‘वन्स मोअर’: मनोरंजनातून अंतर्मुख करणारी नाट्यकृती
महा एमटीबी   23-Nov-2018भरत जाधव एंटरटेनमेंट आणि ड्रीम कॅचर प्रकाशितनेवन्स मोअर’ या नाटकाचे सादरीकरण केलं आहे. नाटकाचे कथाबीज पार्थ देसाई यांचे असून नाटकाचे मूळ लेखन स्नेहा देसाई यांचे आहे. त्याचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे.


आजकाल लोकसंख्येचा विषय काही ना काही कारणामुळे कधी कधी चर्चेला येतो, लोकसंख्या वाढणे म्हणजे कुटुंबामध्ये मुलांची संख्या वाढणे हे आलेच. पूर्वी ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।’ असा आशीर्वाद दिला जायचा. त्यानंतर ‘अष्टपुत्रा’ ऐवजी ‘इष्टपुत्रा सौभाग्यवती भव।’ असा बदल झाला आणि आता ‘आम्ही दोघं-आमचे दोन’ अशा चौकोनी कुटुंबाची रचना झाली. हे सारे कशामुळे तर आर्थिक गणित जमले पाहिजे त्यासाठी. आता समजा, एकच मूल आपल्या कुटुंबात हवे असे झाले, तर काय होईल? अशाच या मध्यवर्ती कल्पनेवर ‘वन्स मोअर’ या नाटकाची उभारणी केली आहे. हा विषय अगदी सहजतेने हाताळलेला आहे. भरत जाधव एंटरटेनमेंट आणि ड्रीम कॅचर प्रकाशितने ‘वन्स मोअर’ या नाटकाचे सादरीकरण केलं आहे. नाटकाचे कथाबीज पार्थ देसाई यांचे असून नाटकाचे मूळ लेखन स्नेहा देसाई यांचे आहे. त्याचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे. निर्माते मृण्मयी कुलकर्णी, नितीन, शिरीष आणि भरत जाधव हे आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत साई-पीयूष, वेशभूषा महेश शेरला यांची आहे. यामध्ये भरत जाधव, ऋजुता देशमुख, राजन ताम्हाणे, प्रांजल दामले, उर्मिला झगडे, शीतल कोल्हापुरे, प्रवीण वाळुंजकर, प्रशांत विचारे, समाधान हेगडे या कलाकारांनी भूमिका केलेल्या आहेत.

 

जीवन देशमुख आणि नियती देशमुख यांचे हे एक सुखी कुटुंब, त्यांना एक लालू नावाचा शाळेत जाणारा मुलगा आहे. त्या शिवाय जीवनचे वडील रामचंद्र आणि जीवनचा भाऊ अद्वैत असे सर्व एकत्रपणे सुखाने राहत असतात. लालूला खेळायला कोणीतरी आणायचा असा विचार जीवन करीत असतानाच सरकारचा एक फतवा निघतो की, या पुढे विवाहित जोडप्यास एकच मूल जन्माला घालता येईल आणि त्यांना आणखी एक मूल जर झाले, तर त्यांना दुप्पट कर द्यावा लागेल ही घोषणा होते. त्याचवेळी नियतीला नवीन मुलाची चाहूल लागायला सुरुवात होते. म्हणजे लालूला आणखी एक भावंड येणार. आत्ताच्या मिळणाऱ्या कमाईवर पुढे कसे काय घर चालणार, याची चिंता जीवनला भेडसावते. नियती आणि जीवन यांच्यात वाद होतो. आपण गर्भपात करून घेऊया, असे जीवन सुचवतो. नियती त्याला मान्यता देत नाही. अद्वैत हा जीवनचा एकटाच भाऊ. त्याला अभिनयाचे वेड असते. त्यामध्येच करिअर करून पैसे मिळवणार असे तो ठरवतो. त्याचे वय लग्नाचे झालेले असते पण, त्याला लग्न करायचे नसते. त्याच्यासाठी एक मुलगी सांगून येते आणि पुढे काय काय घडते त्याचा अनुभव नाटकात मिळेल. एकच मूल या सरकारच्या नियमापुढे काहीच चालत नाही. अद्वैतला मुलगी पसंत पडते का? नियती आपल्या मुलाला जन्म देते का? जीवन आणि त्याचे वडील रामचंद्र काय तोडगा काढतात? एकच मूल यातून मार्ग कसा काढला जातो? त्यासाठी गुगलची कशी मदत घेतली जाते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकात पाहा.

 

जीवनची मध्यवर्ती भूमिका भरत जाधव यांनी नेहमीच्या सफाईने केली आहे. ऋजुता देशमुखने नियतीच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. रामचंद्रची भूमिका राजन ताम्हाणे यांनी मनापासून साकारलेली आहे. याशिवाय उर्मिला झगडे, शीतल कोल्हापुरे, प्रणिता वाळुंजकर, प्रशांत विचारे, प्रांजल दामले, समाधान हेगडे यांची उत्तम साथ लाभली आहे. निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. मूळ गुजराती नाटकाचे रूपांतर करताना त्यांनी मनोरंजन कसे अधिक प्रमाणात होईल याकडे लक्ष दिलेलं असल्याने नाटकाची रंजकता वाढलेली जाणवते. नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत हे सारे एकमेकाला पूरक असे आहे. एक मुलाची गंभीर समस्या हसत-खेळत मांडण्यात आणि ती उत्तमपणे सादर केली गेली असल्याने नाटक धमाल करून जात असताना प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावते.

 

-दीनानाथ घारपुरे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/