पुणे संघपरिवाराचा आधारवड हरपला
महा एमटीबी   24-Nov-2018सोमवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८७व्या वर्षी लक्ष्मण तथा आबांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील संघपरिवार रुजवण्यात, वाढवण्यात त्यांची भूमिकाही तितकीच मोलाची होती. अशा या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या संघस्मृतींना उजाळा देणारा लेख...


साधारणत: १९८७च्या ऑक्टोबरमधील घटना आहे. त्यावेळचे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अण्णासाहेब बेहेरे, नाशिकचे विनायकराव पाटील, प्रसिद्ध ऑफसेट प्रिंटर्स पर्शराम रेडीज व मी असे वनराईच्या सभेसाठी मोहन तथा अण्णा धारिया (माजी केंद्रीय मंत्री) यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे ते कोणीतरी विशेष पाहुणे आले असल्याने आम्ही थोडा वेळ स्वागत कक्षात बसलो. तोच स्वत: धारियासाहेब हे खडीवाले दादा वैद्य आणि आबा अभ्यंकरांना घेऊन बाहेर आले आणि त्यांनी या दोघांचा आमच्याशी परिचय करून दिला. अर्थात, खडीवाले वैद्य यांना सर्वच ओळखत होते. पण, अभ्यंकरांची नव्याने ओळख होत होती. नगरसेवक गोविंदराव मालशे यांच्यासह अभ्यंकरांना माझ्या कार्यालयात आल्याचे आपणास आठवत असल्याचे बेहेरे यांनी सांगितले. मला एकूण आश्चर्यच वाटले. संघाचे मोतीबाग कार्यालय प्रमुख व प्रचारक आबा अभ्यंकर मोहन धारियांकडे! मी तिथेच विचारणा केली की, यांचे नेमके येण्याचे कारण काय? त्यावर अण्णा धारिया म्हणाले, “आपण जानेवारीत पुण्यात ‘वनराई’तर्फे दोन दिवसांचे शिबीर घेणार आहोत. त्या संबंधात माहिती घेण्यासाठी आपण यांना बोलावून घेतले.” तरीही माझे समाधान झाले नाही. पण, पुढे धारियासाहेबांनीच खुलासा करून सांगितले की, हे अभ्यंकर पुण्यातील विविध सामाजिक संस्थांची माहिती खास करून त्यात कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे देण्यासाठी आणि दादा वैद्य शिबिरातील एकूण होणाऱ्या सत्रांविषयी चर्चा करण्यासाठी आले होते. वनौषधी, पर्यावरण, जंगलात मिळणाऱ्या गुणकारी वनस्पती इ. विषयी त्यांनी माहिती दिली. बरेच दिवस आमचे भेटायचे ठरले होते, तो योग आज आल्याचे अण्णा धारिया म्हणाले. मी तेव्हा वनराई ट्रस्टवर एक संचालक म्हणून काम पाहत होतो. माझ्याकडे कोकणची जबाबदारी होती. वसंत बंधारे व वनराई बंधारे श्रमदानातून बांधून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशी मोहीम तेव्हा वनराईने हाती घेतली होती. त्याला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पूर्ण सहकार्य लाभले होते.

 

