समर्थांच्या पाऊलखुणा : मुर्खांची लक्षणे
महा एमटीबी   07-Nov-2018
 
 
 

दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे. त्यात ते सांगतात की, या ग्रंथाचे नाव दासबोध असले तरी, हा गुरू-शिष्यांचा संवाद असून त्यातभक्तिमार्गविशद केला आहे. स्वामी पुढे सांगतात की,

नवविध भक्ती आणि ज्ञान

बोलिले वैराग्य लक्षण

बहुदा अध्यात्म निरोपण निरोविले...

एकंदरीत संपूर्ण दासबोध ग्रंथात स्वामींनी अध्यात्म निरूपण भरपूर प्रमाणात सांगितले आहे. असे असले तरी हा केवळ अध्यात्माचा ग्रंथ नाही याची जाणीव स्वामींना आहे. स्वामींच्या मनात असे असावे की, जर या ग्रंथात आपण पुढे शिष्यांनाप्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेकाअसे सांगणार असू, तर प्रपंच नेटका करण्यासाठी आपण थोडे व्यवहारज्ञानही सांगितले पाहिजे. ’शहाणे करून सोडावे सकळ जनही त्यांची भूमिका ग्रंथाच्या शेवटपर्यंत आहे, असे दिसते. शिष्यांना नुसते अध्यात्म निरूपण ऐकवले, तर स्वानुभवाच्या प्रचितीच्या अभावी ते कदाचित ब्रह्मज्ञानाची पोपटपंची करू लागतील. हे टाळण्यासाठी त्यांना व्यवहारज्ञान देणे आवश्यक आहे. शिष्याच्या ठिकाणी व्यावहारिक शहाणपण यावे, यासाठी प्रथम शिष्याचे अज्ञान घालवले पाहिजे. त्यामुळे अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी त्यांना मूर्खाची लक्षणे विस्तारपूर्वक सांगावी लागली. मूर्खाची लक्षणे म्हणजे ते केवळ प्र्रप्रंच जाणतात आणि आत्मज्ञानासंबंधी जे विचारही करीत नाहीत, अशा अज्ञानी माणसांची ही लक्षणे आहेत. प्रपंचाला सर्वस्वी खरा मानून जीवन जगणारा अज्ञानी माणूसमी आणि माझेया पलीकडे जात नाही. जगातील सर्व गोष्टी या माझ्या सुखासाठी किंवा माझ्या उपभोगासाठी आहेत, असा तो हावरट हपापलेला, विकारांनी वेढलेला असतो. तो द्वेष, मत्सराने पछाडलेला असतो. त्याच्या ठिकाणी धर्म, नीती, न्याय, विचार यांचा लवलेश नसतो. थोडक्यात सांगायचे, तर हा मूर्ख अत्यंत स्वार्थी, विकारी, कुविचारी आणि आळशी असतो. स्वामी या समासाच्या सुरुवातीपासूनच स्पष्ट करतात की, ही मूर्खांची लक्षणे टाकून देण्यासाठी सांगितली आहेत, ’त्यागार्थ बोलिलेअसे. वस्तुतः ही मूर्खाची लक्षणे दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीस टाकून समर्थ एका प्रकारे आरसाच वाचकांसमोर धरतात. कारण, त्यात वाचकाला आपले प्रतिबिंब या मूर्खाच्या लक्षणात कुठे ना कुठे दिसतेच. एखादा चतुर वाचक त्यातून सुटला तरी, तो पुढे पढतमूर्ख लक्षणात अडकणार नाही, याची खात्री नसते. समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक . रा. पांगारकर आपल्यासमर्थ संजिवनीया ग्रंथात लिहितात की, ही मूर्खाची लक्षणे वाचताना त्यापैकी शेकडो लक्षणे आपल्या जवळ असल्याचे दिसते. किंबहुना या मिषाने समर्थांनी आपल्यासारख्यांचे चरित्र गायिले आहे, असे बहुदा प्रत्येक वाचकास वाटल्यावाचून राहणार नाही. समर्थ रामदास या समासाच्या सुरुवातीपासून सांगतात की, मूर्खाची लक्षणे अपार आहेत. किती म्हणून सांगावी... तरी मला सुचली तेवढी मी सांगितली... श्रोत्यांनी ती तत्पर होऊन ऐकावी... यावरून ही लक्षणे सुचतील तसतसे स्वामी सांगत गेले. मूर्खाची एकंदर वागणूक पाहून त्यातून ही लक्षणे स्पष्ट होत जातात. दासबोधातील काही मूर्ख लक्षणांचे वर्गीकरण करून ती पुढीलप्रमाणे,

 
 

१) कौटुंबिक स्वरूपाची लक्षणे :

 

हा मूर्ख जन्मदात्या आईवडिलांचा दुस्वास करतो. त्यांना सारखे टाकून बोलतो. नात्यागोत्याची माणसे असतील, त्यांचीही उपेक्षा करतो. त्यांना महत्त्व देत नाही. आईवडिलांना मान देत नाही. त्यांना जुमानत नाही. तो सर्वांना सांगत सुटतो की, “तो देवालाही मानीत नाही.” सतत बडबड करीत असतो. त्याच्या तोंडात शिव्या असतात. बोलताना तो नेहमी शिव्यांचा वापर करीत असतो. आपल्या घरातील बारीकसारीक गोष्टी ज्या नातेवाईकाला माहीत आहेत, त्याच्यावर हा विश्वास टाकतो. जवळ थोडीफार संपत्ती असेल, तर त्या संपत्तीचा भरवसा धरतो आळसाने राहतो. आपली बायको, आपली मुले यांनाच सर्वस्व समजतो आणि इतरांना ओळख दाखवत नाही. एवढेच नव्हे, तर परमेश्वरालाही विसरतो. परंतु, संसारात काही दुःखाचे प्रसंग आले, तर देवाला शिव्या देतो. कोणी जेवायला बोलावले, तर त्याच्याकडे आकंठ जेवतो.

