राम मंदिर प्रकरण आणि माध्यमांची भूमिका
महा एमटीबी   24-Nov-2018सध्याच्या काळात जवळजवळ सर्वच माध्यमांवरून खूप मोठ्या प्रमाणावर रामजन्मभूमीचे ‘कव्हरेज’ दाखविले जात आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया या सगळ्याच माध्यमांवर रामभूमी विवादावरती, कोर्टाच्या भूमिकेवरती सर्व बातम्या दाखविल्या जात आहेत.


अयोध्येची भूमी पुन्हा एकदा तापली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोद्धा दौरा, त्यांनी आयोजित केलेले धार्मिक समारोह, विश्व हिंदू परिषद आणि इतर संस्थांच्या हालचाली यामुळे पुन्हा एकदा रामजन्मभूमीवर सर्वच माध्यमांमधून बातम्यांचा ओघ सुरू झाला आहे. सध्याच्या काळात जवळजवळ सर्वच माध्यमांवरून खूप मोठ्या प्रमाणावर रामजन्मभूमीचे ‘कव्हरेज’ दाखविले जात आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया या सगळ्याच माध्यमांवर रामभूमी विवादावरती, कोर्टाच्या भूमिकेवरती सर्व बातम्या दाखविल्या जात आहेत. बरेच वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, अयोद्धेत तळ ठोकून आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच ‘रामजन्मभूमी, बाबरी ढाचा प्रकरण आणि माध्यमांची भूमिका’ यावर एक नजर टाकणे उचित ठरेल. मुळात हा विवाद सुरू झाल्यापासून हा विवाद आणि माध्यमं यांची एक समांतर कथा विकसित होत गेली. बाबरी ढाच्याच्या पतनाआधी माध्यमांची भूमिका, पतनानंतरची भूमिका, प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरची भूमिका, सध्याची माध्यमांची भूमिका या सगळ्यात नव्याने विचार करण्यासारखं बरंच काही आहे. जसजसं आपण याबाबतीत विस्तृतपणे बघायला जातो, तसं याबाबतीत फक्त हेच प्रकरण नाही, तर अशी सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणं भारतामध्ये घडली, ही प्रकरणं माध्यमांनी उचलून धरली आणि त्याच्या आधारे स्वत:ची प्रेक्षकसंख्या वाढवली, खप वाढवला हे आपल्याला दिसून येईल. तेव्हा आपण याचा थोडक्यात आढावा घेऊया. अयोद्धेमध्ये जेव्हा बाबरी ढाचामध्ये रामललांच्या दर्शनासाठी राजीव गांधींच्या सरकारच्या कार्यकाळात दारे खुली करण्यात आली होती, त्यानंतरच हा मुद्दा वाढत गेला. १९८९च्या काळात भारतात वृत्तवाहिन्या नव्हत्या. फक्त सरकरी दूरचित्रवाणीवरून वृत्तांकन होत असे. मात्र, त्यावेळी व्हिडिओ इंडस्ट्रीजमध्ये कॅसेटना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा कारसेवा करण्यात आली, तेव्हा मुलायमसिंह यादव यांच्या सरकारने उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने निर्दोष,निरपराध, नि:शस्त्र साधूसंतांवरती हल्ला चढवला, त्याचे चित्रणही काही वाहिन्यांनी केले. मेलेल्या साधू-संतांची प्रेतं शरयू नदीत जेसीबीच्या साहाय्याने ढकलण्यात आली. या सगळ्या गोष्टीचे चित्रण हे छुप्या पद्धतीने करण्यात आले आणि नंतर त्याची व्हिडिओ कॅसेट काही संघटनांनी, व्यक्तींनी खाजगी पद्धतीने चालविली. ‘प्राण जाई, पण वचन ना जाई’ अशा शीर्षकाखाली ती कॅसेट बंदी असतानासुद्धा घरोघरी फिरली. त्याचं लोकांनी एकत्र येऊन गटागटांनी जे आहे ती बघितली आणि खूप मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादाला नवी फोडणी मिळाली. साधू-संतांवर झालेले अत्याचार मुलायमसिंह यादव सरकारची भूमिका, प्रक्षोभक भाषणं या सगळ्या गोष्टींची ठिणगी पडून आणि रामजन्मभूमी आंदोलन पेटले. याचीच परिणीती नंतर १९९२च्या बाबरी विद्ध्वंसामध्ये झाली. सर्वात आधी व्हिडिओ माध्यमांच्या भूमिकेचा आपल्याला विचार करावा लागतो. मुद्रित माध्यमे आणि रामजन्मभूमीवरती सांगितल्याप्रमाणे बाबरी ढाच्याची दारे उघडण्याची मागणी फेब्रुवारी १९८६ मध्ये एका वृत्तपत्रात छापून आली होती आणि त्यामध्ये अगदी रामाच्या वनवासापासून ते अयोध्या वगैरे अशा गोष्टी छापून आल्या होत्या. दिल्लीमध्ये दंगल झाली. खळबळजनक घटना ज्या आहेत त्या झाल्या. त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये जामा मशिदीचे शाही इमाम यांनी सांगितलं की, जामा मशिदीचे कुलूप उघडण्यामुळे देशभरामध्ये आग लागली आहे आणि जर ही वाढेपर्यंत बंद केली गेली नाही, तर देशामध्ये काहीही होऊ शकते. यामुळे पुन्हा एकदा असंतोषाची ठिणगी पडण्यास मदत झाली. १९८७च्या दरम्यान हिंदूंचे धार्मिक गुरू हे राम मंदिरासाठी शस्त्र देण्याची विनंती करत आहेत, असे एका वृत्तपत्रामध्ये छापून आले आणि त्यानंतर ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ किंवा ‘हिंदुत्वाला समजणे जरूरी आहे,’ ‘हिंदुत्व हाच समाज आहे,’ अशा प्रकारचे लेखसुद्धा याच दरम्यान प्रकाशित झाले. हिंदी वृत्तपत्रांमध्ये उजवी आणि डावी विचारसरणी अशी भेग पडली आणि दोन्ही बाजूने मुलाखती छापून येऊ लागल्या. राजकीयदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण रामजन्मभूमी आंदोलनामुळे झाले आणि विचारसरणीचा भेदसुद्धा समोर आला. ‘कट्टर हिंदुत्ववाद’ ही बऱ्याच जणांची ओळख झाली. राजकीय ध्रुवीकरण झाले. हे जसं राजकीय ध्रुवीकरण झालं तसं सामाजिक ध्रुवीकरणदेखील झालं. तेव्हा माध्यमेसुद्धा यापासून परावृत्त झाली. माध्यमांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेले दिसते.

