फेसबुकचा ‘पराक्रम!’
महा एमटीबी   06-Nov-2018

 


 
  
फेसबुकसारख्या बलाढ्य कंपनीचे हे वर्तन मनाला न पटणारे आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असते, तर त्याचे कौतुकही झाले असते. पण अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप होऊ नये, म्हणून ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे करण्यात आले आहे. त्यामुळे फेसबुकच्या विश्वाससार्हतेविषयी भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 

अमेरिकेत मध्यवर्ती निवडणुकांना एक दिवस शिल्लक असताना फेसबुकने चक्क ११५ अकाऊंट्स बंद केले. या ११५ अकाऊंट्समध्ये ३० फेसबुक अकाऊंट्स आणि ८५ इन्स्टाग्राम अकाऊंट्सचा समावेश होता. हे सोशल मीडिया अकाऊंट्स रशियातील विदेशी संस्थांशी निगडीत होते. त्यांच्याद्वारे निवडणुकांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता होती. म्हणून हे सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्यात आले, असे स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आले. यापूर्वी २०१६ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रशियाने फेसबुकद्वारे हस्तक्षेप केल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. पुन्हा आपल्यावर अशी वेळ ओढवू नये तसेच अशा परिस्थितीला आपल्याला पुन्हा कधी तोंड द्यावे लागू नये म्हणून खबरदारी घेत फेसबुकने हे अकाऊंट्स बंद केले.

 
अमेरिकेच्या कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेने या संशयित अकाऊंट्सबाबत फेसबुकला माहिती दिली होती. यासाठी या यंत्रणेद्वारे या अकाऊंट्सच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटीजवर नजर ठेवण्यात आली होती. त्यानंतर फेसबुकने ही कारवाई केली. मुळात एखाद्या देशाने निवडणुकांमध्ये हस्तक्षेपाच्या भीतीपोटी असे पाऊल उचलणे हेच त्या देशाच्या नामुष्कीचे लक्षण आहे. यामुळे निवडणुकांमधील हस्तक्षेप थोपविण्यास देश समर्थ नाही, हे यावरून दिसून येते. शत्रू राष्ट्र आपल्या देशातील नागरिकांना आपल्या विरुद्ध फितवेल, मग निवडणुकांतील मतांवर त्याचा गंभीर परिणाम होईल, अशी भीती निर्माण होणे, हेच मुळात चुकीचे आहे. ही अशा प्रकारची भीती असणे, हे जगात महासत्ता म्हणून मिरविणाऱ्या देशाला शोभणारे नाही. फेसबुक हे जगभरात पसरलेले एक अत्यंत प्रभावशाली समाजमाध्यम आहे. नेहमी अबोल राहणारेही या माध्यमावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत असतात. अशात सोशल मीडिया युजर्सना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे अकाऊंट्स असे बंद करणे, हे कितपत योग्य आहे? एकीकडे जग पुढे गेले आहे असे आपण म्हणतो, काळ बदलला आहे असे म्हणतो आणि दुसरीकडे मात्र युजर्सना न सांगता त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करतो. पूर्वी ज्या गोष्टींबद्दल लोक आपले मत व्यक्त करत नव्हते. त्या गोष्टींना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंड फुटू लागले आहे. या घटनेवरून वैचारिक क्रांतीची अजूनही आपल्याला गरज आहे, अजूनही कालानुरूप लोकांचे विचार बदललेले नाहीत, असे प्रकर्षाने जाणवते. शत्रू राष्ट्र आपल्या मतदारांना फितवेल, आपली मते आपल्या हातातून निसटतील. ही कल्पना करणेच मुळात कालबाह्य आहे. कारण, एखाद्या व्यक्तीवर जर एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडायचा असेल, तर तो कोणत्याही माध्यामातून पडू शकतो. सोशल मीडियाद्वारे हा प्रभाव जरा जास्त वेगाने पडतो. त्यामुळेच समाजावर जो चुकीचा प्रभाव पडतो त्यासाठी दरवेळी सोशल मीडियाला दोषी मानले जाते. परंतु, सोशल मीडिया कंपन्यांनीदेखील हे असे पाऊल उचलणे योग्य नव्हे. युजर्सना तुमचे अकाऊंट बंद होणार आहे, याची किमान कल्पना किंवा पूर्वसूचना द्यायला हवी होती. त्यात कहर म्हणजे फेसबुकसारख्या जगातील अग्रणी सोशल मीडिया कंपनीने आपल्या युजर्सची अकाऊंट्स त्यांना न सांगता बंद करणे, हे फेसबुकलाही शोभत नाही.
 
 
एकीकडे तुम्ही लोकांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता आणि दुसरीकडे तेच व्यासपीठ त्यांच्याकडून बळजबरीने काढून घेता. हे योग्य नव्हे. इतर सोशल मीडिया कंपन्यांच्या तुलनेत फेसबुक हे जगात अग्रस्थानी आहे, हे सर्वमान्य असले तरी, युजर्सनी हे समाजमाध्यम वापरताना काय करायचे आणि काय नाही, याबाबत फेसबुकने निर्बंध लादणे, हे अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे युजर्सना तुम्ही त्यांच्या खासगी गोष्टींबाबत कशी गुप्तता राखता येईल, हे शिकवता, त्यासाठी शक्कल लढवून नवनवीन फीचर्स आणता पण, दुसरीकडे मात्र युजर्सच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटीजवर नजर ठेवता. फेसबुकसारख्या बलाढ्य कंपनीचे हे वर्तन मनाला न पटणारे आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असते, तर त्याचे कौतुकही झाले असते. पण अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप होऊ नये, म्हणून ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे करण्यात आले आहे. त्यामुळे फेसबुकच्या विश्वाससार्हतेविषयी भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फेसबुक हे त्याच्या युजर्सने त्याला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज जगप्रसिद्ध आहे, हे फेसबुकने विसरता कामा नये. अशीच एकापाठोपाठ एक कारणे देत जर फेसबुक आपल्या युजर्सची अकाऊंट्स बंद करत राहिले, तर युजर्सने फेसबुककडे पाठ फिरवायला वेळ लागणार नाही. परिणामी, हे माध्यम काळाच्या पडद्याआड जाईल.
- साईली भाटकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/