तेजोमय दीपावली
महा एमटीबी   07-Nov-2018

 

 
 
 
पती-पत्नी, भाऊ-बहीण आणि भगवंत-भक्त यांचं नातं अक्षय राहावं, हा दीपावलीच्या सणाचा हेतू आहे. भारतीय संस्कृतीचा दीपावली उत्सव हा एक सुंदर अलंकार आहे. प्रज्ज्वलीत पणत्या ओळीने, रांगेने मांडल्या की, जी पणत्यांची तेजोमयी रांग दिसते ना, त्याला ‘दीपावली’ असं म्हणतात.
 

निरंतर दीप लावूया अंतरी।

करुया साजरी दीपावली॥

 

कार्तिक महिना चांद्रवर्षातील आठवा, तर शरदऋतूमधील दुसरा मास! कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला ‘कार्तिक’ असे म्हणतात. याच महिन्यात दीपावलीसारखा महत्त्वाचा सण असतो. थंडीला प्रारंभ झालेला असतो. अनेक अंगानं समाजमनाला पुष्ट करणारा हा दीपावलीचा सण! अंबरामध्ये तेजाळणारे दीप आणि अवनीवर प्रकामान होणाऱ्या पणत्या! आकाशाचा आनंद घेण्याचा प्रयास! अंबर आणि अवनीवर साजरा होणारा दीपोत्सव! भगवंताची तर नित्य दिवाळी असते. माणूस कार्तिक मासामध्ये चार दिवस दिवाळी साजरी करून अवनीवर दिव्यांची सुरेख आरास करतो.

 
षडरिपूरुपी नरकासुराला’ मारून आनंद साजरा करण्याचा दिवस नरकचतुर्दशी! षडरिपू नष्ट केल्याशिवाय खरा आनंद मिळेल का? म्हणूनच प्रेमाचे दीप लावले की, अंत:करण उजळून उठतं. स्नेहाचं तेल घातलं की समाधानाची ऊर्जा प्राप्त होते. लक्ष्मी म्हणजे वैभव! लक्ष्मी म्हणजे समृद्धी! दैवी गुणांचा अंगीकार केला म्हणजे लौकिक आणि पारमार्थिक वैभव प्राप्त होतं. अलक्ष्मीला दूर सारून लक्ष्मीचं पूजन केलं की, ती स्थिर राहते. नारायणासह तिची स्थापना केली की, कशाचीच कमतरता उरत नाही. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लाभते. मनाचं अंगण, घर स्वच्छ केलं की, लक्ष्मी प्रवेश करते व प्रसन्न होऊन कृपावंत होते. मग जीवन परिपूर्णतेनं भरून जातं.
 

बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा दिवस उत्तम! वामन अवतारामध्ये बळीराजाला पाताळाचं राज्य प्रदान केलं. बळीराजानं वामनाला मनःपूर्वकप्रार्थना केली. त्या प्रार्थनेनं प्रसन्न होऊन वामन स्वत: द्वारपाल झाले.तोच दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा! बलिराजाच्या स्मरणासाठी ‘बलिप्रतिपदा’ हा दिवस साजरा केला जातो. हा विक्रम संवत्सराचा. वर्षारंभ दिवस... या दिवसापासून व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. म्हणून या दिवसाला ‘पाडवा’ असं म्हटलं जातं. व्यापारी आपल्या हिशेबाच्या वह्यांचं पूजन तर करतात; त्याचसमवेत तराजू व तिजोरी पूजन, लेखणीपूजन करतात. हा शुभदिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो.

 

कार्तिक शुद्ध द्वितीयेचा दिवस ‘यमद्वितीया’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमीने यमधर्माला म्हणजे भावाला घरी बोलावून स्नान घालून अत्यंत प्रेमानं औक्षण केलं, मिष्टान्न भोजन दिलं. यमाच्या आशीर्वादानं भावाचा अपमृत्यू किंवा गंडातर टळतं, असा पुराणात उल्लेख आहे. बहीण-भावाच्या नात्याचा भावबंध जपणारी ‘भाऊबीज’ आजच्या काळातही साजरी केली जाते. पती-पत्नी, भाऊ-बहीण आणि भगवंत-भक्त यांचं नातं अक्षय राहावं, हा दीपावलीच्या सणाचा हेतू आहे. भारतीय संस्कृतीचा दीपावली उत्सव हा एक सुंदर अलंकार आहे. प्रज्ज्वलीत पणत्या ओळीने, रांगेने मांडल्या की, जी पणत्यांची तेजोमयी रांग दिसते ना त्याला ‘दीपावली’ असं म्हणतात. दीप+आवली (ओळ) म्हणजे दीपावली! त्याचप्रमाणे प्रज्ज्वलीत पणत्यांची वर्तुळाकार मंडले तयार केल्यास त्याला ‘दीपमालिका’ असं म्हणतात. म्हणजेच काय तर ‘दीप’ हा केंद्रस्थानी आहे. अंतर्बाह्य प्रकाशमान होण्यासाठी ही दीपावली प्रतिवर्षी साजरी केली जाते.

 

प्रत्येक युगात दीपावली सण उत्साहात साजरा करून सर्वार्थानं संपन्न होण्याचा प्रयास केला जातो. कलियुगात तर अंतरीचे दीप झाकोळले आहेत. कृत्रिमता, कोरडेपणा मना-मनात आला आहे. त्यामुळे या अंधारलेल्या युगात दीपावलीचा, प्रकाशाचा उत्सव अत्यावश्यक आहे. म्हणून सकल संतांनी दीपावली सणाला समाजमन उजळून टाकण्यासाठी प्रधानस्थान दिलं आहे.

