समत्वाचा संदेश देणारं श्रीगणेश-दत्त मंदिर
महा एमटीबी   28-Nov-2018 
 
जात, पंथ यामधील भेद मिटवून समाजाला समत्वाचा संदेश देणारं श्रीगणेश-दत्तमंदिर. माणूस घडवणारं, संस्काराचा दागिना देणारं, मनामनाला जोडणारं हे मंदिर. मंदिराचा मूळ उद्देश समाजाला एकसंघ ठेवून सात्विक वृत्तीचं संवर्धन करणं. शुद्ध अध्यात्म, भक्तिभाव जागृत करून प्रकाशाच्या तेजोमय वाटेवरून घेऊन जाणं होय. अशा या भंडारा जिल्ह्यातील लाखनी नामक गावातील ‘श्रीगणेश दत्तमंदिरा’ची माहिती देणारा हा लेख...
 

आपल्या देशात बरीच प्राचीन मंदिरं आहेत. हजारो वर्षांचा इतिहास असलेली पुराणकालीन मंदिरं आहेत. ती वेगवेगळ्या देवदेवतांची असून त्यावर कोरीव काम केलेल्या अप्रतिम कलाकृती बघायला मिळतात. स्थापत्त्यशास्त्र, शिल्पकला याचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. मंदिरांची रचना, बांधणी यामधून ते कोणत्या काळात आणि कोणत्या प्रकारातील मंदिर आहे, हे लक्षात येतं. काही एक-दोन दशकांपूर्वी उभारलेली मंदिरं आहेत. आता बांधलेल्या मंदिरांमधूनदेखील सकारात्मकता, सात्विकता, सतेजता या तीन ‘स’चा सुरेख संगम झालेला जाणवतो. या तीन ‘स’मधून समाजाला सदैव ऊर्जेचा लाभ होतो. समाजातील सर्वस्तरीय विषमता नाहीशी करून समानता प्रस्थापित करण्यास साहाय्यभूत होणाऱ्या आजच्या मंदिरांमध्ये ‘श्रीगणेश दत्तमंदिर’ हे एक आहे. हे श्रीगणेश-दत्त मंदिर भंडारा जिल्ह्यातील लाखनी नामक गावात आहे. तीन मजली या मंदिरात ११ देवांची स्थापना केलेली आहे. संतांच्या शक्तिसंपन्न करांद्वारे देवांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आलेली आहे. अत्यंत रेखीव, सुबक मूर्तींमधून भक्तांना भगवंत आपल्याशी संवाद साधतो आहे, असे जाणवते. देव आपल्याकडे बघतो आहे, इतक्या या मूर्ती सजीव आणि बोलक्या...

 

 
 
 

हे संगमरवरी मंदिर असून सर्वत्र स्वच्छता आहे. सगळा परिसर शुभ स्पंदनांनी भारलेला असल्याची अनुभूती भक्तांना येते. पैशाची मागणी नाही की, पुरोहितांचा तगादा नाही. भाताच्या शेतामध्ये निसर्गसौंदर्याने विनटलेल्या निसर्गामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे. नाजूक सुगंधी पारिजातक हा मंदिराच्या पायऱ्यांपाशी स्वागताला सिद्ध असतो. सवत्स गोमातेचं दर्शन घेऊन औदुंबर वृक्षाभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गावर शिंपलेला शेणाचा सडा, रेखलेली रंगावली प्रसन्नतेमध्ये भर टाकते. अर्धगोलाकृती संगमरवराच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर काळ्या पाषाणातील वरदविनायक रिद्धी-सिद्धीसोबत उभा आहे. पांडुरंगाचं स्मरण करून देणारा हा वरदविनायक समस्त भक्तांना संकटांमधून बाहेर येणार असल्याची ग्वाही देतो. ध्यानगृहात श्रीदत्तात्रेय, नृसिंह सरस्वती स्वामी व प. पू. विष्णुदास महाराज विराजमान झालेले आहेत. सकल भक्तांना शांतीचा सुरेख अनुभव देऊन कलियुगात ध्यान, नाम व उपासनेला दुसरा पर्याय नसल्याचं कथन करतात. अष्टकोनांवर द्वादशकोनी महालात राधा-कृष्णाच्या मूर्ती भक्तांचे हृदय-चित्त चोरून घेतात. ज्ञानदाता भगवान शंकर आणि अंतरिक्ष हनुमंत मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचं रक्षण करण्यास सदैव सज्ज आहेत.

