’ या हिलस्टेशन जवळूनही विहरत जाते. अशा या चिरतरुण नदीला, बालासनला आपल्या चित्रांचा विषय कुणी केला नसता तरच नवल...

 

वयाने वृद्ध आणि मनाने उत्साही असलेले ज्येष्ठ चित्रकार गोपीनाथ साहा यांनी या नदीच्या विषयावर कलाकृती साकारल्या आहेत. रक्ती रोहिणी, पानीघटा, दुधिया, सुकना अशा लांबच लांब मार्गाने ही नदी वाहते. ‘सिलिगुडी’ जवळून जाताना, तर तिने दगडांचे गोल गोल चेंडू बनवलेत. आपल्या पाण्याच्या गतीने घासून-घासून, माती न्यायची वाहून. अगदी तिची मातृनदी म्हणजे, ‘आई’ म्हणून मानली गेलेली ‘महानंदा’ नदी, जिला ही पुढे जाऊन मिळते. तिचं हे रूप चित्रकार गोपीनाथ साहांना भावतं. ते तिच्याशी कलासंवाद साधतात, त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून...! बालासन घाटावरील छोट्याशा बाजाराजवळ एक सुंदर शिवगौरी मंदिर आहे. ते मंदिर गोपीनाथ साहा यांच्या चित्रांचा ‘विषय’ बनलंय. तर याच घाटावर असणारे सर्व स्तरांतील लोक भगकुशी, बालासन नदीने गोलगोल बनविलेले खडे/दगड फोडून, त्यांची वाळू बनवून, ट्रकमध्ये भरून दुसरीकडे विक्रीसाठी पाठवित असत. या चित्रांमध्ये अनेक दृश्य चित्रकाराच्या नजरेने टिपलेली आहेत. अनेक माणसं, स्त्रिया, मुले-मुली, वयस्कर सारे सारे अगदी सकाळपासूनच म्हणजे सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेल्या बालासनच्या सोनेरी पाण्यात, काही काही कामानिमित्त कार्यमग्न असतात आदी दिवसभर.

 

 
 
 
 
 
हे सारं चित्रकार साहांना एकप्रकारे संगीत वाटतं. सूर्यकिरणांच्या लपंडावातून चित्रकारांना बालासनच्या पाण्यात ‘मजेंटा,’ ‘पिंक’ म्हणजे ‘गुलाबी व्हेर्मिलियन’ म्हणजे लालचा एक प्रकार, ‘यलो ऑकर’ हे सारे रंग दिसतात, जे त्यांच्या कलाकृतीत दिसून येतात. शिवाय लहानपण हे खेड्यातच गेलेले असल्यामुळे मातीची भांडी बनविणारा कुंभार जेव्हा दुर्गेच्या पूजेच्या साहित्याचा एक भाग म्हणून ‘लख्खी’ किंवा ‘मृतिकापात्र’ बनविताना पाहायला मिळायचे, त्याचे त्यांना फारच अप्रुप वाटायचं. मग ते पाहून स्केचिंग, ड्रॉईंग, कलरींग करीत ‘साहा’ हे स्वयंशिक्षित चित्रकार बनले. १९४९ साली जन्मलेले साहा यांनी पुढे १९७१ मध्ये ‘आर्ट’ची मास्टर डिग्री मिळविली. अनेक प्रदर्शनांमधून सहभाग, समूह-स्वतंत्र प्रदर्शने त्यांनी देश-विदेशात भरविली. बँकेची नोकरी सांभाळून कलाक्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या चित्रकार साहा यांचे मुंबईतील कमलनयन बजाज कलादालनात दि. १२ ते १७ नोव्हेंबर या सप्ताहात प्रदर्शन सुरू होत आहे. एक वेगळा विषय मांडण्याचा उपक्रम... म्हणून साहांच्या कलाकृती पाहाव्यात, असे वाटते.
 
 
 
 प्रा. गजानन शेपाळ 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/