 

मुद्रितमाध्यमांना झालेला या आंदोलनाचा फायदा

 

भारतातील दोन मोठ्या वृत्तपत्रसमूहांचा वितरणाच्या बाबतीत किंवा वाचकसंख्येच्या बाबतीत सातत्याने पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. त्या वृत्तपत्रांनी रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्याची परिणीती वाचकवर्गातील वाढीत झाली. फक्त उत्तर प्रदेशामध्ये असलेले वृत्तपत्र हिंदीबहुल भागात मध्य प्रदेशाचा भाग असलेला छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि इतर हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पसरला. मध्य प्रदेशमध्ये संपूर्ण वर्चस्व असलेले दैनिक संपूर्ण भारतभर पसरले आणि प्रादेशिक वृत्तपत्र जी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होती, त्या वृत्तपत्रांना या हिंदी वृत्तपत्रांना खपाच्या बाबतीत आज मागे टाकले आणि त्याचे खूप मोठे कारण रामजन्मभूमी आंदोलन आणि त्याला या माध्यमांनी दिलेले कव्हरेज होते, याबाबतीत काहीच शंका नाही. वेगवेगळ्या दोन्ही बाजूंच्या प्रक्षोभक मुलाखती, लोकांच्या भावनांना तेथे स्थान देणे आणि ज्यावेळेला जनआंदोलन जेव्हा रामजन्मभूमीसाठी होतं असं ज्यावेळेला लक्षात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलनांना समर्थन माध्यमांनी दिलं. त्याचा थेट आर्थिक फायदा या माध्यमांना झाला आहे, त्यामुळे ही माध्यमे सशक्त बनली आहेत आणि लोकांच्या मनात या माध्यमांनी स्थान मिळवले आहे.

 

त्याकाळातील मुद्रितमाध्यमांतील काही मथळे

 

‘राम जन्मभूमी के ताले खुले,’

लाखों हिंदुओं द्वारा श्रीराम जन्मभूमी की रक्षा के लिए सर्वस्व न्यौछावर की शपथ,’

जैसे की राम वनवास से अयोध्या लौटे शाही इमाम का बयान,’

‘अयोध्या मे कारसेवकों पर अंदाधुंद फायरिंग

अयोध्या शांत, चालीस हजार कार सेवकों का घेरा’

 

इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि रामजन्मभूमी आंदोलन

 

