टीम इंडियाच्या उमेदीवर फेरले पाणी...
महा एमटीबी   23-Nov-2018मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा टी-२० सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ३ सामान्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत झाली आहे. ऑस्ट्रेलियावर चांगली पकड भारताने बनवली असताना पावसाने भारतीयांच्या मनाचा हिरमोड केला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १९ षटकांमध्ये ७ विकेट गमावून १३२ धावा केल्या होत्या.

 

भारताकडून गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार आणि खालील अहमदने प्रत्येकी २ विकेट काढल्या. तर बुमराह, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅकडेरमॉटने ३२ धावांची नाबाद खेळी केली. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला २०चा आकडादेखील पार करता नाही आला. भारत हा सामना जिंकेल अशी आशा असलेल्या भारतीय प्रेक्षकांचा पावसाने खेळखंडोबा केला आणि हा सामना रद्द करण्यात आला.

 

३ सामान्यांच्या मालिकेत भारत १-०ने मागे आहे. हा सामना रद्द झाल्याने सिडनी येथे होणारा तिसरा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे. तरच भारत ही टी-२०ची मालिका बरोबरीत सोडवू शकतो. पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर फिंचची विकेट काढत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची पडझड चालूच राहिली. ११व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६२ धावांमध्ये तंबूत परतला होता. त्यानंतर नाईल आणि मॅकडेरमॉट यांनी सातव्या विकेटसाठी २७ तर मॅकडेरमॉट आणि टाय याच्या आठव्या विकेटसाठी नाबाद ३१ धावांच्या भागीदारीने १३२ एवढी मजल मारता आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/