 

२) स्वाभिमानशून्यता :

 

सासुरवाडीला खुशाल जाऊन राहतो. तेथे आळशीपणे दिवस काढतो. जेथे मान मिळतो, असे वाटते तेथे पुन्हा पुन्हा जातो. तेथे वारंवार गेल्याने आपल्याला कोणी विचारत नाही, हे त्याच्या ध्यानात येत नाही. हा रस्त्याने जाताना खात खात जातो. एकेकाळी आपला नोकर असलेला माणूस कालांतराने श्रीमंत झाला, तर हा त्याची चाकरी करू लागतो.

 
 

३) स्त्री लंपटता :

 

हा मूर्ख आपले जीवित स्त्रीच्या अधीन करतो. मनातल्या सर्व गोष्टी गुपिते तिलाच सांगतो तिचा गुलाम होऊन राहतो. हा कुल-शीलाची किंवा कसलीच चौकशी करता एखाद्या मुलीशी लग्न करतो. हा परस्त्रीवर प्रेम करतो. परस्त्रीशी एकांत करतो. हा मूर्ख पुरुष एकामागून एक बायका करत सुटतो. घरी आपली बायको असूनही नेहमी परद्वार करतो. हा परस्त्रीशी भांडण करतो.

 
 

४) वैयक्तिक मूर्खता : 

 
 

हा मूर्ख भारी तापट, खादाड, घाणेरडा, भित्रा, लबाड, लुच्चा असतो. आपल्या अंगी सामर्थ्य नसताना दुसर्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. समर्थ व्यक्तीशी ताठरपणा धरतो, आपली आपणच स्वतःची स्तुती करतो. स्वकर्तृत्व नसताना केवळ वडिलांची कीर्ती सांगून मोठेपणा मिळवू पाहतो. बोलताना विनाकारण हसतो. हिताच्या गोष्टी सांगितल्या, तर त्या ऐकता सांगण्यार्याशी वैर धरतो. मर्यादा सांडून निर्लज्यपणे विषयसेवन करतो. रोग असूनही औषध घेत नाही. औषध घेतले, तर पथ्य पाळत नाही. हरवलेल्या वस्तूंसाठी ऊर बडवीत बसतो. नीच जातीच्या माणसांची संगत करतो. (समर्थ नीच जातीचा असा उल्लेख त्रास देणार्या मुसलमानांच्या बाबतीत करतात.) भलतीच आकांक्षा धरतो. प्रयत्न करण्याऐवजी, ‘पुन्हा केव्हा तरी करूअसे म्हणून खुशाल झोपा काढतो.

 
 

५) सामाजिक मूर्खता :

 
 

आपली माणसे दूर करून परक्याशी मैत्री करतो. एखाद्याला मान द्यायचा तर त्याची अतिशयोक्त स्तुती करतो. एखाद्याचा द्वेष करताना कुत्सितपणे अतिशय टाकून बोलतो. याला घरी शहाणपण सुचते पण, सभेत बोलता येत नाही. आपल्याहून श्रेष्ठ व्यक्तीशी भारी लगट करतो. जो शहाणपणाच्या गोष्टी सांगतो त्यालाच हा शिकवायला जातो. दुसर्याची कुचेष्टा करून हसतो पण, दुसर्याने थट्टा केल्यावर चिडतो, मारायला धावतो. मित्रांना सुखाचा शब्द बोलत नाही पण, नीच भेटला तर त्याला लवून सलाम करतो. मूर्खांची संगत धरतो. ) ज्ञानार्जनाच्या साधनांची हेळसांड : हा मूर्ख वाचताना अक्षरे गाळून वाचतो किंवा पदरची घालतो. पुस्तकांची निगा ठेवीत नाही. आपण पुस्तक वाचत नाही आणि कोणाला वाचायला देत नाही. तेव्हा यालाही मूर्खच म्हटले पाहिजे. शहाणे लोक ही मूर्खाची लक्षणे लक्ष देऊन ऐकतात. ती सोडून देण्यासाठी सांगितली आहेत. ही लक्षणे ऐकली की चातुर्य येते. समर्थ शेवटी म्हणतात, जेवढी लक्षणे सुचली ती नमुन्यादाखलत्यागार्थसांगितली आहेत.

 
 

लक्षणे अपार असती।

परी काही येक यथामती।

त्यागार्थ बोलिले श्रोतीं।

क्षमा केले पाहिजे॥ (.१०.७३)

 
 

ही झाली मूर्खांची काही लक्षणे. पण शहाणे असूनही जे मूर्खासारखे वागतात त्यापढतमूर्खांचीओळख पुढील लेखात पाहू.

 
- सुरेश जाखडी  
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/