मुळशी पॅटर्न - एक जळजळीत वास्तव
महा एमटीबी   24-Nov-2018


 


'शेतकरी आणि त्याचं जीवन' हा विषय आपण अनेक वेळेस मोठ्या पडद्यावर पहिला असेल. शेतकऱ्याची फरफट ७० मिमी पडद्यावर व दोन तासांत उलगडणे अशक्य असले तरी अनेक चांगले प्रयत्न आपण मराठीमध्ये पाहिले आहेत. असाच एक खतरनाक प्रयोग नामवंत दिग्दर्शक व लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी मोठ्या पडद्यावर उतरवला आहे. नव्वदच्या दशकात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं झपाट्याने झालेलं विस्तारीकरण आणि वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे शहरावर व परिसरावर झालेल्या परिणामाची कथा प्रवीण तरडे यांनी 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातून आपल्यासमोर आणली आहे. यात विशेषतः औद्योगिकीकरण व पर्यटनाच्या नावाखाली लँडमाफियां'च्या उन्मादाने शेतकऱ्यांच्या उद्वस्त केलेल्या पिढयानपिढया, बरबाद झालेली तरुणपिढी, हतबल असलेली यंत्रणा आणि शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारी एकूण आर्थिक गणिते अशा सर्वांचा सारीपाट आपल्याला या दोन तास सत्तावीस मिनिटांमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटाच्या भाषेत सांगायचं झालं, तर चौकटी, कायदे मोडून जेव्हा कोणीतरी जंगलाच्या कायद्याने वागू लागतो, तेव्हा माणसाच्या जगात जंगलाचा पॅटर्न सुरू होतो. त्याचाच हा रक्तरंजित पॅटर्न म्हणजे 'मुळशी पॅटर्न'!

 

 
 

'मुळशी पॅटर्न' ही एका तालुक्याची नाही, अख्ख्या देशाची गोष्ट असली तरी, याचे कथानक फिरते ते राहुल्या (ओम भुतकर) भोवती. जमिनींना मिळालेला कोट्यवधींचा भाव आणि लँडमाफियां'च्या दबावाला बळी पडून बापाने विकलेल्या जमिनीनंतर रस्त्यावर आलेल्या पोराची ही कथा. सखा पाटील (मोहन जोशी) हा राहुल्याचा बाप, गावाचा पाटील असतो. मात्र, तालुक्यात आलेल्या 'गुंठामंत्र्यां'च्या 'फॅड'मध्ये आपण मागे का राहायचं म्हणून बक्कळ पैशात आपली वडिलोपार्जित जमीन बिल्डरला विकतो आणि आलेल्या पैशात मौज-मस्ती आणि ऐशारामात सगळा पैसा संपून जातो. त्यानंतर येतं ते वैफल्यग्रस्त जीणं... याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला असला तरी, सर्वात जास्त परिणाम तरणाबांड असलेल्या राहुल्यावर होतो. पाटील असलेल्या राहुल्याच्या बापाला वॉचमनची नोकरी करावी लागते. खर्चापोटी आपला वडिलोपार्जित वाडादेखील गहाण ठेवावा लागतो. वारंवार होणारे अपमान असह्य झाल्याने ते आपलं घर, गाव, मानणं सोडून कोथरूडला राहायला जातात. यानंतर झोपडपट्टीत राहून हमाली करणं सखा व राहुल्याच्या नशिबी येतं. हमाली करत असताना राहुल्या एका आडत व्यापाऱ्याचा खून करतो. राहुल्याला अटक होते व त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगामध्ये करण्यात येते. येथेच त्याची ओळख नन्याभाईशी (प्रवीण तरडे) होते आणि इथूनच चित्रपटाचं खरं कथानक सुरू होतं... आता पुढे काय होतं, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल...

