आनंदाचे दीप अंतरी
महा एमटीबी   04-Nov-2018

 


 
 
दिवाळी म्हणजे पूर्वीच्या पिढीचे संस्कार पेरण्याचं प्रयोजन ठरते, असं मला वाटतं. ही दिवाळी सगळे संस्कार जपते. म्हणूनच पूर्वीच्या पिढीप्रमाणे आजची पिढीही पारंपरिक वस्त्रालंकार लेवून, देवाचे आशीर्वाद घेऊन परिवारासवे हे दिवस साजरे करते. अद्याप तरी वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा पूजांमध्ये फ्युजन आलेलं नाही. आकाशदिवे आणि फटाक्यांचा चिनी अंदाज वगळता अजूनही हा शुद्ध भारतीय सण आहे...
 

आपण वर्षभर अनेक सण साजरे करतो. जवळपास प्रत्येक महिन्यात एक सण असतो, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. पण, अशी रेलचेल असली तरी दिवाळीची सर कशालाही येत नाही, हेही तितकंच खरं! म्हणूनच वर्षातला सर्वात आवडता सण कोणता? असा प्रश्न केला तर ‘दिवाळी’ असं उत्तर झटकन तोंडी येतं. मला प्रकाशाचं विलक्षण वेड आहे. प्रकाश सर्वांनाच आपल्याकडे खेचून घेतो, आकर्षित करून घेतो. एरवी प्रसन्नता अनुभवायला मिळत असली तरी, दिवाळीमध्ये असतं तितकं प्रसन्न वातावरण खचीतच अन्य वेळी बघायला मिळतं. मुख्य म्हणजे हा सण प्रत्येकाच्या मनात सकारात्मकतेची पेरणी करणारा आहे. नव्या संवत्सराची सुरुवात करणारा आहे. म्हणूनच तो विशेष महत्त्वाचा ठरतो. एक पिढी दुसर्‍या पिढीकडे खूप काही देत असते, सुपूर्द करत असते. त्यात भौतिक चीजवस्तूंबरोबरच संस्कार आणि परंपरांचा मोठा वारसा हस्तांतरित होत असतो. माझ्या मते, दिवाळीच्या रूपाने अथवा दिवाळीमध्ये या विनिमयाला एक वेग येतो.

 

काळानुरूप सगळ्याचे संदर्भ बदलतात. जसं की पूर्वी बर्‍याच घरांमध्ये १० दिवसांचा गणपती असायचा. काही ठिकाणी पाच दिवसांचा असायचा. सगळे एकत्र बसून मोदक करायचे. पण, आता बर्‍याच घरांमध्ये मोदकांची ऑर्डर दिली जाते. वेळ नसल्याची सबब सांगून पाच-दहा दिवसांच्या गणपतीलाही दीड दिवसांमध्येच निरोप दिला जातो. पण, दिवाळीच्या बाबतीत हा बदल बघायला मिळत नाही. कोणालाही पाच-सहा दिवसांची दिवाळी एक-दोन दिवसांत संपावी असं वाटत नाही. आज दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. सजण्या-धजण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. नवीन पक्वान्नं फराळाच्या ताटात विराजमान होत आहेत. पण, या सगळ्यात दिवाळीच्या मूळ आनंदाला किंचितही धक्का लागलेला नाही. आजही फटफटण्याच्या आधी केलेल्या पहिल्या अभ्यंगस्नानाचा आनंद वेगळा असतो. असूरस्वरूप मानून टाचेखाली विशिष्ट प्रकारचं फळ चिरडण्याचा आनंद वेगळा असतो. या क्रियेतून आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक भावनांचा नाश झाल्याची, वाईटाचा अंत झाल्याची निश्चिंत भावना वेगळी असते. आता आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं होईल, ही आश्वस्तता वेगळा आनंद देऊन जात असते.