त्याच दिवशी सायंकाळी मी पुण्यातील संघाच्या मोतीबाग कार्यालयात गेलो. आबाची भेट घेतली. त्याला “तू धारियाकडे कसा?” हे विचारले. तो म्हणाला, “त्यांचा मला व दादा वैद्यांना भेटून जाण्याचा निरोप होता. म्हणून गेलो होतो.” असाच एक प्रसंग १९९२च्या सुमारास घडलेला आठवतो. राष्ट्र सेवा दलाचे तेव्हाचे पुण्याचे धडाडीचे कार्यकर्ते ‘समाजवादी युवजन’ सभेचे कार्यवाह प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत वैद्य यांच्याकडे मी आबांना भेटलो. अभिजीत हे समाजवादी नेते भाई वैद्यांचे चिरंजीव. त्यांची संघाकडे पाहण्याची दृष्टी सर्वज्ञात होती. डॉ. अभिजीत, डॉ. कुमार सप्तर्षी, अतुल देऊळगावकर, प्रा. ग. प्र. प्रधान असे सर्व समाजवादी कार्यकर्ते तेथे होते. रमाकांत आर्ते (मातृमंदिर देवरुखचे संचालक), विलास वैद्य, नागेश शेट्ये इत्यादींसह मी गेलो होतो. माझा भाईचा व प्रधान सरांचा मीसाबंदी असताना येरवडा कारागृहातील परिचय व मैत्री. यामुळे ते मला काही वेळा बोलवूनही घेत. यावेळी विषय होता माध्यमिक शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुट्टीत स्थानोस्थानी प्रबोधनवर्ग घेऊन त्यांना आपला परिसर साफ-स्वच्छ ठेवून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी काही स्थानी कॅम्पस भरविण्याचा. आता या मोहिमेत नेमके लक्ष्मण काशिनाथ तथा आबा अभ्यंकरांचे नेमके काम काय? मला त्यांचे तेथे येणेही तितकेसे बरे वाटले नाही. नंतर भेटीत मी आबांना हा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले, “असे आहे, चांगल्या कामाचा आपण पुरस्कार करतो. त्याला योग्य साथही देतो. तेव्हा पुणे जिल्ह्यातील त्यातही भोर, मावळ परिसरांतील शाळांमध्ये असे कार्यक्रम घडवून आणण्याचे शिक्षक संघटनेने ठरविले असल्याने त्यांचे काम करणारे चंद्रकांत जोशी, तुकाराम माताडे (तेव्हा विधान परिषद सदस्य होते) प्रा. शरद वाघ यांच्यासह मी गेलो होतो. शिवाय डॉ. अभिजीत माझ्या चांगले परिचयाचे असल्याने त्यांनीच मला बोलवून घेतले.” पुणे कार्यालयात राहून आबांनी नुसता स्वागत कक्ष सांभाळला नाही, तर येणाऱ्या-जाणाऱ्याकडून विविध प्रकारची माहिती घेतल्याची प्रचिती मला या निमित्ताने आली. परिसरातील एखादे गाव तेथील संघाची प्रमुख व्यक्ती, आपल्या विचाराचे शिक्षण, धार्मिक-सांस्कृतिक संस्था इ. बरेच आबांना माहीत असायचे. संघाबाहेरही त्यांचा संबंध होता. आबांचे मूळ गाव अलिबागजवळील सासवणे-अष्टागरातील हे महत्त्वाचे गाव. शिल्पकार करमरकर याच गावचे. तेथे त्यांच्या शिल्पकृतीचे कायमस्वरूपी उभे केलेले प्रदर्शन दालन सर्वांना पाहायला मिळते. आबांचे वडील काशिनाथराव हे कल्याणला चातुर्मासात चुलत बंधूंकडे राहायला येत. थोडीफार भिक्षुकीही करीत. आबा माध्यमिक शिक्षणासाठी कल्याणला आले. जेमतेम मॅट्रीक केल्यावर तेथेच रेऑन फॅक्टरीत नोकरीस लागले. त्यांना दोन बहिणी. एक भगिनी कल्याणलाच सिद्धेश्वर आळीत दातारांकडे दिली होती. तिकडेच आबा असायचे. लहानपणापासून नित्य शाखेत जात असल्याने १९५४ मध्ये पुण्यात संघाचे ओटीसी कॅम्पही त्यांनी केला होता. आम्हाला बालशाखेवर ते शिक्षक होते. त्यावेळी कल्याणात संघाचे प्रभावी काम होते. शाखेवर बाल तरुणांची चांगली उपस्थिती असायची. मी कल्याणचाच असल्याने लहानपणापासून नानाराव ढोबळे, दामुअण्णा टोळेकर, दादा चोळकर, मुकुंदराव वझे, भाऊराव सबनीस या ज्येष्ठ प्रचारक-कार्यकर्त्यांना अगदी जवळून पाहिले आहे. त्यांचे यथार्थ मार्गदर्शनही मिळत गेले. म्हणूनच मी काही वर्षे संघाचे प्रचारक म्हणून यशस्वीपणे कार्य करू शकलो. अत्यंत साध्या वेषातील, सदोदीत अर्धी विजार व त्यावर शर्ट खोचलेला, कंबरेवर पट्टा व पायात गावठी वहाणा, त्याला बहुधा खाली नाळ मारलेली! अशी पिळदार देहयष्टीची, गव्हाळ रंगाची थोडी ठेंगू व्यक्ती आजही आमच्या समोर येते. चप्पलांचा करकर आवाज करीत अत्यंत धारदार व आटोपशीर बोलणाऱ्या या व्यक्तीची शिस्त कडक होती. संघ स्थानावर कडक वागणारे, पण शाखेनंतर अत्यंत स्नेहपूर्ण वर्तनाचे आबा हास्यविनोद करीत आम्हाला चणे, फुटाणे, शेंगदाणे असे काहीतरी देत असत.

