चला शोधूया, लहान गोष्टींमधील निर्भेळ आनंद
महा एमटीबी   26-Nov-2018आपण थोडासा वेळ काढून आपल्याला खरेच काय आवडते याकडे नजर टाकावी. त्या आवडत्या गोष्टींसाठी मग जरूर वेळ काढायचा. त्या करीत असताना होणारा आनंद अनुभवायचा. एखाद्याला साध्या शीळ मानण्यात आनंद मिळेल, तर एखादीला सुंदर केशरचना करण्यात आनंद मिळेल. एखाद्याला छोटेसे समाजकार्य करण्यात आनंद मिळेल, तर एखाद्याला ध्यान करण्यात. पण आपल्याला कळायला हवे की, आपला आनंद कशात आहे...


जशी आपली नाती आपल्याला निखळ आनंद देतात, तशाच काही छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला एक निर्भेळ आनंद देऊन जातात. या गोष्टी आपल्या मनातून सहज उत्पन्न होतात. कुठलेही अवडंबर त्यात नसते. अशा सहज छोट्या गोष्टी आपण प्रत्यक्षात केल्या की, मनाला एक निखळ आनंद मिळतो, समाधान मिळते. पाहा ना, इतर लहान मुलांबरोबर खेळताना एखाद्या छोट्याशा मुलाला एखाद्या मुलाचा बॉल आपल्या हातात मिळाला तर किती बरे होईल असे वाटते. मग त्या मुलांकडून तो बॉल हातात मिळताच त्याचा चेहऱ्यावर खुदकन हसू फुलते. त्या छकुल्याला माहीत असते की, तो बॉल त्याचा नाही; पण त्याला तो फक्त हातात घ्यायचा असतो. थोडक्यात काय, काही आपल्या नसल्या तरी छोट्या गोष्टी आपल्याला खूप हर्षित करतात. मुख्य म्हणजे, लहान मुलांना त्या चटकन कळतात. पण मोठ्यांना आपल्या आयुष्याच्या रहाटगाड्यासमोर त्या कळतही नाहीत. कारण, पैसे कमवायचे असतात. घर-संसार चालवायचा असतो. त्यात संसारात सुखांना आणायचे असते. प्रतिष्ठा जपायची असते. या सगळ्यात मनातल्या कप्प्यात सहजी असलेल्या व फुलांसारख्या आपसूक फुलणाऱ्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. किंबहुना, आपण स्वत:हून त्या पाहूच शकत नाही. कारण, आपण स्वत:च्या आयुष्याचा विचार करतच नाहीत. माझ्या ओळखीतल्या एक बाई आहेत. खूप काबाडकष्ट केले आहेत त्यांनी. पूर्ण आयुष्य किडनीच्या रोगाने व्यथित झालेल्या नवऱ्याची सेवा करत काढले. एकत्रित कुटुंबात कष्ट उपसले. आपल्या मुलाला शिक्षण दिले. या सर्व गोष्टींमध्ये त्यांना आवडणारी, आनंद देणारी गोष्ट म्हणजे, पेटी वाजवणे व भजने म्हणणे. त्या म्हणाल्या, “त्यांना या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देण्याएवढा वेळच मिळाला नाही.” शिवाय लोक काय म्हणतील ? घरच्यांना काय वाटेल? असे अनेक टाकाऊ विचार. पण, त्यांना संगीतात त्यांच्या आयुष्याचा सूर शोधायचा होता हे खरे. खरे तर या गोष्टीला लाखो-करोडो रुपये लागत नाहीत. स्वतःवर फक्त प्रेम असावे लागते.

 

आपल्या रोजच्या कामापलीकडे जाऊनही स्वत:च्या अस्तित्वाचा विचार करायला लागतो. आनंदासाठी आतून प्रेरित व्हावे लागते. आयुष्य एकच आहे. या सगळ्यापलीकडे जाऊन त्या आयुष्यातल्या आपला असा उल्हास आपल्याला शोधावा लागतो. हे उत्तम. कारण, तो आपल्याला आयुष्याच्या जंजाळातसुद्धा सुखाची प्रेरणा देतो. खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याला निरागस आनंद देणाऱ्या या छोट्या-छोट्या गोष्टी आपण कराव्यात हे बरे. या गोष्टी काय असतील? चित्रपट, संगीत, खेळ, कोडी सोडविणे, पुस्तक वाचणे, मित्रांबरोबर सहलीला जाणे. माझ्या ओळखीतल्या एका आजींना लोकांना एक छानसा सुविचार सांगायला आवडत असे. सोसायटीत असलेल्या शेजाऱ्यांबरोबर संध्याकाळी त्या गप्पा मारत व लोकांना छान छान सुविचार किंवा सांस्कृतिक गोष्टी सांगत. मग त्यांना आपले आयुष्य भारल्यासारखे वाटे. त्यांचे लोकांबरोबरचे सख्य वाढले. आयुष्य हे काही क्षणांपुरते स्थिरावलेले नाही, ते विकसित होत जाते, बदलत जाते. आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. त्यानुसार आपण आपल्या आयुष्याची पकड घ्यायला हवी. एका कर्करोग पीडित महिलेला आपण कुणावर तरी ओझे आहोत, निरुपयोगी आहोत असे वाटे. त्या शिक्षिका होत्या. नंतर त्यांनी त्यांच्या शेजारच्या बाईंना पेपर व पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली. त्या शेजारच्या बाईंची एका दीर्घकालीन आजारात दृष्टी गेली होती. यानंतर या दोघी दु:खी बायकांची गोड मैत्री जमली व दोघींना आवडणारे वाचन निरंतन होत गेले. थोडक्यात काय, आपण थोडासा वेळ काढून आपल्याला खरेच काय आवडते याकडे नजर टाकावी. त्या आवडत्या गोष्टींसाठी मग जरूर वेळ काढायचा. त्या करीत असताना होणारा आनंद अनुभवायचा. एखाद्याला साध्या शीळ मानण्यात आनंद मिळेल, तर एखादीला सुंदर केशरचना करण्यात आनंद मिळेल. एखाद्याला छोटेसे समाजकार्य करण्यात आनंद मिळेल, तर एखाद्याला ध्यान करण्यात. पण आपल्याला कळायला हवे की, आपला आनंद कशात आहे... लहान विजय साजरा करा आणि नाजूक क्षणांचा जरासा आनंद घ्या. कारण, एक दिवस तुम्हाला हे जाणवेल की, हेच क्षण मोठे क्षण होते.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/