‘त्या’ सूत्रधारांना शिक्षा कधी?
महा एमटीबी   26-Nov-2018 
 
 
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला काल १० वर्षे पूर्ण झाली. मुंबई येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांबद्दल माहिती देणाऱ्यांना, त्यांना पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
 
 
अमेरिकेचे सहा नागरिक या हल्ल्यात मारले गेले, म्हणून निव्वळ सहानुभूतीपोटी हे बक्षीस अमेरिकेने जाहीर केलेले नाही. हल्ल्याला दहा वर्षे उलटून गेली तरीदेखील २६/११च्या सूत्रधारांना अद्याप शिक्षा झालेली नाही. पाकिस्तान त्यांना पाठीशी घालत आहे. किंबहुना, पाकिस्तान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकेसारख्या महाकाय देशाने हस्तक्षेप करूनही हल्ल्याचे सूत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे तर दूरच, पण दहशतवादी कारस्थाने थांबविण्याचे नाव पाकिस्तान घेतच नाही. अमेरिकेला ३५ कोटी रुपयांचे हे बक्षीस जाहीर करावे लागले, यातच सगळे आले. मुळात एखाद्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांविषयी लोकांनी माहिती द्यावी, याकरिता असे कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर करायला लागावे, हेच खरे अपयश म्हणावे लागेल. पैशांच्या लालसेपोटी तरी लोकांनी सूत्रधारांविषयी माहिती द्यावी, हा उद्देश हे बक्षीस जाहीर करण्यामागे होता.
 
दरवर्षी २६/११च्या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. हल्ल्यातील सूत्रधारांचा शोध कसा फक्त एका सिमकार्डमुळे लागला, अशा अनेक स्पेशल स्टोरीजही या दिवशी वाचायला मिळतात. दरवर्षी २६/११ ही तारीख आली, हा दिवस उगवला की त्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे ती तारीख ते वर्ष स्मरणात राहिल्याने, त्यानिमित्ताने का होईना, पण लोक या हल्ल्यातील दोषींवरील कारवाई कुठपर्यंत आली याचा आढावा घेतात. वर्षभरात या कारवाईचा कोणीच मागोवा घेत नाही. भारताने या हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले. त्याचा जवाबही घेण्यात आला. कसाबला फाशी कधी? असा सवाल विचारता विचारता, त्याला फाशी देऊन त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, असाच प्रयत्न भारतीय न्यायव्यवस्था नेहमी करते. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला जातो. प्रत्येकाची बाजू आपल्या न्यायव्यवस्थेत ऐकून घेतली जाते. त्यामुळेच कसाबला फाशी देण्यास उशीर झाला, परंतु त्याला असे कुकर्म करायला लावणारे आणि असे अनेक कसाब घडवणारे या दहशतवादी हल्ल्याचे मूळ सूत्रधार मात्र नामानिराळेच राहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात एके-४७ घेऊन वावरणारा कसाब दिसत असूनही त्याला फाशी देण्यास विलंब लागला. भारताने सामान्य जनतेचा तसेच या हल्ल्यात आपली माणसे गमावलेल्या नातेवाईकांचा रोष पत्करून कसाबला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली. परंतु, अंतत: त्याला फाशी झालीच. हाफिज सईदला शिक्षा व्हावी यासाठी भारताने अतोनात प्रयत्न केले. परंतु, प्रत्येक देशाला जशा सीमारेषा असतात, तशाच काही मर्यादाही असतात. या मर्यादांचा उंबरठा ओलांडून २६/११च्या सूत्रधारांना फाशी देणे, हे लक्ष्य आता भारतापुढे आहे.
 
 
अमेरिकेची या बाबतीत भारताला मदत होत आहे. कारण दहशतवादाच्या बाबतीत अमेरिकाही भारताप्रमाणे समदु:खी आहे. ९/११चा हल्ला अमेरिका अजूनही विसरू शकलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी अनेक विचार मांडले जातात. आज अवघ्या जगाला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. इस्लामिक देशांमध्ये तर याहूनही भयानक परिस्थिती आहे. फरक फक्त एवढाच आहे की, तालिबान, इसिस या दहशतवादी संघटना दहशतवादी हल्ल्याचे श्रेय घेण्यासाठी ईमेल किंवा अन्य माध्यमे त्याची वापरून कबुली देतात. परंतु, पाकिस्तानची तर गोष्टच निराळी आहे. करून-सवरून पाकिस्तान नेहमी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. जवाब विचारला असता, धडधडीत खोटी उत्तरं भारताला मिळतात. कसाबचा मृतदेह स्वीकारण्यासदेखील पाकिस्तानने नकार दिला होता. कसाब हा पाकिस्तानी नागरिक नाही, असे पाकिस्तानकडून सांगितले गेले, तर दुसरीकडे मात्र त्याच पाकिस्तानातील कसाबचे नातेवाईक तो त्यांच्याच कुटुंबातील असून काही वर्षांपूर्वी घर सोडून गेल्याची ग्वाही देतात. ड्रॅगन जसा सतत तोंडाने आग ओकत असतो, त्याप्रमाणे पाकिस्तान हा देश जगभरात दहशतवाद पसरवत आहे. नळीत घातलेली कुत्र्याची शेपूट सरळ होईल, पण पाकिस्तानची वृत्ती बदलणार नाही.
 
 
- साईली भाटकर 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/