 

१९५७-५८ मध्ये आबा प्रचारक म्हणून बाहेर पडण्याचे ठरले. तेव्हा कल्याणच्या नमस्कार मंडळात रात्री त्यांचा निरोप समारंभ झाला. माननीय संघचालक भाऊ घोळकर, कार्यवाह शंकरराव लेले, भाऊराव सबनीस, मुकुंदराव वझे, बापूराव फडणीस आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे तेव्हा बोलणे झाले. आम्हा सर्व बाल स्वयंसेवकांना वाईट वाटले. कारण, आमचा शिक्षक उद्यापासून दिसणार नव्हता. आबा सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे डॉ. गोखले यांच्याकडे गेले. तेथे दोन वर्षे प्रचारक राहिले. तेथून ते एक वर्ष पुणे जिल्ह्यात दत्तोपंत म्हसकरांसह कामाला होते आणि लगेचच संघाच्या मोतीबाग कार्यालयात वास्तव्यास आले. १९६० पासून कार्यालयप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. हिंदुस्थान साहित्याचे बापूराव दात्ये, प्रचारक बाळासाहेब साठ्ये, तात्या बापट तसेच प्रांतसंघचालक बाबाराव भिडे, श्रीकृष्ण भिडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाने आबांनी महाराष्ट्र प्रांताचे हे प्रमुख कार्यालय पुढे ४० वर्षे सांभाळले. पूजनीय श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, काशिनाथपंत लिमये, भाऊराव अभ्यंकर, विनायकराव आपटे यांच्यापासून ते अगदी अलीकडचे अखिल भारतीय, प्रांताच्या स्तरावरच्या ज्येष्ठ प्रचारक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची उठबस एवढेच नव्हे, तर त्यांना पुणे स्थानकावरून घेऊन येणे-सोडणे, सामानाची बांधाबांध, वाटेत भोजनाचा डबा, औषधपाणी इ. सर्व काळजी आबा घेत असत. दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल आणि पुण्यातील अन्यही रुग्णालयांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर औषधोपचार चालू असतील, तर आबा स्वत: जातीने जाऊन आवश्यक ती मदत करीत असत. पुण्यातील कार्यकर्त्यांना निवडून, त्यांच्याकडे असे काम नेमून देत असत. रामभाऊ गोडबोले, मोरोपंत पिंगळे, दामूअण्णा दाते, नानाराव पालकर अशा संघाच्या ज्येष्ठांच्या चरित्र लेखनासाठी अगदी सामग्री एकत्रित करण्यापासून प्रकाशन वितरण व्यवस्थेपर्यंत ते सहकार्य करीत. खडीवाले वैद्य, दादा वैद्य, प्रसादचे बापूराव जोशी, लाटकर प्रकाशन संस्था, पुरंदरे प्रकाशन अशा व्यक्तिगत वा साहित्यक्षेत्रातील संस्थांसाठी आवश्यक ते साहाय्य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. ते उत्तम समन्वयक होते. पुण्यातील अनेक संघ कार्यकर्त्यांच्या तीन-तीन पिढ्यांशी आबांचा संबंध होता. एखादा युवक कार्यकर्ता मोतीबागेत गेला की, त्याच्याकडे त्याच्या आजोबा- आजीपासून सर्वांची चौकशी करीत. घराघरात आबा पोहोचले होते. गणपती, नवरात्र, दिवाळी, संक्रांत सणांना ते मोतीबागेत क्वचितच असत. कार्यकर्त्यांच्या घरी अल्पोपहारापासून ते भोजनाचा आस्वाद घेण्यापर्यंत त्यांचा मुक्तसंचार असे. समन्वय साधून देण्याची त्यांची वेगळीच खुबी होती. मग अगदी शिशुविहारामध्ये लहानग्याचा प्रवेश असो वा महाविद्यालय-वसतिगृहाला जागा मिळवून देण्याची वेळ असो, आनंदाने आबा हे काम करीत. बाहेरून आलेल्या स्वयंसेवकाचा गावातील कार्यकर्त्याशी परिचय करून देऊन ती व्यक्ती संघस्थानाशी जोडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. पहाटे ४ वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होई. स्वतः सर्व वास्तू ते झाडीत. पाणी भरून घेत. भांडाराचे साहित्य लावण्यासाठी आबा सरदेशपांडे, प्रभाकर भट यांना मदत करीत. भोजनालयाची रोजची व्यवस्था पाहत इ. ते करती असत. अभ्यागतांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. पुणे हे पूर्वी महाराष्ट्र प्रांताचे केंद्र कार्यालय असल्याने प्रांतातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, प्रचारकांशी आबांचा जवळून परिचय होता.

