दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘ध्यानयोग’ शिबीर
महा एमटीबी   07-Nov-2018

 
जळगाव, 6 नोव्हेंबर - निर्धार योग प्रबोधिनीतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला एकदिवसीय ध्यानयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर निर्धार योग प्रबोधिनीच्या भगीरथ कॉलनी येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाले.
 
यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील समर्पण मेडिटेशन सेंटरच्या हेमांगी माहेश्वरी आणि निर्धार योग प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा स्मिता पिले उपस्थित होत्या.
 
दिवाळीच्या पूर्वसंध्येला आरोग्याचा निर्धार करीत ध्यानयोगाने सुरुवात करावी आणि योग साधकांनी आपल्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सम अवस्थेत ठेवावे, हे उद्देश घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
दररोज नियमित योग साधना करणारे योग साधक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ध्यानयोगाचा लाभ घेत ध्यानातील आपले अनुभव स्पष्ट केले.
 
शिबिराच्या समारोपप्रसंगी हेमांगी माहेश्वरी यांनी कुंडलिनीविषयी माहिती देऊन ध्यान साधनेसाठी कुंडलिनी शक्तीची उपयोगिता स्पष्ट केली. निर्धार योग प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या योजनेतून ध्यानयोगाचे शिबीर साकार करण्यासाठी सचिव कृणाल महाजन यांनी ध्यान साधनेत साधकांना सूचना करत बहिर्मुखतेतून अंतर्मुख होण्यास मदत केली. पल्लवी उपासनी, लता करोडपती, गायत्री कुलकर्णी यांनी सहकार्य केले.