बोटांची जादू की जादूची बोटे?
महा एमटीबी   30-Nov-2018


कुठलाही कलाकार हा तसा जादूगारच. आपल्या कलेच्या माध्यमातून तो साकारत असलेली प्रत्येक कलाकृती ही समोरच्याच्या मनाला अगदी स्पर्शून जाते, काही वेळा अगदी थक्क करून सोडते. मूर्तिकलाही त्यापैकीच एक. गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात विशेषत्वाने या मूर्तिकारांच्या जादुई हातांचे नमुनेच मूर्तींच्या रूपाने समोर येतात अन् त्यांच्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे साक्षात या मूर्तीतून प्रकटतात. असाच एक कल्पनांना मूर्तरूप देणारा शिल्पकार म्हणजे नाशिकजवळील वणीचा विक्रम पवार... विक्रमने साकारलेल्या देवीदेवतांच्या तसेच इतरही मूर्ती पाहिल्या की खरंच प्रश्न पडतो, ही बोटांची जादू की जादूची बोटे....

 

कलाक्षेत्र हे असे एक क्षेत्र आहे की, आवड, छंद आणि चरितार्थाचं साधन म्हणून करावी लागलेली निवड, हे सगळं जर अगदी सुव्यवस्थित जुळून आले, तर त्या कलाकाराला नाव, लौकिक, मान आणि पैसा सारंच लाभतं. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक व्यावसायिक वातावरणाचं स्वरूप देण्याचं काम शिल्पकार विक्रम पवार यांनी केलं. शिल्पकार विक्रम पवार हे गेली 35 वर्षे हा व्यवसाय करीत असले तरी, ते त्याकडे ‘व्यवसाय’ म्हणून न पाहता कलाकार म्हणून ते मूर्तिकाम करतात. दगडाच्या ओबडधोबड आकारांतून कोणत्या देवतेचा आकार निर्माण होईल, हे शिल्पकार ताडतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण आणता येत नाही. नावातच ‘विक्रम’ असलेले पवार यांनी लहानपणापासून स्वत:ही कठीण परिस्थितीचे घाव सोसले. त्यांनी दगडातून देव शोधत चरितार्थ भागविणे एवढाच उद्देश न ठेवता ओबडधोबड दगडांवर जादुई बोटांनी दगडांना देवपण आणण्यासाठी साधना सुरू ठेवली.

 

 
 

संगमरवर, काळापाषाण, लाल दगड, पिवळा दगड, आपला नैसर्गिक काळा दगड, बेसाल्ट दगड अशा विविध जातींच्या दगडांना विक्रमी बोटांची जादू अनुभवायला मिळाली आहे. एरवी दगड म्हणून त्याच्याकडे कुणाचही लक्ष जात नाही. मात्र, जर तो दगड विक्रम यांच्या बोटांच्या स्पर्शाने आकारबद्ध झाला, तर त्याच दगडाला देवत्व मिळाल्यामुळे भाविक त्याला मंदिरात प्रतिष्ठापित करतात वा त्याच्यासाठी मंदिर बांधतात. कुठे आहे हे शिल्पकार विक्रम पवार? हा प्रश्न वाचकांना पडलेला असणार! नाशिकहून सप्तशृंगी वणीला, साडेतीन पीठांपैकीएक असे हे माता भगवतीचे तीर्थक्षेत्र.

 

 
 

वणी गावात प्रवेश करताना आपल्या उजव्या-डाव्या हाताला पाथरवटांनी घडविलेल्या हिंदू देवदेवतांच्या विविध आकारांतील असंख्य मूर्ती दिसतात. आपल्या गाडीचा वेग मंदावतो. नजरा स्थिर होतात... थक्क होतं मन... ना भव्य स्टुडिओ... ना कुठला देखावा... ना कुठले भव्य सेट... रस्त्यावरंच सारं जेवण, राहणं, दगड शोधून आणणं, छिन्नी-हातोड्यांसह थोडीफार इतर साधनं अस्ताव्यस्त पडलेली आणि घडवून पूर्ण झालेल्या मूर्ती... या सर्वांमुळे रस्त्याच्या कडांना आलेलं गॅलरीचं स्वरूप... कुठला मोठेपणा नाही, मान-मतराब नाही, कलाकार असल्याचा गर्व नाही. असे हे शिल्पकार विक्रम आपल्यालाशी विनम्रतेने बोलायला येतात. सर्व माहिती अगदी निरागसपणे देतात. अशा या गुणी कलाकाराला भेटण्याचं भाग्य मला लाभलं. हे विक्रम मूळचे मध्यप्रदेशचे. राजा विक्रमादित्याच्या उज्जैनजवळच असलेल्या शाजापूर जिल्ह्यातील जलारागावचे... त्यांचे वडील पाथरवट अर्थात शिल्पकार. त्यांच्या लहानपणी नाशिकजवळील वणीला आले आणि तेथेच स्थिर झाले. त्यांचाच हा कलावारसा विक्रमाने पुढे सुरू ठेवला आहे. आता त्यांचा मुलगा शिव हाही शिल्पकलेचा वारसा पुढे चालू ठेवणार यात काही संदेह नाही.

 
- प्रा. गजानन शेपाळ 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/