अमेरिका निवडणूक : ट्रम्प यांना धक्का
महा एमटीबी   07-Nov-2018


 

वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका लागला आहे. तेथील प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळाले असून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने सिनेटमधील बहुमत कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांनंतर अमेरिकेत दोन वर्षांनी मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.

 

अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहावरील ट्रम्प यांच्या पक्षाचे वर्चस्व संपले असून बहुमत मिळवण्यात डेमोक्रेटिक पक्षाला यश मिळाले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयांना लगाम घालण्याबरोबरच चौकशी करण्याचे अधिकार डेमोक्रॅट्सना मिळाले आहेत. २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यावेळी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते. दरम्यान, सिनेटमधल्या १०० पैकी ५१ जागांवर रिपब्लिकन पक्षाला विजय मिळाला असून ४५ जागा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाल्या आहेत. दरम्यान, सिनेटचा निकाल हे आपल्याला मिळालेले मोठे यश असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.

 
 

आठ वर्षांनंतर डेमोक्रेट्स प्रतिनिधी सभागृहावर

 

निवडणुकांच्या निकालामुळे तब्बल आठ वर्षानंतर डेमोक्रॅटसना पहिल्यांदाच प्रतिनिधी सभागृहावर वर्चस्व मिळाले आहे. ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे स्थलांतरित विरोध, अमेरिका फर्स्ट, स्थानिकांना प्राधान्य या मुद्दांवरच निवडणूक लढवली होती. मागच्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रम्प यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजवटीतील अनेक निर्णय त्यांनी बदलले, याचाच त्यांना फटका बसल्याचे मानले जात आहे.

 

एकतर्फी निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार

 

डेमोक्रॅट्सना ट्रम्प यांच्या परताव्याचा तपास करण्याचा अधिकार मिळाला आहे. तसेच व्यापारासह ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांसदर्भातील एकतर्फी निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार डेमोक्रॅटसना प्राप्त झाला आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/