पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीतुन बाहेर
महा एमटीबी   30-Nov-2018सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीचा तरुण फलंदाज पृथ्वी शॉ हा ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हनचा सलामीचा फलंदाज मॅक्स ब्रायंट याचा झेल घेताना पृथ्वी मैदानावर जोराने आपटला. त्यामुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतरही तो डाव्या पायावर जोर देऊन उभा राहू शकला नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरूनच मैदानाबाहेर घेऊन गेले.

 
 
 

"सिडनी मैदानावरील सराव सामन्यावेळी पृथ्वी शॉ जखमी झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अॅडलेड कसोटीत खेळणार नाही." असे बीसीसीआयने सांगितले आहे. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/