ठग्स ऑफ ‘व्हायरल पोस्ट’
महा एमटीबी   25-Nov-2018‘गो फंड मी’ या संस्थेच्या नावाखाली मॅकक्लर, तिचा प्रियकर डी. एमिको आणि जॉनी बॉब्बीट ही तीन पात्रे मिळूनच हा सापळा रचतात आणि त्यात फसले सुमारे १४ हजार कोटी नेटकरी.

 

भावना विकून जगात पैसा कमावता येतो, ही गोष्ट ज्याला कळली तो माणूस कधीही गरिबीत राहत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. मात्र, लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. लोकांच्या भावनांशी खेळून चक्क अडीच कोटी रुपये लुबाडणाऱ्या त्रिकूटामुळे आता चांगुलपणा दाखवतानाही लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणार, हे नक्की. झालं असं की, ‘गो फंड मी’ या संस्थेच्या नावाखाली मॅकक्लर, तिचा प्रियकर डी. एमिको आणि जॉनी बॉब्बीट ही तीन पात्रे मिळूनच हा सापळा रचतात आणि त्यात फसले सुमारे १४ हजार कोटी नेटकरी. गोष्ट अशी की, लास वेगास या शहरात राहणारी मॅकक्लरची गाडी रात्रीच्यावेळी अनोळखी ठिकाणी बंद पडते. तिच्याकडे घरी जाण्यासाठी आणि गाडी दुरुस्त करण्यासाठीही पैसे नसतात. त्याच वेळेस जॉनी बॉब्बीट हा रिक्षावाला येऊन तिची मदत करतो. “मी बेघर आहे, घर घेण्यासाठी मी २० हजार डॉलर्स साठवले आहेत. ते घेऊन जा. मला ही मदत परतही नको,” असे म्हणत तो तिला त्या रात्री सुखरुप घरीही सोडतो. अनोळखी जागेत भेटलेला एक माणूस अपरात्री सुखरूप घरी सोडतो. स्वतःच्या घरासाठी साठवलेले पैसेही तो मला देतो, या घटनेने भारावलेली मॅकक्लर सोशल मीडियावर पोस्ट लिहिते. “स्वतःकडे घर नसताना केवळ माझ्या मदतीसाठी त्याने स्वतःच्या घरासाठीची पुंजी मला देऊ केली आणि मला सुखरूप घरी सोडले.” आता अशा पोस्ट फॉरवर्डेड जमान्यात व्हायरल व्हायला कितीसा वेळ लागतो. मॅकक्लर आणि रिक्षावाला जॉर्ज दोघांनाही तुफान प्रसिद्धी मिळते. यातच मॅकक्लरला जॉर्जच्या घरासाठी मदत उभी करावीशी वाटते आणि ती पोहोचते ‘गो फंड मी’ या संस्थेकडे. तिच्या व्हायरल झालेल्या पोस्टच्या आधारे संस्थाही तिला मदत करण्यास तयार होते. त्या व्हायरल पोस्टमुळे लोकांनी भावूक होऊन जॉर्जला मदत केली आणि अशाप्रकारे सात दिवसांत २ कोटी, ८४ लाखांची रक्कम उभी राहिली. ही मदत प्रामाणिक हेतूने मागितली असती तर एक आदर्श ठरला असता मात्र, हा चक्क घोटाळा ठरला. लोकांच्या भावनांशी खेळून खोटे बोलून जमवलेली ही रक्कम होती.

 

प्रकार तसा सरळ साधा सोपा... मात्र, कुणाच्याही ध्यानीमनी काहीच आले नाही. या सापळ्यामागे कथेतील तीन पात्रे पूर्वीपासून योजना आखत होती, पण ते स्वतःच्याच सापळ्यात असे अडकले की, तिघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. तिघेही एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. बनावट पोस्ट तयार करून लोकांची सहानुभूती मिळवून आणि ‘गो फंड मी’ सारख्या मोठ्या स्वयंसेवी संस्थेच्या डोळ्यात धूळ फेकून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात ते यशस्वी झाले खरे पण त्यांच्याच मूर्खपणामुळे ते पकडलेही गेले. संस्थेच्या मदतीने एकूण ४ लाख़, २ हजार डॉलर्सची मदत त्यांनी जमवली. त्यातील ३० हजार डॉलर्स ’गो फंड मी’ने शुल्क म्हणून वजा केले. ७५ हजार डॉलर्स जॉनी बॉब्बीट याला देऊन उर्वरित रक्कम त्यांनी लंपास केली. याविरोधात जॉनीने खटला दाखल केला. “मी बेघर आहे, या मदतीतून मिळालेली रक्कम मला मिळालीच नाही,” असे सांगत त्याने न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांच्या चौकशीत मॅकक्लर आणि डी. एमिकोने एक अलिशान कार विकत घेतल्याचे उघड झाले. बाकीचे पैसे दौलतजादा करण्यात उडवले. ‘वाऱ्याचा पैसा वाऱ्यावर गेला,’ पण अशी सहानुभूती मिळवून मदत करणाऱ्यांसमोर एक मोठे उदाहरण उभे राहिले आहे. असा आणखी एक किस्सा म्हणजे एका व्यक्तीने ऑनलाईन मदत मागणाऱ्या संस्थेला अकराशे रुपये मदत करण्याचे ठरवले. त्याच्याच चुकीमुळे रक्कम भरताना तीन शून्य जास्त दाबले गेले आणि त्याच्या खात्यातून अकराशेऐवजी ११ लाखांची रक्कम संस्थेच्या नावे जमा झाली. त्यानंतर ती रक्कम परत करण्यासही नकार देण्यात आला आणि शेवटी मनस्ताप वेगळा...

 

भारतातही अशाप्रकारे मदत मिळवणाऱ्यांची संख्या कमी नाही. अमुक संस्था, तमुक शिबीर, असे सांगत लाखो रुपये लाटणाऱ्यांवर वचक असा नाही. ऑनलाईन फसवणुकीतही अशा महाठगांनी अनेकांना लुबाडले आहे. एखाद्या रुग्णाचे मन हेलावणारी छायाचित्रे दाखवून मदत मागणे, अंध-अपंग संस्थांना दान देणार असल्याचे सांगत शंभर-दोनशे का होईना मदत करा, असा आग्रह करणाऱ्यांना आपण लोक मदत करून मोकळेही होतो. मात्र, ती योग्य ठिकाणी पोहोचतेय का, याचा पाठपुरावा करायला आपल्यालाही तितकासा वेळ नसतो. त्यामुळे अशा फसवणुकींपासून सावध होणे आवश्यक आहे.

 

- तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/