अभिमन्यू आणि चक्रव्यूह
महा एमटीबी   28-Nov-2018

 


 
 
 
युद्धाच्या तेराव्या दिवशी गुरू द्रोणांनी आपल्या सैन्याची रचना चक्रव्यूहात केली. ठरविल्याप्रमाणे त्रिगर्त बंधूंनी अर्जुनाला आव्हान देऊन दक्षिण दिशेला युद्धात गुंतवून ठेवले. चक्राच्या मध्यावर दुर्योधन होता आणि त्या पद्मचक्राच्या अनेक पाकळ्या म्हणजे अनेक वीरयोद्धे होते. राधेय, दु:शासन, कृप आणि काही वीर दुर्योधनाच्या लगतच्या चक्रावर होते. त्यानंतरच्या चक्रात जयद्रथ, अश्वत्थामा नंतर शकुनि, कृतवर्मा, शल्य, भूरीश्रव आणि शाल्व उभे होते. सर्वात बाहेरच्या बाजूला द्रोण स्वत: होते. पांडवांकडून भीम नेतृत्व करत होता. सात्यकी, धृष्टद्युम्न आणि अनेक वीर त्याच्या मदतीला होते. त्यांनी हल्ला केला खरा, पण तो द्रोणांनी परतवून लावला. खूप वेळ युद्ध चालू होते, पण पांडव चक्रव्यूहाचा भेद करू शकले नाही. युधिष्ठीर अस्वस्थ झाला. त्याला काही सुचेना. अर्जुन या व्यूहाचा भेद करू शकला असता, पण तो तर त्रीगर्तांबरोबर गुंतला होता. आता सुभद्रापुत्र अभिमन्यू हाच एकमेव आधार होता. कारण, त्यालाच चक्रव्यूहाचा भेद कसा करतात, हे ठाऊक होते आणि ही गोष्ट युधिष्ठीरालाही माहिती होती. युधिष्ठीराला दुसरा काहीच मार्ग सुचेना. कारण, अर्जुन केव्हा परत येईल, याची शाश्वती नव्हती. सुशर्माने तर अर्जुनाला युद्धात चांगलेच गुंतवून ठेवले होते. नाईलाजाने युधिष्ठीर अभिमन्यूकडे येऊन म्हणाला, “अभिमन्यू, या चक्रव्यूहाचा भेद जर वेळीच केला नाही, तर आपल्या सैन्याचा विनाश अटळ आहे आणि तसे जर झाले, तर अर्जुनास ते अजिबात आवडणार नाही. तो मला दोष देईल. चक्रव्यूहाचा भेद कसा करतात, हे फक्त श्रीकृष्ण, कृष्णपुत्र प्रद्युम्न, अर्जुन आणि तुलाच ठाऊक आहे. त्यामधील आता या क्षणी तूच फक्त इथे हजर आहेस. तेव्हा माझ्या वत्सा, तूच आता आम्हाला मदत कर, असे मी विनवितो. या अवघड प्रसंगी तूच आमचा एकमेव आधार आहेस! तू पुढाकार घे आणि या चक्रव्यूहाचा भेद कर...”
 

अभिमन्यूने क्षणभर विचार केला आणि सुहास्यवदनाने तो म्हणाला, “तात, मी हे अवश्य करेनच. परंतु, मला एकच चिंता आहे, ती अशी की, माझ्या पित्याने मला त्यातील अर्धाच भाग फक्त शिकवला आहे. व्यूहाचा भेद करून आत कसे शिरायचे तेवढेच मी जाणतो. पण, एकदा आत गेल्यावर त्यातून बाहेर कसे यायचे, ते मला ठाऊक नाही. याचीच मला काळजी आहे.” यावर युधिष्ठीर म्हणाला, “वत्सा, तू एकदा आत शिरलास की, बाकीचे आम्ही बघून घेऊ. तू फक्त या व्यूहाचा भेद करून आत शिरकाव कर. तुझ्या मागोमाग आम्ही येऊ आणि पूर्ण व्यूहच मोडून काढू! तू काळजी करू नकोस. मी स्वत:, धृष्टद्युम्न, सात्यकी, कैकेय बंधू, पांचाल, प्रभाद्रक आणि मत्स्य हे आपल्या बरोबर असतील. तू एकदा शिरकाव केला की, काही क्षणांतच आम्ही सर्व व्यूह मोडून टाकू.” इतकी महत्त्वाची कामगिरी आपल्यावर सोपविली गेली, याचाच अभिमन्यूला आनंद झाला. त्याला अभिमानच वाटला. तो म्हणाला, “मला खात्री आहे की, हे काम मी नक्कीच पेलू शकेन आणि करून दाखवीन. माझ्या पित्यालाही अभिमान वाटेल, असे कृत्य मी करून दाखवीन.” युधिष्ठीराने त्याच्या शिरावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि तो म्हणाला, “बाळ, तुझे बोलणे खरे ठरो आणि देव तुला या कार्यात नक्कीच यश देईल. आमच्याकडील सर्व महान योद्धे मी तुझ्या दिमतीस पाठवतो. ते तुझे रक्षण करतील. वत्सा, तुझ्यावर ईश्वराची असीम कृपा राहो. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांची नावे तू उज्ज्वल करणारच असे दिसते!”

