सुवर्णमय यशाचा वेध घेणारे ‘कांचन!’
महा एमटीबी   05-Nov-2018


 
 
 
कांचन पगारे!’ जाहिरातीत दिसणारा एक प्रसिद्ध चेहरा! आजवर अनेक जाहिरातींतून, मालिका, नाटकांमधून आणि सिनेमांमधून विनोदी भूमिकांमधून त्यांना प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटविणाऱ्या या सुप्रसिद्ध चेहऱ्यामागे एक भलामोठा संघर्ष दडला आहे. हे मात्र फार कमीजणांना ठाऊक आहे.

कांचन हे मूळचे नाशिकमधील सटाणा तालुक्यातील रहिवासी. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची वेळी आली तेव्हा त्यांनी अभिनेता होण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरवले. कांचन यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाकडून मात्र विरोध होता. घरची आर्थिक परिस्थितीही फारशी उत्तम नसल्याने कांचन यांनी नोकरी करून घराला हातभार लावावा, असे त्यांच्या कुटुंबीयांचे मत होते. कांचन यांनी अभिनयाकडे वळू नये, चारचौघांप्रमाणे नोकरी करावी, असे त्यांना घरच्यांकडून वारंवार सांगितले जायचे. त्यांना समुपदेशनाचे चार डोस पाजले जायचे. कांचन यांच्याबाबतीत आता काय करायचे? ते वाईट वळणाला तर जात नाही आहेत ना? अशा अनेक शंकाकुशंका नातेवाईक निर्माण करत होते. अखेर कांचन यांच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी सर्व नातेवाईकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कांचन पगारे यांनी आपण अभिनेता होण्यासाठी मुंबईला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. तसेच आपला याबाबत ठाम निर्णय झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारण, कांचन यांनी आपल्या स्वप्नांचा ध्यास घेतला होता. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना ‘मायानगरी’ खुणावत होती. अखेर घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मुंबई गाठलीच.

 

करिअरच्या सुरुवातीच्या काळात कांचन पगारे यांनी एका छोटेखानी कंपनीत नोकरी केली. नोकरीची वेळ सांभाळून ते ऑडिशनला जात असत. हिरोच्या भूमिकेसाठी लागणारे देखणे रूप, उंची कांचन यांच्याकडे नव्हती. सावळा वर्ण, ठेंगणेपणा आणि सुदृढ शरीरयष्टी यामुळे त्यांना अनेक भूमिका नाकारण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतच राहिले. कालांतराने जाहिरातीत पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांच्या अभिनयाची बुलेट ट्रेन सुसाट धावू लागली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कांचन यांनी सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट, राणी मुखर्जी यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत अनेक जाहिराती व सिनेमांमधून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘आंबटगोड’ या मालिकेतील ‘टेंग्श्या’ ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सध्या कांचन एका वेबसीरिजच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत. आज कांचन यांना मिळत असलेले घवघवीत यश पाहून काही वर्षांपूर्वी त्यांना विरोध करणारे नातेवाईक अभिमानाने सांगतात की, “कांचन पगारे हे आमचे नातलग आहेत.” कांचन हे अतिशय सहृदयी असल्याने त्यांनी आपल्या नातलगांना माफ केले. “त्यावेळी ते माझ्या काळजीपोटीच बोलत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही. रुसवा नाही,” असे कांचन आवर्जून सांगतात. दरम्यान, संघर्षाच्या काळात मित्रांनी आपल्याला खूप साथ दिल्याचे ते सांगतात. “मित्रांनी केलेल्या उपकारांची परतफेड मी कधीही करू शकणार नाही,” या शब्दांत कांचन आपल्या मित्रांचे आभार मानतात. आयुष्यभरासाठीची साथ देणाऱ्या आपल्या पत्नीचेही ते आभार मानायला विसरत नाहीत. मुंबईत स्वत:चे घर नसतानाही पत्नी मंजुला हिने त्यांना मोलाची साथ दिली. कांचन आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या पत्नीला देतात. कारण एकीकडे ते आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत होते, तर दुसरीकडे मंजुला यांनी मुलाला सांभाळून त्यांचा संसार उचलून धरला होता. म्हणूनच ते आपली स्वप्ने पूर्णत्वास नेऊ शकले. “मंजुलाने मला दिलेल्या लाखामोलाच्या साथीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो,” असे कांचन सांगतात.

 

करिअर निवडण्याविषयी आजच्या युवा पिढीला कांचन सांगू इच्छितात की, “तुम्हाला ज्या कामात आनंद वाटतो ते करा. करिअर निवडताना मी करणार असलेले काम मला स्वत:ला आनंद देणारे आहे का? हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला स्वत:लाच आवडत नसेल, तर उगाच आयुष्यभरासाठी नऊ ते पाच नोकरी करून खर्डेघशी करत बसण्यात काहीच अर्थ उरत नाही. एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल, तर आयुष्यात जगण्याला खरा आनंद प्राप्त होतो. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार करिअरची निवड करावी. पालकांनीही मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर निवडू द्यावे. करिअरच्या सुरुवातीला मुले आधी पडतील, धडपडतील, अनेक खस्ता खातील मात्र यशस्वी झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे करिअर निवडता आले म्हणून पालकांचे आभारही मानतील. एकदा ही मोकळीक देऊन तर बघा मुले काय चमत्कार करतात!.”

- साईली भाटकर 
 
 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/