 

“उत्तम प्रकारे संघटनेचे कार्य व्हायचे असेल, तर त्याचे कार्यालय सक्षम असावे लागते,” असे ज्येष्ठ नेते दत्तोपंत ठेंगडी नेहमी म्हणत. मजदूर संघाच्या कामासाठी कुठेही गेले की, ते कार्यालय व्यवस्था, कार्यालय प्रमुख या विषयी अधिक माहिती घेत असत आणि ते सत्यही आहे. संघाच्या प्रारंभापासून नागपूर कार्यालय कृष्णराव मोहरील सांभाळत. आता अलीकडे रामभाऊ बोंडाळे काम पाहतात. चमनलाल व वीरजी (दिल्ली), श्रीकृष्ण अरोडा (अमृतसर), बाळासाहेब देवळे (लखनऊ), केशवराव दीक्षित (कोलकात्ता), हरिहरनजी (कटक), रामभाऊ हळदेकर व रामभाऊ साठे (हैद्राबाद), दत्ता वझे व वसंत साठे (मुंबई), शिवरामपंत जोगळेकर (चेन्नई) अशी प्रत्येक प्रांताच्या प्रमुख नगरातील कार्यालय प्रमुखांची नावे देता येतील. ही परंपरा अक्षुण्णपणे चालत आली आहे. संघप्रचारक केवळ कार्यालयीन कामात व्यस्त असे घडत असल्यानेच संघ आणि त्याचा शाखा विस्तार नियोजनबद्ध होत आला आहे. त्यामुळेच हजारो कार्यकर्ते संघाला जोडले गेले. त्यात आबा अभ्यंकरांसारख्या अहर्निश काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे मोठे योगदान आहे. आबांनी केवळ वास्तूची दखल, वस्तूंची काळजी न वाहता येथे वावरणाऱ्या सर्वांशीस स्नेहपूर्ण व्यवहार केला. सदैव हसतमुख राहून, स्वत:ची विशेष दखल न घेणारा अनेक वर्षे मोतीबागेच्या स्वागत कक्षातील आतील आठ बाय तीनच्या बोळकंडीत अनेक वर्षे राहणारा हा सच्चा कार्यकर्ता सर्वच पुणेकरांच्या कायम स्मरणात राहील. प्रकृतीच्या कारणाने अलीकडे १५ वर्षे रोजच्या कार्यालयीन कामापासून आबा दूर होते. पण, निवास तेथेच असल्याने नवीन इमारतीच्या बांधकामापासून, बैठका, समारंभापर्यंत सर्व सुनियोजित घडवून आणण्यासाठी त्यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभत असे. अलीकडे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होत्या. अखेरचे १० दिवस ते रुग्णालयामध्ये होते. तेथेच सोमवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८७व्या वर्षी लक्ष्मण तथा आबांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीवर हजारोंनी प्रार्थनासभेत सहभागी होऊन त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

 

- सुरेश साठे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/