 

अभिमन्यू सर्व वडील मंडळींना प्रणिपात करून निघाला. त्याला यशाबद्दल खात्री वाटत होती. ही धोक्याची जबाबदारी आपल्यावर सोपविली गेली, हे पाहून तो खुप खूश झाला होता. चक्रव्यूह भेद कसा करायचा, याचे तंत्र त्याला अर्जुनाने शिकवले होते. ते तर असे होते की, एकदा त्यात प्रवेश केला की तो व्यूह सगळीकडून बंद होत असे. या गोष्टीचा इशारा अर्जुनाने त्याला देऊन ठेवला होता. परंतु, त्याच्या पुढील काळजी त्याचे चुलते आणि इतर कसलेले योद्धे घेणारच होते. त्यामुळे बाहेर पडायचं तंत्र ठाऊक असण्याचे आवश्यक आहे, असे त्याला वाटले नाहीच. तो अतिशय उत्साहाने रथावर आरूढ होऊन आपल्या सारथ्याला म्हणाला, “चल, मला लवकर त्या चक्रव्यूहाकडे घेऊन चल.” त्याची ही आज्ञा ऐकून सारथी तर म्हणाला, “मला तुला तिकडे घेऊन जावेसे अजिबात सुरक्षित वाटत नाही. तुझ्या कोवळ्या खांद्यांवर या पांडवांनी खूपच मोठ्ठी जबाबदारी टाकली आहे. तू हे काम नक्की करू शकशील, अशी पक्की खात्री तुला असेल तरच तू पुढे व्हावेस! तो द्रोण पापी ब्राह्मण आहे. त्याच्यासारख्या कसलेल्या योद्ध्यासमोर तू खूपच कोवळा आहेस. मला खूप भीती वाटते आहे आणि तू जाऊ नये असेच मला वाटते.” त्याचे हे बोलणे ऐकून अभिमन्यू हसू लागला. तो म्हणाला, “अरे, या द्रोणाशी दोन हात करायच्या संधीची मी वाटच पाहत होतो. ती अशी समोर चालून आली आहे मग, व्यर्थ का दवडू? मी अर्जुनपुत्र आहे! श्रीकृष्णाचा भाचा आहे! मला स्वत:विषयी आत्मविश्वास आहे. मी तर इंद्राचाही पराभव करू शकतो. मग, तू का बरे घाबरत आहेस? द्रोणांबरोबर लढणे मला काहीच कठीण वाटत नाही. त्यांच्या सैन्यातील सर्व योद्धे जरी एकत्र आले तरी, ते माझी बरोबरी करूच शकत नाही. या अर्जुनपुत्राला भीतीचा स्पर्श कसा होईल? या सर्व कौरवांना मी जाळून टाकीन! यांचे पूर्ण सैन्य मी उद्ध्वस्त नाही केले, तर मी स्वत:ला अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र म्हणवून घेणार नाही.” त्याचे एवढे बोलणे ऐकून सारथी काहीच बोलला नाही आणि आपल्या मनाच्या विरुद्ध तो रथ त्याने चक्रव्यूहाच्या दिशेने वळविला.

 
 

- सुरेश कुळकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/