अमेरिकेत व्यवस्थाबदलाचे वारे
महा एमटीबी   07-Nov-2018
 
 


अमेरिकेत सुरू असलेल्या मध्यावधी निवडणुकांनी प्रस्थापित ट्रम्प सरकारला जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेन काँग्रेसच्या ४३५ जागा, सिनेटच्या १०० पैकी ३५ जागा व एकूण ५० राज्यांपैकी ३६ राज्यांचे गव्हर्नर यांच्या निवडीसाठी होणार्‍या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये वर्चस्व आहे.

 
 
ट्रम्प थेट उभे नसले तरीही, या निवडणुकाच त्यांचे भविष्य ठरवणार असल्याचे दिसते. ज्या प्रमाणे भारतीय लोकशाहीत राज्यसभा असते त्याप्रमाणेच अमेरिकेत सिनेट सभागृह आहे. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्ष यांच्यात सुरू असलेल्या लढतीत ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाची पिछेहाट झाली, तर महाभियोगही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातच ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामध्ये चर्चा आहे ती म्हणजे युएस काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या दोन मुस्लीम महिला इल्हान ओमर आणि रशिदा तालिब. अमेरिकन काँग्रेसमध्ये त्यांच्या निवडून जाण्याला विशेष महत्त्व आहे. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून सुरू केलेला एच व बी व्हिसाचा आणि शरणार्थींच्या मुद्द्याचा वाद. ट्रम्प यांची मुस्लीम विरोधी वक्तव्ये आणि नीतीच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहेइल्हान उमर या सोमालियाच्या निर्वासित आहेत. सोनमालियाच्या निर्वासितांच्या प्रतिनिधी म्हणूनही त्या निवडून आल्या आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रतिनिधी एलिसन यांची जागा घेत निवडणुकीत आपली जागा पक्की केली. देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, न्याय प्रक्रियेत सुधारणा आणि किमान वेतन आदी मुद्द्यांसाठी त्यांनी संघर्ष केला आहे. आत्ता झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या जेनिफर झाईलिंस्की यांचा पराभव करून काँग्रेसमध्ये जागा मिळवली. वयाच्या बाराव्या वर्षी त्या उत्तर अमेरिकेत शरणार्थी म्हणून आल्या होत्या. त्यांचे आजोबा राजकारणात सक्रीय होते. तेव्हापासून त्यांना राजकारणाची आवड होती. लहानपणापासूनच घरात राजकीय वातावरण असल्याने लोकतांत्रिक विचारापासून ते प्रेरित झाल्या होत्या. केवळ निवडणूक जिंकणे हे ध्येय म्हणून नव्हे, तर व्यवस्थेतील बदलासांठी त्या सक्रीय असतात. या विजयाचा जल्लोष त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. ओमर यांनी विजयानंतर ट्विटमध्ये निवडून आलेल्या रशीदा तालीब यांना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
 
 

ओमर यांच्यासह काँग्रेसवर निवडून आलेल्या रशीदा तालीब यांचाही विजय तितकाच महत्त्वाचा आहे. ४२ वर्षीय रशीदा तालीब या पॅलेस्टाईन निर्वासित कन्या आहेत. २०१३च्या अमेरिकेतील सर्वेक्षणानुसार, पॅलेस्टाईन निर्वासितांची संख्या दीड ते अडीच लाखांपर्यंत आहे. त्यांच्या महिला प्रतिनिधी म्हणून रशीदा या काँग्रेसमध्ये पॅलेस्टाईन निर्वासितांचे नेतृत्व करतील. रिपब्लिक पक्षाकडून रशीदा यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या बेंड्रा जोम्स यांना पराभूत केले. २००८मध्ये त्यांनी मिशिगन लेजिसलेचर या निवडणुकीत विजय मिळवून यापूर्वीच इतिहास घडवला आहे. ही निवडणूक लढवणार्‍या त्या मुस्लीम पहिल्या महिला आहेत. ओमर यांच्याप्रमाणेच आरोग्य सुविधा, कामगारांचे प्रश्न आदी प्रश्नांवर न्याय व हक्कांसाठी त्या लढत आहेत. या निवडणुकीतही त्यांनी कामगारांची किमान मजुरी १५ डॉलर्स करणे, त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि याच समुदायाच्या सामाजिक सुरक्षेचा मुद्दा समोर ठेवून प्रचार केला. या दोन्ही मुस्लीम वंशाच्या आणि प्रस्थापितांच्या प्रतिनिधी म्हणून काम करताना ट्रम्प यांच्या धोरणांना विरोधही होऊ शकतो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यावरही अशीच वेळ आली होती आणि अमेरिकेचे सत्तांतर झाले. ट्रम्प यांच्या पक्षाला ४३५ जागांपैकी ३९१ जागांचे निकाल हाती आले आहेत. ट्रम्प यांना १८७, तर डेमोक्रेटिक पक्षाला २०४ जागा मिळाल्या. ट्रम्प यांनी सिनेटमध्ये १०० पैकी ५१ जागा मिळवत वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाची हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये पिछेहाट होताना दिसत आहे. डेमोक्रेटिक पक्षाची आघाडी, बहुमतासाठी आवश्यक जागा डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय वाटचालीत अडचण ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आलटून पालटून सत्ता येण्याचा इतिहास पाहता ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता नाकारताही येणार नाही. सद्यस्थितीतील व्यवस्थाबदलाचे वारे हे ही त्याचीच नांदी असू शकते. सत्ता जरी ट्रम्प यांच्या हातात असली तरीही, अंकुश हा डेमोक्रेटिक पक्षाच्या हातात गेला आहे.

 
-  तेजस परब  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/