धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन
महा एमटीबी   05-Nov-2018सोमवारी झालेल्या धनत्रयोदशीचे दीपावलीत एक वेगळे महत्त्व आहे. कारण, याच दिवशी धन्वंतरी जयंती असते. धन्वंतरी म्हणजे वैद्यांचा देव, एवढेच सर्वांना माहीत असते. पण, त्याहून अधिक माहिती आजच्या लेखातून करुन घेऊया...


सण म्हणजे आनंदाचे क्षण. भारतामध्ये विविध प्रांतांनुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात. काही मोजकेच सण संपूर्ण भारतात एकत्र साजरे होतात, त्यातील महत्त्वाचा एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी ही गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून सुरू होते आणि भाऊबीजेला संपते. दिवाळी म्हणजेच सणांची राणी. दिवाळीसाठी सर्वच उत्साही असतात. वातावरणातही आनंद, उत्साह आणि जल्लोष असतो. आसमंतात ही नवनिर्मितीची चाहूल दिसू लागते. नवचैतन्य, सकारात्मकतेच्या ऊर्जेची जणू बरसातच दिवाळीत होते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. गोपूजन, लक्ष्मीपूजन ते बंधू-भगिनीचं नाते जोपासणे इ. सर्व गोष्टी या सहा दिवसांच्या आनंदोत्सवात साजऱ्या केल्या जातात. प्राचीन भारतात अनेकविध विद्याशाखा उत्तमरित्या प्रगत होत्या. त्यातीलच आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र. जसे हल्ली सर्व गोष्टींचे पुरावे द्यावे लागतात, संशोधन करावे लागते आणि तेव्हाच ते मान्य केले जाते. तसेच प्राचीन काळी एखादी गोष्ट धर्माशी किंवा व्रत-वैकल्याशी जोडली गेली, तर सामान्यांपर्यंत ती रुजविणे सोपे होई. म्हणूनच विविध सणांमधील पदार्थ हे त्या-त्या ऋतूला गरजेचे असतात. उदा. संक्रांतीतील तीळगूळ, गुढीपाडव्यावेळी कडुनिंबाचे पान खाणे, रामनवमीचा सुंठवडा इ. याचप्रमाणे धन्वंतरीबद्दलचेही वैशिष्ट्य आहे.

 

चार वेदांमधील अथर्ववेदाचा उपांग म्हणजे आयुर्वेद. अथर्ववेदात एकूण सहा हजार ९७७ सूत्र आहेत, जी ७३१ सुक्तांमध्ये विभागलेली आहेत. आयुर्वेदाची उत्पत्ती ‘ब्रह्मस्मृति’ म्हणजेच ब्रह्माचे पुनःस्मरण (माहीत नसलेल्याचेच स्मरण होते) केले. याचा अर्थ आयुर्वेदकालातीत आहे. वेदांमधून प्राचीन वैद्यकशास्त्राचे काही पुरावे सापडतात. उदा.ॠग्वेदात असे उल्लेख सापडतात की, ज्यात राणी विषपाला हिला कृत्रिम पाय प्रत्यारोपित केला. अश्विनी कुमार, ज्यांना देवतांचे वैद्य मानले जाते, त्यांनी वेळोवेळी अनेकांचे अंधत्व व कुब्जत्व दूर केले. याचे उल्लेख ॠग्वेदात सापडतात. असा कालातीत आयुर्वेदही केवळ औषधोपचार पद्धती नसून स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठीचे शास्त्र आहे. आयुर्वेदाचे प्रयोजनसुद्धा असेच आहे. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च।’ म्हणजेच, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण हे पहिले कर्तव्य आहे, मनुष्य आजारी पडू नये (preventive medicine) यासाठीचे विविध उपाय आणि योग्य जीवनपद्धती सांगितली आहे. यानंतरचे प्रयोजन म्हणजे आतुर (आजारी) व्यक्तीचे आजार/विकारांचे प्रशमन करणे, ते दूर करणे. आयुर्वेद पृथ्वीवर कसा आला, कसा आणला गेला, याबद्दल ‘आयुर्वेदावतरण’ यात सांगितले आहे. भागवत पुराणात विष्णूचा अवतार म्हणून धन्वंतरीचा उल्लेख आहे. समुद्रमंथनाच्या वेळेस मेरू (मंदार) पर्वताचे वासुकीची रवी करून मंथन केले तेव्हा 14 रत्न बाहेर पडली. त्यात अमृतकलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रगटले.

