इजिप्शियन देवदेवता आणि चिह्नसंकेत
महा एमटीबी   25-Nov-2018२४ तासांत पृथ्वीच्या सूर्याभोवताली होणाऱ्या एका फेरीमुळे निर्माण होणारी सूर्याची आवर्तने आणि नाईल नदीचा वार्षिक पूर ही नैसर्गिक परिस्थिती फार प्रभावी होती. निसर्गातील नेमक्या याच दोन नियमित घटनांमुळेच पाणी आणि सूर्य यांना देवत्त्व दिले गेले आणि या दोन नैसर्गिक शक्ती, असंख्य चिह्ने आणि प्रतीकांच्या व्यक्त माध्यमात रचल्या गेल्या.


काही सहस्त्र वर्षांपासून प्रगत झालेल्या इजिप्शियन संस्कृतीवर आणि प्रत्येक घटनेवर निसर्गाचा फार मोठा प्रभाव होता. २४ तासांत पृथ्वीच्या सूर्याभोवताली होणाऱ्या एका फेरीमुळे निर्माण होणारी सूर्याची आवर्तने आणि नाईल नदीचा वार्षिक पूर ही नैसर्गिक परिस्थिती फार प्रभावी होती. निसर्गातील नेमक्या याच दोन नियमित घटनांमुळेच पाणी आणि सूर्य यांना देवत्त्व दिले गेले आणि या दोन नैसर्गिक शक्ती, असंख्य चिह्ने आणि प्रतीकांच्या व्यक्त माध्यमात रचल्या गेल्या. वार्षिक पुरामुळे नाईल नदीचे दोन्ही तीर आणि तिचा त्रिभुज प्रदेश खूप सुपीक होता. मात्र, हा त्रिभुज प्रदेश चारी बाजूंनी शुष्क हवामान असलेल्या वाळवंटाने घेरलेला होता. ख्रिस्तपूर्व ३००० या कालावधीत प्राचीन इजिप्तमधील परिस्थिती कशी होती ते पाहणे आवश्यक आहे. एका बाजूला संशोधन आणि अभ्यास करणारे विद्वान-व्यासंगी बुद्धिमान नागरिक होते. दुसऱ्या बाजूला निसर्गातील विषम वातावरण, दूरवर पसरलेली गावे, त्यातील अनेक देव-देवता, त्यांना व्यक्त करणारी असंख्य चिह्ने - प्रतीके, इजिप्शियन नागरिकांच्या देव-देवतांच्या असंख्य संकल्पना आणि त्याला जोडलेल्या श्रद्धा आणि उपासना-उपचार पद्धती हे सर्वच वास्तव खूपच गुंतागुंतीचे आहे. साधारण ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धर्म, संप्रदाय, पंथ अशा सर्वच पातळ्यांवर इजिप्तमध्ये ही अनागोंदीसारखी परिस्थिती रूढ होती. इजिप्शियन नागरिकांच्या श्रद्धेनुसार नाईल नदी मगरीच्या घामातून निर्माण झाली होती. या नाईल नदीत अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर होता. त्यातील सर्वात जास्त हिंस्त्र होती, ‘नाईल क्रोकोडाईल’ म्हणजेच नाईल नदीतील मगर. ‘सोबेक’ या नावाने या मगरीला नाईल नदीची देवता हा सन्मान प्राचीन इजिप्तमधील नागरिकांनी दिला होता. संधी मिळताच माणसांना खाणाऱ्या अत्यंत धूर्त, चपळ, नीडर आणि निर्भय अशा या मगरीची अन्य काही वैशिष्ट्ये इजिप्शियन नागरिकांना माहीत होती. मगरीची प्रजनन क्षमता अन्य प्राण्यांच्या तुलनेत जास्त असते. तिच्या पिल्लांवरील तिचे प्रेम इतके असते की, वाळूच्या खड्ड्यात घातलेल्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना मगर तोंडात धरून पाण्यापर्यंत घेऊन येते. पिल्ले स्वावलंबी होईपर्यंत ती पिल्लांना तिच्या पाठीवर घेऊन त्यांना शिकवते. या तिच्या नैसर्गिक गुणवत्तेसाठी तिला नाईल नदीची सुपीकता आणि वत्सल मातृत्व अशा दोन वरकरणी विसंगत वाटणाऱ्या तिच्या वैशिष्ट्यांसाठी देवत्त्व दिले गेले आणि इथून ‘सोबेक’ या देवतेचे चिह्न दोन प्रकारे साकार झाले.

