देशविरोधकांची ‘संविधान बचाव रॅली!’
महा एमटीबी   27-Nov-2018

संविधान दिनी तीन नेत्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह ते महापरिनिर्वाण स्थळ चैत्यभूमीपर्यंत संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेस, माकपा, भाकपा यांच्यासह अनेक पक्षांनी व संघटनांनी भाग घेतला. म्हणजे, या तीन नेत्यांना समोर करून कॉंग्रेस, भाकपा, माकपा, राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात कोणता खेळ करीत आहेत, हे सहज लक्षात येते.
 
 
कोण आहेत हे तीन नेते? या तिघांवरही देशविरोधी कारवाया करण्याचा आरोप आहे. यातील पहिला आहे, जिग्नेश मेवानी. हा गुजरातेतील कॉंग्रेसचा आमदार आहे आणि स्वत:ला दलित नेता म्हणवतो. या मेवानीने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेकडून फंड घेतला होता. ही जी पीएफआय संघटना आहे, ती सध्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनआयए) रडारवर आहे. कारण, या पीएफआयचे संबंध इस्लामिक स्टेटच्या इराक आणि सीरियाच्या दहशतवाद्यांसोबत असल्याचा आरोप आहे. त्याचा इन्कार मेवानीने केला नाही. जो कुणी भाजपाविरुद्ध लढण्यासाठी निधी देईल तो मी स्वीकारीन, अशी उघड भूमिका त्याने घेतली होती. याला अरुंधती रॉय या कट्टर हिंदूविरोधी लेखिकेने तीन लाख रुपये निधी दिला होता. ही बया जंगलात जाऊन नक्षल्यांशी भेटत असते.
 
असा हा या सर्वांचा लाडका जिग्नेश मेवानी! राहुल गांधी यांनी या फंडाबाबत मौन धारण केले होते. रॅलीत बोलताना मेवानीने सांगितले की, एप्रिल महिन्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जो संविधान बचावचा नारा दिला होता, त्याचाच हा भाग असून आम्ही त्याचे अनुसरण करीत आहोत. म्हणजे ही रॅली कॉंग्रेसचीच आहे, हे उघड झाले. याच जिग्नेश मेवानी, उमर खालीद यांनी भीमा कोरेगाव कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे आणि अजूनही ते पोलिसांच्या रडारवर आहेत. एक बाब आणखी येथे स्पष्ट केली पाहिजे की, नक्षल्यांचे लॅपटॉप, पत्रे आणि अन्य साहित्यात कॉंग्रेस नेते दिग्विजयिंसह यांचा फोन क्रमांक सापडला होता. तो सिंह यांनी नाकारलेला नाही. पण, खुलासा करताना सांगितले की, हा फोन नंबर राज्यसभेच्या वेबसाईटवर होता व तो सर्वांसाठी खुला होता. आता तो फोन नंबर वापरणे मी बंद केले आहे. पण, त्यांना जेव्हा विचारले की, अन्य खासदारांचा नंबर सापडला नाही, तुमचाच नंबर नक्षल्यांच्या पत्रात कसा काय आला? या पत्रकारांच्या प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाहीत. दिग्विजयिंसह यांचे मेवानीसोबत संबंध असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रात दलित संघटनांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने बाहेरच्या देशविघातक नेत्यांना पाचारण करून दलितांना आपल्याकडे ओढण्याचा हा डाव खेळण्याचा प्रयत्न चालविला आहे; तर दुसरीकडे अर्बन नक्षल्यांनी दलित तरुणांना नक्षलवादाकडे ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे. नक्षल्यांच्या या कारवाईला कॉंग्रेसचा विरोध नाही. कारण, राहुल गांधी यांनीच अर्बन नक्षल हे एनजीओ आहेत, असे प्रमाणपत्र दिले आहे! तेव्हा हा डाव काय असावा, हे लक्षात येते.
 