 


 
 

बेकार, बंडखोर व एका वैफल्यग्रस्त तरुणाचे पात्र ओम भुतकर याने जीव ओतून साकारले आहे. बापाला दोषी ठरवणारा, तेवढंच आपल्या प्रेयसीशी प्रेमाचे चाळे करणारा, वडिलांच्या हास्यासाठी तळमळलेला, घराच्या भल्यासाठी धडपडणारा, मित्राला जीव लावणारा, गुन्हेगारी क्षेत्रात बकासुर असणारा आणि आपल्या पंटरसाठी व लोकांसाठीचा भाई अशी सर्व पात्र राहुल्या पुरेपूर जगाला आहे. मुळशी पॅटर्नमधून एक दमदार अभिनेता प्रवीण तरडे यांनी चित्रपटसृष्टीला दिला आहे. प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांनी नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी चोख बजावली आहे. आपल्या कसदार अभिनयाने आपापल्या भूमिकांना त्यांनी न्याय दिला आहे. सोबतच सुरेश विश्वकर्मा, शरद जाधव, सविता मालपेकर, क्षितिज दाते, अजय पुरकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, दीप्ती धोत्रे यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. राहुल्याच्या प्रेयसीची भूमिका साकारलेली मालविका गायकवाड तर भाव खाऊन जाते.

 

 
 

शेतकरी, बेरोजगारी, गुन्हेगारी, लँडमाफिया, राजकारण, हतबल पोलीस यंत्रणा, शेतमालाचा भाव, बदलेकी आग, कंपन्यांची आर्थिक हितसंबंध अशा नानाबाजू दाखवण्याचे दिव्य काम दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नन्याभाई स्टाईलने पार पाडले आहे. एकंदरीत 'मुळशी पॅटर्न'ला मिळालेलं 'नरेशन' चित्रपटाला अधिकच खतरनाक बनवते. या चित्रपटामध्ये पाटलाच्या घरासमोर असणारी स्कॉर्पिओ, आपण सगळं जग विकत घेऊ शकतो; मात्र, आपल्या बापाचं हसू विकत घेऊ शकत नाही, या भावनेतून वेडा झालेला राहुल्या, आपला जीव वाचवितानाची त्याची पळापळ, अशी अनेक प्रसंग अंगावर येतात. चित्रपटामध्ये असलेले डायलॉग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून जातात. तर चित्रपटाच्या सुरुवातीला आर्ट आणि भूमिकांमध्ये जरासा नाटकीपणा जाणवतो. मात्र नंतर तो 'रियॅलिस्टिक' होतं जातो. चित्रपटामध्ये असलेलं अरारा....हे गाणं सोडता इतर गाणी प्रेक्षकांच्या लक्षातच राहत नाहीत. चित्रपटाचे संगीत, नरेशन, पार्श्वसंगीत, अभिनय, आर्ट, डायलॉग यांची खिचडी उत्तम शिजली असताना सिनेमॅटोग्राफी आणि संकलन जुळून न आल्याने मध्यंतरानंतर चित्रपट थोडासा स्लो वाटतो. नागराज मंजुळे यांच्या 'फॅन्ड्री' व भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'ख्वाडा'मध्ये दाखवलेल्या शेवटाप्रमाणे दिग्दर्शकाने या चित्रपटाचा शेवट अतिशय आशयपूर्ण दाखवला आहे.

 

एकंदरीत विचार केल्यास, पुणे परिसरात विशेषतः मुळशी, वाघोली, चाकण, पिंपरी-चिंचवड भागात शहरीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाखाली उद्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिढ्या, पैशाचे व्यवस्थापन करता न आल्याने बरबाद झालेला शेतकरी आणि यातून बाहेर आलेली गुन्हेगारी व गरिबी अनुभवायची असल्यास 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट नक्की पाहावा. कारण, ही तालुक्याची नाही, तर अख्ख्या देशाची गोष्ट असली तरी प्रत्येक शेतकऱ्याची व त्याच्या कुटुंबाची ही गोष्ट नक्कीच आहे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/