मुळात ज्या वेळेला रामजन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचले होते आणि बाबरी ढाच्याचे पतन झाले नव्हते तेव्हा भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आणि उपग्रह वाहिन्यांचा चंचूप्रवेश झाला होता. पण तितका विकास झालेला नव्हता. मात्र, भारतातील मोठ्या बातम्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वार्तांकन नक्कीच होत होते. बऱ्याचशा परदेशी वाहिन्यांनी बाबरी ढाचा पाडण्याचे थेट प्रक्षेपणदेखील केले. काही लोकांनी त्या संबंधित फुटेज दाखवले आणि जगातल्या १०० पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये बाबरी ढाच्याचे पतन होताना दिसले. त्याचा अर्थातच फायदाहा त्या त्या वेळेला माध्यमांना झालेला दिसतो. वरती सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर राममंदिर आंदोलन हे घरोघरी पोहोचलं. त्याचबरोबर त्याकाळी बातम्यांचे आठवड्याला व्हिडिओ मॅगझिन यायचे. हे कॅसेटच्या माध्यमातून चालायचे. त्यांनासुद्धा यावेळी खूप मोठा फायदा झाला. नंतर २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्यानंतर जसजसं राममंदिर प्रकरण वाढत गेलं, मग ते न्यायालयात गेलं, न्यायालयाचे वेगवेगळे निकाल आले, न्यायालयाचे जवळजवळ ७०० वेगळे खटले यासंबंधी चालू होते. जमिनीच्या वाटपाच्या बाबतीत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय या सगळ्याच गोष्टींना इलेक्ट्रॉनिक मीडियाने महत्त्व दिले. तसेच मध्यवर्ती निवडणुका जवळ येताच, त्यावेळी राजकीय पक्षांकडून पर्यायाने इलेक्ट्रॉनिक माध्यामांकडून टीआरपी मिळविण्यासाठी या विवादाचा पुरेपूर उपयोग केला जातो.

 

आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि रामजन्मभूमी आंदोलन

 

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या प्रकरणाचे केलेले बरेचसे प्रसारण हे एकांगी किंवा टीकात्मक स्वरूपाचे असते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रात कशा पद्धतीने जातीय दंगल उसळते, जातीय विद्वेष पसरतो हे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पसरवलं. आंतरराष्ट्रीय माध्यमांचा उद्देश हा जास्तीत जास्त व्यावसायिक लाभ मिळावा किंवा आपल्या प्रेक्षकवर्गात वाढ व्हावी हा होता आणि त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ही गोष्ट जास्त अतिरंजितपणे, रंजकपणे कशी मांडता येईल यावर भर होता आणि अर्थात काही विशिष्ट राजकारण्यांना हाताशी धरून ते सोप्पं होत गेलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो.

 

सोशल मीडिया आणि रामजन्मभूमी आंदोलन

 

मुळात सोशल मीडिया हे अनेकांच्या हातातील खेळणं बनलं आहे, हे आपण जाणतोच तेव्हा ज्यावेळी रामजन्मभूमीआंदोलन हे शिगेला पोहोचले त्यावेळी सोशल मीडिया नव्हते, हे जरा सकारात्मकच होते असेच म्हणावे लागेल. आपण गेल्या काही वर्षांत बघितलं, तर मुळात याचं नियंत्रण हे कुणा एकाच्या हातात नाही, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने याचा वापर करतो आणि याचा नेमका वापर कसा करायचा यासाठी धार्मिक द्वेष वाढविण्यासाठी, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर होतो, हे आपण बघतो. आता पुन्हा तेच होतं आहे. रामजन्मभूमीवर कडवा हिंदुत्ववाद आणि त्यासंबंधी विरोध यासंबंधी बातम्या, भाषणं करण्यात आली खरे आणि खोटे संदेश प्रसारित करण्याचं काम सोशल मीडियावर केलं जातं. त्यामुळे सोशल मीडियाची रामजन्मभूमी संबंधीची भूमिका रामजन्म आंदोलनात निर्णयात्मक असावी, असं वाटतं. याचा सारांश काय, तर रामजन्मभूमी विवादावर प्रत्येक घटनेचं वार्तांकन केलं असून बऱ्याचदा ते वार्तांकन एकांगी, स्वत:च्या फायद्याच्या पद्धतीने केलेलं आहे. देशातल्या इतक्या मोठ्या आणि संवेदनशील मुद्द्यावर माध्यमांची भूमिका पण संवेदनशील असायला हवी होती. मात्र, दुर्दैवाने तसं झालेलं नाही किंवा येणाऱ्या काही काळात तितक्याच संवेदनशीलतेने स्थान देतील असे स्वप्न बघायला हरकत नाही.

 

- प्रा. गजेंद्र देवडा

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/