या रॅलीचा दुसरा नेता आहे कन्हैयाकुमार. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) हा कन्हैया अध्यक्ष असताना, त्याचा मित्र उमर खालीद याने ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला, इन्शाअल्ला, काश्मीर क्या मांगे आझादी, आझादी...’ असे नारे दिले होते व कन्हैयाने त्याचे समर्थन केले होते. तेव्हा या दोघांनाही अटक झाली होती. या अटकेचा निषेध करण्यासाठी स्वत: राहुल गांधी आपल्या नेत्यांच्या फौजफाट्यासह या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी जेएनयुमध्ये आले होते. देशद्रोही विधाने करणार्यांना त्यांनी पूर्ण समर्थन दिले होते. एवढेच नव्हे, तर माकपाचे नेते सीताराम येचुरी, भाकपाचे डी. राजा हेही समर्थन द्यायला आले होते. कन्हैया हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. ज्या वेळी देशद्रोही नारे दिले जात होते, त्यात डी. राजा यांची मुलगी अपराजिता हीसुद्धा सहभागी होती, हे काही व्हिडीओमध्ये आले. डी. राजा यांनी दुसर्याच दिवशी आपल्या मुलीला अक्षरश: जेएनयुमधून ओढून नेले होते. ही अपराजिता हिंदू देवीदेवतांची विकृत चित्रे काढून ती जेएनयुमध्ये लावत असते. डी. राजा हे खासदार आहेत व त्यांना बंगला दिलेला आहे. जो स्थानिक रहिवासी आहे, त्याला होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी मिळणार नाही, असा नियम असतानाही जेएनयु प्रशासनाने तो तोडला.
ही बाब तेव्हा उघड झाली. याच जेएनयुमध्ये दररोज दारूच्या तीन हजार बाटल्या, कंडोम्स हे नाल्यांमध्ये पडून असतात आणि त्या सकाळी काढण्यात येतात, अशी जेएनयु दप्तरी नोंद आहे. त्याविषयी कन्हैयाने कधी चकार शब्द काढला नाही. हेही येथे ध्यानात घेतले पाहिजे की, जेएनयुमधील काही प्राध्यापक हे अर्बन नक्षल्यांच्या सतत संपर्कात असतात. प्रो. साईबाबा पकडला गेल्यानंतर ही बाब अधिकच प्रकर्षाने समोर आली. त्याबद्दल ना कॉंग्रेस बोलत, ना माकपा, ना भाकपा. अशी ही या तिन्ही पक्षांची मिळून ही खेळी आहे. यातील तिसरा नेता आहे, हार्दिक पटेल. हा स्वत:ला पाटीदार समाजाचा नेता म्हणवतो. पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या वेळी याचा एक व्हिडीओ स्थानिक वाहिन्यांवर व्हायरल झाला होता. पोलिस लाठीचार्ज करीत असतील, पकडत असतील तर पोलिसांना जाळा, त्यांचा खून करा, असे तो सांगत असल्याचे स्पष्ट ऐकू येते. हा व्हिडीओ नंतर देशभरात दाखवला गेला. 9 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
 
 
म्हणजे, हार्दिक पटेल आणि कन्हैया हे दोघेही सध्या देशविघातक कारवाया करण्याच्या आरोपाखाली जामिनावर आहेत आणि महाराष्ट्रातल्या दलितांना आपल्याकडे ओढण्यासाठी संविधान बचाव रॅली काढत आहेत. दलित समुदायातील नेते गप्प आहेत. त्यातही प्रकाश आंबेडकरांची भूमिका नक्षल, अर्बन नक्षल याबाबत अप्रत्यक्ष समर्थनाची आहे. हा सारा प्रकार दलित चळवळीसाठी फार मोठा धोका आहे, हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. दलित युवकांना नक्षलवादाकडे ओढण्याचा सर्रास प्रयत्न होत असताना, सारेच्या सारे दलित लेखक, कवी, साहित्यिक गप्प का आहेत, हे एक कोडेच आहे! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेत अखेरीस भाषण करताना म्हटले होते की, ‘‘महत्प्रयासाने आपण स्वातंत्र्य मिळविलेले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला, तर शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही सर्वांनी त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.’’ येथे तर डॉ. आंबेडकरांचे संविधान येत्या 50 वर्षांत नेस्तनाबूत करून नक्षल्यांचे सरकार स्थापण्याच्या वल्गना आतापासूनच नक्षलवादी नेते करीत आहेत. शेकडो आदिवासी, दलितांची हत्या नक्षली करीत आहेत. याचे प्रतिबिंब दलित साहित्यात का उमटत नाही? शेकडो दलित साहित्यसंमेलने होतात, पण तेथे कुणीही या विषयाला स्पर्श का करीत नाही, याचेच आश्चर्य वाटते! कॉंग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष जर नक्षलवादाला छुपा पाठिंबा देत असतील, तर त्याविरुद्ध डॉ. आंबेडकरांच्या संविधानसभेतील आवाहनाचा विसर आंबेडकरांच्या अनुयायांना कसा काय पडतो, हेच कळायला मार्ग नाही! नामांतर आंदोलनात याच कॉंग्रेसने दलितांची घरे जाळली होती, ओल्या बाळंतिणीवर बलात्कार केला होता.
 
 
जनार्दन मवाडे आणि पोचीराम कांबळे यांचे मुडदे पाडले होते. हा आरोप सध्या कॉंग्रेसचे आमदार असलेले जोगेन्द्र कवाडे सर यांनी हजारदा केला आहे. एकाही आरोपीला शिक्षा का झाली नाही? त्याचा विसरही आंबेडकरवाद्यांना पडला का? केवळ सत्ताप्राप्तीसाठी राजकीय पक्ष विषारी खेळी खेळत आहेत. या खेळीला समर्थन देणार्यांमध्ये आंबेडकरांची पिल्लेही आहेत का? याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.