ग्रामपंचायतीसाठी सरपंचाने ठेवले दागिने गहाण !
महा एमटीबी   07-Nov-2018

 


 
 
 
नाशिक : नाशिकमधील एकलहरे गावच्या महिला सरपंच मोहिनी जाधव यांनी आपले दागिने गहाण ठेवून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार दिला आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पाची ३ कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे ग्रामपंचायतीची तिजोरी रिकामी झाली होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी. याकरता सरपंच मोहिनी जाधव यांनी आपले दागिने गहाण ठेवून १ लाख ७४ हजार रुपये जमा केले. त्यातून ग्रामपंचायतीच्या सात कर्मचाऱ्यांना त्यांनी पगार दिला.
 
एकलहरे गावातील औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे या गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या तिजोरीवर याचा परिणाम झाल्याचा दिसत आहे. नागरिकांना आपले प्रश्न घरच्या घरी सोडवता यावेत याकरता एकलहरे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी एक हेल्पलाईन क्रमांकाची सेवा उपलब्ध करून दिली होती. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ग्रामपंचायत ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले जातात. अशा प्रकारचा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देणारी नाशिक जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. सरपंच मोहिनी जाधव यांनीच या हेल्पलाईनसाठीही पुढाकार घेतला होता. आता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवून त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/