 

मानवी श्रद्धा आणि भक्ती या दोन भावनांना पर्याय नाही. नाईल नदीतील मगरीवर नागरिकांची इतकी श्रद्धा होती की, मगरीने हल्ला करून खाल्लेल्या माणसांनासुद्धा दिव्यत्व प्राप्त होत असे. मगरीने खाल्लेला माणूस नशीब घेऊन जन्माला आला होता. कारण, त्याचा मृत्यू साक्षात ‘सोबेक’ देवाच्या हातून झाला. अशा माणसांचे दफन खास पद्धतीने शवलेपन म्हणजे ममिफाय करून त्यांना महत्त्वाच्या जागी दफन केले जात असे. मृत माणूस, प्राणी अथवा पक्षी यांचे शरीर ममिफाय करणे याला ‘शवलेपन’ हा मराठी प्रतिशब्द आहे. चित्र क्र. १ मध्ये अशा शवलेपन केलेल्या मगरीचे शरीर आहे. आज इजिप्तमधील अनेक पिरॅमिडमध्ये अशा पाठीवर पिल्लू घेतलेल्या, तोंडात पिल्लू धरलेल्या अशा शरीरमुद्रांमधील शवलेपन केलेल्या मगरी सापडल्या आहेत. फरोहांची म्हणजे राजांची आणि त्यांच्या सैन्याचे रक्षण करणारी आक्रमक आणि निर्भय सोबेक देवता मगर अशी लोकप्रिय झाली आणि मगरीचे शीर धारण केलेली मानवाकृती सोबेकचे चिह्न म्हणून स्वीकृत झाली. पिरॅमिडवरील कोरलेल्या दगडांवर मगरीचे चिह्न रक्षणकर्ता म्हणून रेखाटले गेले. तीन हजार वर्षांपूर्वीच्या या श्रद्धा आज इतिहास जमा झाल्या आहेत आणि इजिप्तची ही प्राचीन चिह्नसंस्कृती आज पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनली आहे. या नाईल नदीतील दुसरा देवत्त्व प्राप्त झालेला इजिप्शियनांचा आवडता प्राणी, हिप्पोपोटेमस. सूक्ष्म निरीक्षणाने या प्राण्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तींचा अभ्यास करून त्यातील वैशिष्ट्ये आत्मसात करण्याचे कौशल्य त्याकाळात इजिप्शियन नागरिकांनी मिळवले होते. मगरीसारखीच नाईल नदीच्या पाण्यात राहणारी दीर्घायुषी हिप्पो माता सस्तन आणि उभयचर प्राणी आहे. ती पाण्यात राहते तशीच जमिनीवर राहू शकते. पिल्लू सात-आठ वर्षांचे होईपर्यंत हिप्पो माता आपल्या पिल्लाचे रक्षण करते. नदीतील आणि जमिनीवरील अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून लहान पिल्लाला धोका असल्यामुळे ती पिल्लाला आपल्यापासून फार दूर जाऊ देत नाही. हिप्पो मातेच्या या मातृत्व गुणाची निश्चित जाणीव असल्याने ही हिप्पो माता, ‘टावेरेट’ या नावाने मातृदेवतेच्या रुपांत जनमानसात अवतरली. दुष्ट-अनिष्ट शक्तींपासून रक्षण करणारी, आपल्या अपत्याचा प्राणपणाने सांभाळ करणारी मातृदेवता टावेरेट, गर्भार स्त्रियांची आवडती देवता होती. आपल्या पोटातील बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून टावेरेटचे चिह्न असलेले तावीज गर्भार स्त्रिया धारण करत असत. दोन पाय असलेली गर्भार हिप्पो माता अशी चिह्ने अनेक पिरॅमिडवर कोरलेली आजही पाहता येतात.