 

दिवाळीत आपण परिसर झळाळून टाकणार्‍या पणत्या पाहतो. एरवी धकाधकीत आईने तिन्हीसांजेला देवापुढे लावलेल्या दिव्याकडे लक्षही जात नाही पण, दिवाळीत तेलाच्या वातींकडे पाहून मात्र परमानंद होतो. मला नाही वाटत, ही ज्योत बघून कोणाच्याही मनात नकारात्मक भावना उरत असतील. हा सौम्य आणि संस्कारी झगमगाट बघून मनात प्रसन्नता भरून उरते. दररोज दारापुढे रांगोळी घालण्याची संस्कृती हळूहळू हरवत चालली आहे. पण, ती संपली नसल्याची ग्वाही दिवाळीमुळे मिळते. एरवी सोसायटीतील कोणी वात्रट मुलगा दारातली रांगोळी हळूच पुसून जातो. पण, दिवाळीतील रांगोळी पुसण्याचं धैर्य त्याच्या ठायी नसतं. अगदी सोसायटीतील रस्त्याच्या कडेने अथवा मैदानांवर काढलेल्या संस्कारभारतीच्या मोठमोठ्या रांगोळ्याही दोन-तीन दिवस जशाच्या तशा पाहायला मिळतात. कारण, एरवी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना किंचितही अपराधीपणा न मानणारे लोकही दिवाळीच्या रांगोळीला पाय न लावण्याचे संस्कार पाळतातआजही एखादा घोळका समोरून एखाद्या वृद्धाला येताना पाहतो, तेव्हा बॉम्ब अथवा लवंगी फटाका लावताना दोन मिनिटे थांबतो. वृद्धाने रस्ता पार केल्यानंतरच फटाक्याला बत्ती लागते. कारण, हे संस्कार त्यांच्या मनात पाझरलेले असतात. आमच्या पिढीलाही घरच्या फराळावर ताव मारायला आवडते. आजची पिढीही अभ्यंगस्नान करून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी, एखाद्या मंदिरात गर्दी करते आणि एकमेकांचं अभीष्टचिंतन करत दिवाळीच्या शुभेच्छा देते. डोंबिवलीतील फडके रोड, ठाण्यातील तलावताळी, पुण्यात तळ्यातील गणपती, पर्वती, नागपूरचा टेकडी गणपती, महाल हा जुना भाग अशी ठिकाणं याची साक्ष देतील. बरेचदा वर्षभर न भेटणारी माणसं इथे हमखास भेटतात. या सगळ्यांमुळेच दिवाळी हा आनंदाबरोबरच स्नेह वृद्धिंगत करणारा सण ठरतो.

 

दिवाळी ही पूर्वीच्या पिढीचे संस्कार पेरण्याचं प्रयोजन ठरते, असंही मला वाटतं. ही दिवाळी सगळे संस्कार जपते. म्हणूनच पूर्वीच्या पिढीप्रमाणे आजची पिढीही पारंपरिक वस्त्रालंकार परिस्धान करून, देवाचे आशीर्वाद घेऊन, घरच्या मंडळींसवे हे दिवस साजरे करते. अद्याप तरी वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन अशा पूजांमध्ये कोणत्याही प्रकारचं फ्युजन आलेलं नाही. आकाशदिवे आणि फटाक्यांचा चिनी अंदाज वगळता अजूनही हा शुद्ध भारतीय सण आहे, असं म्हणता येईल. मी एक कलाकार आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण मला दिवाळीचा आनंद मोठ्या परिघात वाटता येतो आणि मोठ्या परिघातून मिळवता येतो. दिवाळी पहाटच्या निमित्ताने आम्ही आमच्याच नव्हे, तर अनेक कुटुंबीयांना भेटतो. मी दिवाळीत नाटकाचे प्रयोग करते. या निमित्ताने खूप काही शेअर करण्याचा आनंद मिळतो. एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचण्यातील सौख्य मिळतं. मुख्य म्हणजे या सगळ्यामध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचत असल्याचा प्रभाव आणि परिणाम समाधानाच्या एका वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचवतो. आज आमची पिढी सतर्क आहे. त्यांना जाणिवा आहेत, स्वत:चे विचार आहेत. त्यामुळेच असेल कदाचित, पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाक्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. आपल्यापैकी प्रत्येक जण हे अनुभवत असेल. आमच्या पिढीची सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्याचं दिवाळीसारख्या सणामधून स्पष्ट होतं. कारण हीच पिढी दिवाळीमध्ये एखाद्या अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला भेट देते. त्यांच्यासवे फराळाचा आनंद लुटते. कोणी नव्या कपड्यांचं, फराळ-फटाक्यांचं वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद साश्रू नयनांनी टिपतं. मी स्वत: अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्यामुळे, या कामी नवी पिढी किती पुढे आहे हे अगदी जवळून जाणते. इतकंच नव्हे, बरेचदा समाजाची वक्रदृष्टी झेलणारा एलिट क्लासही यानिमित्ताने सर्वसामान्यांजवळ येताना मी पाहिलं आहे.

