राणीची बाग वाचवणारी ‘राणी’
महा एमटीबी   07-Nov-2018


 
 

प्रदूषित हवेचा सध्या दिल्लीवर होणारा परिणाम आपण पाहत आहोत. मात्र, सध्या आपण मुंबईकर नशीबवान आहोत की, आपल्याकडे दिल्लीएवढी गंभीर परिस्थिती नाही. याचे श्रेय आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍या संस्थांना व व्यक्तींना दिले पाहिजे.

 
 

पर्यावरणाचा र्‍हास थांबवला पाहिजे, पर्यावरण संरक्षण केले पाहिजे, अशा गप्पा मारणारे आपल्याकडे अनेकजण सापडतील. मात्र, बोलणे आणि कृती करणे यात फरक असतो. आपल्याकडे म्हण आहेच, ’गरजेल तो बरसेल काय.’ याप्रमाणे पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलेल, तो प्रत्येकजण कृती करेलच असं होत नाही. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल प्रकाशित झाला असून यामध्ये भारतातील पाच वर्षांखालील लहान मुलांवर प्रदूषित विषारी वायूचा सर्वाधिक परिणाम होत असल्याचे सांगितले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने जागतिक संघटनांचे ‘धोकादायक’ असे अनेक अहवाल प्रकाशित झाले. मात्र, त्याकडे आपण आजही डोळेझाक करत आहोत. प्रदूषित हवेचा सध्या दिल्लीवर होणारा परिणाम आपण सर्वजण पाहत आहोत. मात्र, सध्या आपण मुंबईकर नशीबवान आहोत की, आपल्याकडे दिल्लीएवढी गंभीर परिस्थिती नाही. याचे सर्व श्रेय आपण पर्यावरण व प्राणी संवर्धनासाठी काम करणार्‍या संस्थांना व व्यक्तींना दिले पाहिजे. अशीच एक निसर्गप्रेमी व्यक्ती जिने मुंबईकरांची लाडकी ’राणीची बाग’ वाचविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या निसर्गप्रेमी म्हणजे शुभदा निखार्गे. म्हणूनच आज शुभदा निखार्गे यांच्या कर्तृत्वाची माहिती आपल्या ’माणसं’ या सदरातून घेणार आहोत.

 
 

शुभदा निखार्गे यांचा जन्म सर्वसामान्य घरात झाला. लहानपणापासून त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात भटकायची आवड होती. पर्यावरण संवर्धनासाठी त्या लहानपणापासूनच अनेक छोट्या-मोठ्या उपक्रमात सहभागी होत होत्या. त्यानंतर १९७८ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून गणितामध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्या १९८१ साली सरस्वती को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये उच्चपदावर रुजू झाल्या. मात्र, निसर्गप्रेमाची आवड असणार्‍या शुभदा यांचे नोकरीत मन रमत नव्हते. २४ वर्ष नोकरी केल्यानंतर २००५ साली त्यांनी केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी नोकरी सोडली आणि तेव्हापासून त्यांनी पर्यावरणसंवर्धनसाठी स्वतःलाझोकून दिले आहे. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेसोबत निसर्गाच्या रक्षणासाठी काम सुरू केले. या अंतर्गत त्यांनी मुंबईतील उद्याने, वनस्पती आदींचा अभ्यास सुरू केला. हे सगळं सुरू असताना ५३ एकरांवर वसलेल्या व हिरवाईने नटलेल्या ‘राणीच्या बागे’मध्ये प्राणिसंग्रहालय उभारण्याचे महापालिकेने ठरवले होते. मात्र, यासाठी उद्यानातील वनस्पती क्षेत्र असणारा एक मोठा भाग कमी केला जाणार होता. आता ‘राणीची बाग’ म्हणजे मुंबईचा व मुंबईकरांचा आत्मा. मुंबईतील काँक्रिटच्या जंगलातील सर्वात मोठा वृक्षसमूह असलेले एकमेव वनस्पती उद्यान आणि सर्वात मोठा, सार्वजनिक व हरित भूखंड आपल्या राणीच्या बागेमध्येच पाहायला मिळतो. या उद्यानामध्ये वनस्पतिवैविध्याचा अमूल्य ठेवा आहे. मात्र, यातील वनस्पती क्षेत्र असणारा एक मोठा भाग कमी केला जात असल्याचे कळल्यानंतर निसर्गप्रेमी असलेल्या शुभदा या अवस्थ झाल्या आणि इथूनच ‘राणीची बाग’ वाचविण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला.

 
 

ऐतिहासिक असलेल्या राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालय उभे केले जात असताना या उद्यानातील १५० वर्षांपासून उभे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तोडले जाण्याची शक्यता होती. यामुळे आपण या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि राणी बाग वाचवली पाहिजे, असा निर्धार शुभदा आणि त्यांच्या मैत्रिणी हुतोक्षी रुस्तमफ्रा, केटी बगेली, हुतोक्षी अरेथ्ना, डॉ. शीला तन्ना यांनी केला. यानंतर त्यांनी ‘सेव्ह राणी बाग वनस्पती उद्यान’ अशी संस्था स्थापन केली आणि राणी बागेतील वनस्पती उद्यान वाचविण्यासाठी मोठा जवळपास १० वर्षांपेक्षा जास्त संघर्ष केला. अखेर त्यांच्या या संघर्षाला न्याय मिळाला व ‘राणीच्या बागे’त प्राणिसंग्रहालय उभारण्याचा निर्णय महापालिकेला रद्दबातल ठरवावा लागला. शुभदा व ‘सेव्ह राणी बाग वनस्पती उद्यान’ या संस्थेचा हा मोठा विजय होता. त्यांच्यामुळे आज मुंबईकरांना ‘राणीच्या बागे’तील उद्यानाचा आनंद लुटता येत आहे. त्यांच्या संघर्षामध्ये अनेक लहान मोठ्या-लोकांचे व पदाधिकार्‍यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी ‘राणीच्या बागे’मधील आपलं काम सुरूच ठेवलं. आता त्या बागेमध्ये विविध नवनवीन वनस्पती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे तीन हजारांच्या आसपास असलेली झाडे आता चार हजारांवर पोहोचली आहेत. शुभदा निखार्गे या फक्त निसर्गप्रेमीच नसून, त्या अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय व लैंगिक भेद यासाठीदेखील काम करतात. ‘राणीच्या बागे’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी ‘राणीची बाग १५० वर्षे’ या पुस्तकाचे संपादन केले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/