 

तळपता सूर्य आणि नाईल नदी या दोन गोष्टींचा फार मोठा प्रभाव तत्कालीन इजिप्शियन चिह्नसंस्कृतीवर झाला होता, हे अभ्यासाने आज आपल्या लक्षात येते. पंख असलेला सूर्यदेव ही तीन हजार वर्षांपासून उपलब्ध असलेली चिह्नसंकल्पना आहे. (चित्र क्र. ३) राजसत्ता, देवत्व, सार्वभौम शक्ती असा संकेत या चिह्नातून दिला गेला. प्राचीन इजिप्तवर नेहमीच फरोहा म्हणजेच स्वघोषित राजघराण्यांची सत्ता होती. अशा फरोहानी आपल्या सार्वभौम सत्तेचा विकास करताना या चिह्नाचा वापर केला. इजिप्तसह मेसापोटेमिया, पर्शिया, अनातोलिया अशा शेजारील प्रदेशातसुद्धा या चिह्नाचा प्रसार फार मोठ्याप्रमाणावर झाला होता. राजा आणि राजघराण्याच्या पूर्ण अधीन असलेल्या सामान्य नागरिकांसाठी हा पंख असलेला सूर्यदेव, आत्मा आणि वैश्विक शाश्वत सत्य या निर्गुण-निराकार-अमूर्त संकल्पनांचे प्रतीक बनला. तत्कालीन समाजात आणि नंतरच्या काळात आणि थेट आजपर्यंत झालेला या चिह्नाचा प्रवास पाहणे फार रंजक आणि उद्बोधक आहे. तत्कालीन इजिप्तच्या शेजारील पर्शियामध्ये झोराष्ट्रीयन धर्मप्रणाली आणि एका उत्तम समाज संस्कृतीचा प्रसार, सत्तेवर असलेल्या तेथील राजांमुळे झाला होता. ‘झेंड अवेस्ता’ हा या धर्मप्रणालीचा पूजनीय धर्मग्रंथ. या धर्मप्रणालीमध्ये सूर्य आणि अग्नी या दोन देवता पूजनीय होत्या, आजही आहेत. या झोराष्ट्रीयन धर्मग्रंथावर प्राचीन भारतीय ऋग्वेद संहितेचा फार मोठा प्रभाव आहे हे संशोधन व अभ्यासाने सिद्ध झाले आहे. पर्शियातील या धर्मप्रणालीने इजिप्शियन पंखवाल्या सूर्यदेवाच्या चिह्नाचा स्वीकार केला असावा. चित्र क्र. ४ मध्ये ‘फारावाहार’ या नावाने संबोधित या सुधारित चिह्नाची प्रचलित प्रतिमा पाहता येते. समृद्ध आणि प्रगत पर्शियावर त्यानंतर परकीय आक्रमणे झाली आणि झोराष्ट्रीयन धर्मबांधवांना मायभूमीतून परागंदा व्हावे लागले. अशा परागंदा झालेल्या पर्शियन नागरिकांनी भारतीय किनाऱ्याचा आश्रय घेतला. कित्येक शतकांपूर्वी भारतात आलेले असे पर्शियन म्हणजे आपले पारशी धर्मबांधव, आज भारताचे नागरिक आहेत. ‘अग्यारी’ या झोराष्ट्रीयन मंदिरावर आणि पारशी बांधवांच्या इमारतींवर हे फारावाहार चिह्न दिमाखाने दर्शन देत असते. शब्दांची निश्चित निर्मिती झाली नव्हती, त्या उत्क्रांती काळापासून या चिह्नसंस्कृतीने मानवाच्या दैनंदिन जीवनात अनेक रंग भरले आहेत. मानवतेच्या समृद्धीच्या दिशेने प्रगती केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/