 

लक्ष लक्ष दीप लावियले द्वारी॥

देव आले घरी स्वानंदाने॥

स्वानंदाचा दीप लाविला अंतरी॥

तेज न मावे दाही दिगंतरी॥

 

संत स्वानुभवाचे बोल बोलतात. आपल्या दारी लक्ष लक्ष दिव्यांची रांग लावली की, देव स्वानंदानं घरी येतात. देवाला प्रकाश आवडतो. दीप लावले की अंधःकार नाहीसा होतो. त्या प्रकाशामध्ये जीवनवाट उजळून जाते. उजळलेल्या वाटेवरून देव स्वानंदासह घरी अवतीर्ण होतात. दीप कशाचा लावायचा? स्वानंदाचा दीप तेवत ठेवायचा. कुठे तेवत ठेवायचा? तर अंतरामध्ये... अंतःकरणात स्वानंदाचा दीप लावायचा. त्यामुळे मनाची मलिनता, अंधार दूर होतो. दशदिशांमध्ये या दीपाचं तेज मावेनासं होतं. मनाचा कानाकोपरा म्हणजेच दहा दिशा! अत्यंत तेजोमय अशा दीपाचा प्रकाश... तेज दहादिशांमध्ये न मावता सर्वत्र प्रकाशाचं साम्राज्य पसरतंसंत पुढे सांगातात,

 

प्रकाशाने अवघा तिमिर नाशिला।

विकारांचा वारा मंद झाला॥

मंद झाला वारा नाद आला कानी।

ध्यानी मनी स्वप्नी गोविंद॥

 

प्रकाशामुळे तिमिराचा नाश झाला. कलियुगात प्रबळ असणाऱ्या विकारांचा वारा मंद झाला. विकार संपले की, अलौकिक नाद ऐकू येऊ लागतात. श्रीकृष्णाच्या बासरीचे सुरेख स्वर कानांना, मनाला तृप्तीचा अनुभव देतात. मग अशा सुंदर भावावस्थेमध्ये ध्यानात, मनात, स्वप्नात गोविंदच दिसू लागतो.

 

गोविंदाने केले निर्मल आकाश।

गेला आशापाश गळोनिया॥

गळोनिया गेला अहंकार सारा।

निजसुख सोहळा निरंतर॥

 

चिदाकाश गोविंदामुळे निर्मल, स्वच्छ होऊन जातं. त्यापुढची प्रगतीची पायरी म्हणजे आशेचे पाश गळून जातात. अजून पुढचा महत्त्वाचा असा प्रगतीचा टप्पा म्हणजे कठीण असा अहंकफर गळून जातो. अहंकार गळाला की, निजसुख सोहळ्यात अंतर पडत नाही. नित्य नूतन असा निजसुखाचा सुरेख सोहळा निरंतर अनुभवाला येतो.

 

निरंतर दीप लावू या अंतरी।

करूया साजरी दीपावली॥

अनंताचा अंत न लगे तत्त्वता।

शुद्ध भावे आता पाहू राम॥

 

अंतरामध्ये अखंड दीप लावले की नित्य दीपावली साजरी करता येते. त्याचा आनंद कधीच कमी होत नाही. ही दीपावली फक्त चारच दिवस साजरी न करता कायम दीपावली साजरी करता येते. खरं तर अनंत असणाऱ्या परमात्माला अंत नाही. त्याचा ठाव लागणं कठीण काम आहे. परंतु, शुद्ध भाव ठेवून बघितलं की तो ‘आत्माराम’ सापडतो. त्यामुळे आनंद, स्वानंद, परमानंद याची प्राप्ती होते. ही सगळी आध्यात्मिक दीपावली संतांनी या ओळींमधून कथन केली आहे. संत स्वतः अशी नित्य दीपावली साजरी करतात. समाजातील प्रत्येकानं त्याचा अनुभव घ्यावा यासाठी ते विविध प्रकारानं सांगतात. स्वतः अक्षय असे अंतरी ज्ञानदीप लावून स्वानंदात जीवन जगतात. ज्ञानाची दीपावली रोजच साजरी करतात. ही ज्ञानदीपावली संतांना अभिप्रेत आहे. सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा, ही त्यांची तळमळ असते. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

 

सूर्ये आधिष्ठीली प्राची।

जगा जाणिव दे प्रकाशाची॥

तैसा श्रोतया ज्ञानाची

दिवाळी करी॥

 

सकल समाजाला अज्ञानाच्या अंधःकारामुळे दुःख भोगावे लागते. त्यांना कळवळा येतो. ते अज्ञानाचा अंधःकार दूर सारण्यासाठी ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग दाखवतात. मार्गावर बोट धरून घेऊन जातात. ज्ञानाचा सूर्य उगवल्यावर अज्ञानाचा अंधार दूर सरतो. मग, दुःखाचा लवलेश उरत नाही. ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देणाऱ्या संतांची अनोखी, अलौकिक दिवाळी आहे. दिवाळीचा हा मूळ हेतू लक्षात घेऊन प्रकाशाचा उत्सव साजरा केला, तर अंधाराचा समूळ नाश होऊन अलौकिक अशा प्रकाशानं जीवन उजळून उठेल, यात शंका नाही.

 
 - कौमुदी गोडबोले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/