'२.०' साठी १२,००० वेबसाइट्स ब्लॉक
महा एमटीबी   29-Nov-2018 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवुडचा खिलाडी अक्षयकुमार यांचा बहुचर्चित ‘२.०’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. ‘२.०’ या सिनेमाला पायरसीचा फटका बसू नये. यासाठी सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी १२,००० पेक्षा अधिक वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. इंटरनेटसेवा देणाऱ्या या (आयएसपी) १२,००० वेबसाइट्स आहेत. यापैकी काही वेबसाइट्सद्वारे सिनेमांची पायरसी केली जाते. यातील २००० पेक्षा जास्त वेबसाइट्स या तामिळ रॉकर्सकडून नियंत्रित केल्या जातात.
 

तामिळ रॉकर्स ही एक पायरसी वेबसाइट आहे. या वेबसाइटनवरून अनेक भाषांमधील सिनेमांची पायरसी केली जाते. या वेबसाइटची सेवा ब्लॉक करण्यात यावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ‘२.०’ या सिनेमाचे निर्माते आणि लिका या प्रोडक्शन कंपनीने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. एम. सुंदर यांनी या याचिकेवर सुनावणी केली.

 

तामिळ रॉकर्स ही वेबसाईट चालविणाऱ्या काही जणांना जुलै महिन्यात पोलीसांनी अटक केली होती. तरीदेखील ऑगस्ट महिन्यात या वेबसाइटवरून अनेक सिनेमे लिक करण्यात आले होते. अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘मुल्क’ हा सिनेमादेखील तामिळ रॉकर्सकडून लिक करण्यात आला होता. तामिळ रॉकर्सवर बंदी घातलेली असली तरी वेगवेगळे डोमेन वापरून तामिळ रॉकर्स सिनेमे लिक करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/