 

खरं सांगायचं तर अशा अनेक घटनांमुळे आपली समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. एखादा धनदांडगा आपल्या मुलांना अनाथाश्रमातघेऊन येतो आणितुला मिळतंय ते सुख तुझ्या कर्तृत्वाने नव्हे, तर नशिबाने मिळालं आहे. अन्यथा, तूदेखील यांच्यामधील एक असू शकला असतास!” असा सुप्त संदेश देतो, तेव्हा त्या तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या मुलांनाही आपल्या आणि दुसर्याच्या आयुष्याची खरी किंमत कळते. दिवाळी अशी ऐहिक सुखापलीकडे खूप काही देणारी ठरते. एकंदरच काळानुरूप दूर जाऊ शकणार्‍या सगळ्या गोष्टींना दिवाळी धरून ठेवते. हे वर्षानुवर्षं असंच सुरू राहील, याचीही मला खात्री आहे. आपण कितीही पुढे गेलो आणि कितीही नवी उत्पादनं वापरली, तरी दिवाळीत बहुतांश घरांमध्ये मोती साबणच दिसतो! त्याच सुगंधी तेलाचा सुवास बाथरूमभर दरवळतो. तेच खरखरीत उटणं अंगभर पसरतं. हाच तर वारसा असतो जो दिवाळी निगुतीने जपते. म्हणूनच मला दिवाळी ग्रेट वाटते. आम्ही दिवाळी अशाच आनंद आणि उत्साहात साजरी करतो. हे सगळे दिवस मी परिवारासवे असते. आमचा शाळेचा एक मोठा ग्रुप आहे. दिवाळीतील एक दिवस आम्ही एखाद्याच्या घरी भेटतो आणि भरपूर दंगा घालतो. आमच्यातील एकजण संस्कारभारतीची रांगोळी खूप छान काढतो. तो सर्वात आधी येऊन एकत्र भेटणार असलेल्या मित्राच्या घरापुढे रांगोळी घालतो. थोडं आश्चर्य वाटेल, पण आजही आम्हाला फुलबाज्या उडवायला आवडतं. इतकंच कशाला, घरातही मोठ्यांच्या आंघोळी सुरू असताना बाथरूमबाहेर उभं राहून फुलबाज्यांची वर्तुळं रेखणं हा माझा आवडता छंद आहे. मला किल्ला करायला आवडतो. या सगळ्यातून मी बालपण जपू पाहत असते.

 

होणार सून मी...’ लोकप्रियतेच्या शिखरावर होती तेव्हा एका मुलाखतीत मी, “मला अनारसे खूप आवडतात पण, आईला ते नीट करता येत नाहीत,” असा डायलॉग टाकला होता. खरंतर हे सहज सांगून गेले होते पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक दिवाळीत मी सर्वात जास्त अनारसेच खाते. कारण, असंख्य परिचित-अपरिचित चाहते प्रत्यक्ष येऊन अथवा या ना त्या मार्गाने मला अनारसे पाठवतात. खरं सांगते, त्यांच्या या प्रेमामुळे एकीकडे घरातील डबे भरतात, तर दुसरीकडे माझं मन आनंदाने ऊतू जातं. तेव्हापासून काही चहाटळ मित्र-मैत्रिणीही मला व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुकवर अनारसे बनवतानाचा व्हिडिओ, फोटो असं काही काही शेअर करतात. जाम धमाल येते हे सगळं अनुभवताना... तर माझी दिवाळी अशी रंगारंग आहे. जुने संस्कार जपणारी आणि बाह्यरंगाबरोबरच अंतरंग उजळून टाकणारी... तुम्हा सर्वांचंही आयुष्य असंच प्रकाशमय होवो आणि दिवाळीचं प्रकाशपर्व आनंदमयी जावो, हीच सदिच्छा!

 
- तेजश्री प्रधान
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/