 

ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।

सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥

कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।

वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥

 

या प्रार्थनेमध्ये धन्वंतरीचे वर्णन आहे. मागील दोन हातांमध्ये शंख व चक्र आणि पुढील दोन हातांमध्ये जलौका (जळू) आणि अमृतकलश आहे. पीताबंर नेसून जगकल्याणासाठी, सर्वांना आजारांपासून मुक्त करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरले. धन्वंतरीचे प्रगटीकरण समुद्रातून (जलीय तत्त्वातून) झाल्यामुळे त्यांना ‘अब्ज देवता’ही म्हटले जाते. ब्रह्माने एक लक्ष श्लोकांमध्ये आयुर्वेदाचे स्मरण केले. त्यांनी दक्ष प्रजापतिला तो शिकवला. पुढे अश्विनी कुमार, इंद्र आणि धन्वंतरी यांनी त्याचे ग्रहण केले. धन्वंतरींनी आयुर्वेदाचे वर्गीकरण आठ विभागांत केले (म्हणून ‘अष्टांग आयुर्वेद’)त्यामुळे ते अध्ययनास सोपे झाले. प्राचीन काळातील ऋषी बुद्धीने तल्लख आणि निष्णात होते. त्यांनी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संमेलन हिमालयाच्या पायथ्यापाशी भरवले. यात आत्रेयऋषी, काश्यपऋषी, धन्वंतरी, दिवोदास इ. होते. आत्रेयांनी कायचिकित्सा (Medicine) काश्यपांनी स्त्रीरोग आणि बालरोग व धन्वंतरींनी शल्यचिकित्सा (Surgery) यात नैपुण्य प्राप्त केले. धन्वंतरीकडून दिवोदासांनी नंतर त्यांच्याकडून सुश्रुतांनी व अन्य सात शिष्यांनी हे ज्ञान आत्मगत केले. आत्रेयऋषींनी त्यांच्या सहा शिष्यांना आयुर्वेद शिकविला. ही गुरू-शिष्य परंपरा पुढे चालू राहिली. आजही सुश्रुत संहिता व चरक संहिता यांचा आयुर्वेदस्नातक अभ्यासतात यांचा बृहत त्रयीमध्ये (तीन महत्त्वाच्या संहिता) समावेश होतो.

 

जसजसे युग बदलत गेले, तसतसे आध्यात्मिक अंगाचा दृष्टिकोन बदलून शास्त्रीय दृष्टिकोन येऊ लागला. कलियुगात हल्लीच्या काळात शास्त्रीय आधारावर आयुर्वेद आजही सिद्ध करता येतो. हळदीचा रक्तस्त्राव थांबविणे हा गुण आजही बघायला मिळतो. जळवांचा अशुद्ध रक्त काढणे, जेथे अवरोध (block) आहे तो काढणे यासाठी आजही उपयोग होतो. विविध भस्मांचा औषधी कल्पांमधील वापर Nano Technologyने आज ही सिद्ध करता येतो. भारताने जगाला तत्त्वज्ञान दिलेच आहे. त्याचबरोबर ‘योग’ आणि ‘आयुर्वेद’ ही दोन शास्त्रेही भारतानेच जगासमोर आणली आहेत. जसे २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो, त्याच धर्तीवर ‘आयुष’ (Ministery of Ayush) द्वारा धनत्रयोदशीला म्हणजे धन्वंतरी जयंतीच्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ सन २०१६ पासून साजरा केला जातो. जनसामन्यांसाठी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते. २०१६ रोजी डायबेटिस (मधुमेह) आणि त्याचे निवारण (Prevention) ही थीम होती. २०१७ साली ‘Pain Management’ ही थीम होती. सन २०१८ साठी थीम आहे, ‘Ayurveda In public Health’ या पद्धतीने आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केल्याने, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे शक्य होईल. तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभो, ही धन्वंतरीचरणी प्रार्थना...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/