माणूस म्हणून जगायचे आहे!
महा एमटीबी   05-Nov-2018
 


हिंदू धर्मीयांना सण उत्सवात शहाणपणा शिकवणारे अनेक समाजहितवादी पुढे येतात. मग त्यात दिवाळीतील फटाकेबंदी असो, रंगपंचमीतील पाणी वाचवण्यावर असो किंवा मग संक्रांतीला पतंग उडवण्यावर न्यायालयात याचिका दाखल करणार्या स्वयंसेवी संघटना. इतर धर्मातील अंधश्रद्धा किंवा प्रथांविरोधात बोलण्याची हिंमत सहसा कुणी करत नाही आणि जे करतात त्यांना केवळ आणि केवळ शिक्षा म्हणजे मृत्यूदंडच असतो.

 

बांगलादेशातील चटगाव येथे राहणारा मोहम्मद सज्जादुल हक याच्यावरही स्वतःच्या देशातून पळून जाण्याची वेळ आली आहे, तीही याच कारणासाठी. मोहम्मदचा गुन्हा इतकाच की त्याने बांगलादेशातील प्रस्थापित धर्मांधतेविरोधात उठवलेला आवाज. धर्मनिरपेक्षता, नास्तिकता, स्त्री-पुरुष समानता, मानवाधिकार आदींचे समर्थन करत व्यवस्थेविरोधात त्याने बंड पुकारले. मोहम्मदने त्याच्या ब्लॉगद्वारे ही चळवळ सुरू केली. बांगलादेशची राजधानी ढाकासारख्या शहरात राहणारा हा तरुण सर्वसामान्य मुलांप्रमाणेच गेली अडीच वर्षे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. बाहेरच्या दुनियेत वावरत असताना त्यालाही त्याच्या धर्मातील आणि देशातील काही गोष्टी खटकू लागल्या आणि त्याने ब्लॉगद्वारे त्याच्या लेखणीतून त्या मांडल्या आणि त्याचे परिणामही त्याला भोगावे लागले. मोहम्मद सध्या भारतात आश्रयाला आला आहे. कोलकात्यातील एका जागेत टुरिस्ट व्हिसावर तो राहत आहे. धर्माविरोधात आणि देशातील अराजकतेविरोधात आवाज उठवल्याचे हे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात त्याने आवाज उठवण्यास सुरुवात केली.

 

व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधातही लिखाण केले. माणूस म्हणून जगा त्यामुळे या चालीरितींपासून तुम्हाला आणि सामान्य माणसांनाही स्वातंत्र्य मिळेल, इतकेच त्याचे म्हणणे होते. मात्र, यावर लिखाण केल्यावर त्याला त्याचे सर्वस्व गमावण्याची वेळ आली आहे. लहानपणीच त्याला धर्माची शिकवण देण्यात आली. कुटुंबातील वातावरणच धार्मिक असल्याने हे ओघाने आलेच मात्र, मोहम्मदने त्याविरोधात घरच्यांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुस्लीम समाजातील प्रथांविरोधात प्रश्न विचारायला लागल्यावर घरचेही परके झाले आणि देशही. मोहम्मद तरीही हरलेला नाही. तो आजही त्याच्या मतांवर ठाम असल्याचे सांगतो. त्याच्या घरचे इतके कट्टरपंथी असावेत की त्यांना स्वतःच्या मुलाची वणवणही दिसेनाशी झाली. मुस्लीम असूनही नास्तिकतेचा प्रचार केला म्हणून, हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून तोंड लपवून देश सोडून पळणेच त्याच्या नशिबी आले.

 

गेल्या वर्षी २५ मे रोजी त्याने एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यात त्याने, ”मला माणूस म्हणून जगायचे आहे, मुस्लीम म्हणून नाही, मला शिकवलेल्या गोष्टी चुकीच्याच आहेत,”असे लिहिले. त्याच्या नावाने ही पोस्ट व्हायरल होत गेली आणि त्याचे फेसबुक अकाऊंटही बंद करण्यात आले. यानंतर धमक्या मिळू लागल्या. त्याने थेट ढाक्यातून आपले गाव गाठले. पण तिथेही त्याची पाठ समाजकंटकांनी सोडली नाही. गावातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. तिथून तो मावशीच्या घरी गेला तर तिथेही त्याला जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. शेवटी कोलकात्यामध्ये तो आश्रयाला आला आहे. भारतात किमान वातावरण काहीसे शांततापूर्ण आणि सुरक्षित आहे, असा त्याचा विश्वास आहे पण, त्याच्या मागावर असलेल्या लोकांचा इथेही मला धोका असल्याचे त्याने त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्याला त्याच्या परिवाराचीही चिंता आहे, त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना काही बरेवाईट झाल्यास स्वतःला माफ करू शकणार नाही, अशी त्याची भावना आहे. बांगलादेशी हिंदूंवर होणार्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी त्याने सुरू केलेल्याबी ह्यूमन फर्स्ट’ (आधी माणूस व्हा) या चळवळीचा उल्लेख यासाठी विशेष की, मोहम्मदने स्वतः मुस्लीम असूनही हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणे आणि स्वतःच्या धर्मातील पटलेल्या गोष्टींवर प्रश्न विचारणे याला धाडस लागते; अन्यथा देशात केवळ वादंग निर्माण व्हावा म्हणून मंदिरप्रवेशावर राजकारण करणारे, सणासुदीच्या दिवसांवर विविध निर्बंध आणण्याची मागणी करणारे इतर धर्मांविरोधात मूग गिळून गप्प बसतात. ख्रिसमसच्या पार्ट्यांवेळी रात्रभर चालणारा डिजेचा धिंगाणा असो वा फटाक्यांचा दणदणाट, त्यांच्या कानावर पोहोचत नाही. बकरी ईदनिमित्त बोकडांच्या कत्तलीविरोधात बोलणारेही कमीच आणि बोलला की त्याचा मोहम्मद होतो हे नक्की...

 
 
- तेजस परब 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/