 

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्त एकदा श्रीगणेश-दत्त मंदिरात आला की, त्याला या स्थानाची ओढ लागते. अनेक संतांनी-ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी तप केलेली ही भूमी आहे. नित्य उपासना, पूजा, आरती या मंदिरात नित्यनेमाने तर होतेच, शिवाय इतर अनेक उत्सव चालू असतात. अभिषेक, अन्नदान अखंड चालू असल्यामुळे या स्थानी अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. शिवलीलामृत, गुरूचरित्र इत्यादी ग्रंथांच्या पारायणांमुळे वातावरण भारलेले आहे. अनेक प्रकारचे यज्ञ-याग संपन्न होत असल्यामुळे वाईट शक्तींना इथे शिरकाव करण्यास किंचितही फट मिळत नाही. दु:ख, क्लेष, चिंता या मंदिरात मनापासून दर्शनाला येणाऱ्यांच्या दूर निघून जातात.

 

 
 

इतर मंदिरांपेक्षा हे मंदिर आगळं वेगळं आहे. संपूर्ण मंदिराची व्यवस्था बघणारं जे दाम्पत्य आहे, ते अत्यंत नि:स्पृहपणे सेवेमध्ये रमून गेलेलं आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणाने सेवा करणाऱ्या या दाम्पत्याचं कौतुक वाटतं. निर्मोहीपणानं मंदिराची सेवा करताना परमार्थामध्ये अडसर असणारी ‘माया’ यांना त्रास देत नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा या तीन ‘प’च्या मागे धावणाऱ्या जगापासून हे दाम्पत्य फार दूर आहे. मंदिरातील शिस्त, स्वच्छता, टापटीपता नजरेत भरण्याजोगी आहे. शहरी कोलाहलापासून दूर असणाऱ्या या गणेश-दत्त मंदिरात दुर्मीळ असणाऱ्या शांतीचा लाभ होतो. जीवन ओंजळीत ‘समाधानाने मोती’ देणारं हे स्थान आहे. कोट्यवधी रुपये देऊनही जे समाधान आणि शांती मिळू शकत नाही, ती या मंदिरात सहजपणाने गवसते. देश-परदेशातून येणाऱ्या प्रत्येक भक्ताची आपुलकीनं, आस्थेनं विचारपूस करून सोय केली जाते.

 

प्रपंचामधील समस्या, संकट तर दूर होतातच, हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. शिवाय आध्यात्मिक अनुभूतीनं भक्त संपन्न होतात. इथल्या चैतन्याचा, ऊर्जेचा स्त्रोत कधीच कमी होत नाही. उलट अलौकिक शक्तीची अनुभूती या स्थानी येते. सगुण दर्शन, प्रकाश, अनाहृत नाद अशा दिव्य अनुभवांचा लाभ साधकांना होतो. गुरुतत्त्व एकच असल्याचा प्रत्यय देणारं हे श्रीगणेश-दत्त मंदिर आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग, दत्त, कृष्ण, गणेश, हनुमान, महादेव हे देवही एकच असून फक्त नामामध्ये फरक असल्याचा आत्मानुभव येऊन भक्तं खऱ्या परमार्थ मार्गावर प्रवास करायला लागतात.

 

जात, पंथ यामधील भेद मिटवून समाजाला समत्वाचा संदेश देणारं श्रीगणेश-दत्तमंदिर आहे. माणूस घडवणारं, संस्काराचा दागिना देणारं, मनामनाला जोडणारं हे मंदिर. मंदिराचा मूळ उद्देश समाजाला एकसंघ ठेवून सात्विक वृत्तीचं संवर्धन करणं. शुद्ध अध्यात्म, भक्तिभाव जागृत करून प्रकाशाच्या तेजोमय वाटेवरून घेऊन जाणं होय. पैसा मिळवण्याचं साधन म्हणजे मंदिर, या चुकीच्या गोष्टींना थारा न देता ‘भक्तीचं, गुरूसेवेचं स्थान म्हणजे मंदिर,’ हा आदर्श असणारं श्रीगणेश-दत्त मंदिर होय. समस्त भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

 
 
 - कौमुदी गोडबोले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/